घरफिचर्समायमहानगर ब्लॉगघड्याळाच्या टिकटिकीची डोकेदुखी

घड्याळाच्या टिकटिकीची डोकेदुखी

Subscribe

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची तिजोरी ज्यांच्या हाती होती ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर डोळे विस्फारून जाणारी संपत्ती केंद्रीय संस्थांच्या हाती लागली आहे. या धाडीमध्ये मिळालेल्या डायरीमध्ये पन्नास लाखांच्या घड्याळाची खरेदी ‘मातोश्री’साठी केल्याची नोंद सापडली आहे. तसेच मातोश्रीसाठी दोन कोटी रुपयांच्या भेट वस्तूंचाही उल्लेख आहे. हे मौल्यवान घड्याळ आपण आपल्या आईसाठी घेतल्याचा जबाब यशवंत जाधव यांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना दिला आहे. त्याच वेळेस या दोन कोटींच्या भेटवस्तूंची सांगड घालणं काही यशवंत जाधव यांना जमलेलं नाही. जाधव यांच्या डायरीतील नोंदीत घड्याळाचा उल्लेख आला आणि ‘मातोश्री’ सदस्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळांच्या नावाने समाजमाध्यमांवर नेटकर्‍यांनी कल्ला सुरू केलाय. उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या मनगटावर असलेल्या महागड्या घड्याळांवर सोशल मीडियात धमाल सुरू केलीय. एका बाजूला यशवंत जाधव यांचा डायरीतील उल्लेखाने ‘मातोश्री’ अडचणीत आली असताना दुसरीकडे शिवसेना नेते शिक्षणसम्राट आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नावाने शिमगा केला आहे.

पक्षातील आमदारांची कामे होत नाहीत. निधी मिळत नाहीत, अशी व्यथा व्यक्त करताना तानाजी सावंत यांनी शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेल्या दोन्ही काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचे सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसले असतानाही शिवसैनिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय, असे बोलून दाखवले. तानाजी सावंत माजी मंत्री आहेत, पण आता त्यांच्याकडे मंत्रीपद नाही, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत असं काहींचं म्हणणं आहे. ते कदाचित खरं असेलही पण जी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे ती शब्दशः चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातच शिवसेनेच्या आमदारांनी निधीसाठी कल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं. मात्र तोपर्यंत सत्तेतला खराखुरा मेवा खाणार्‍या राष्ट्रवादीने शिवसेनेचा तोंडाला आधीच पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असलेल्या तीन पक्षांचा जर आपण विचार केला तर गेली पन्नास वर्षं फक्त भावनेवर आधारित स्वतःचं राजकारण करणार्‍या शिवसेनेनं स्वतःचे नुकसान करून घेण्याचं ठरवलेलं दिसतय.

- Advertisement -

शिवसेना राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसली खरी मात्र या सत्तेत बसण्याचं वर्णन आवळा देऊन कोहळा काढणं असंच करावं लागेल, अशी सध्या तरी स्थिती आहे. काही भागांमध्ये राष्ट्रवादी वाढणं ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती, याचं कारण त्या ठिकाणी पवारांना किंवा राष्ट्रवादीला जनाधार नव्हता ही गोष्ट राष्ट्रवादीच्या बेरक्या नेत्यांनी उत्तमरित्या ताडली होती आणि त्यामुळेच शिवसेनेचा प्रभाव आहे त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे हात असे पसरवायचे की शिवसेना पुढची अनेक वर्ष सत्तेपासून कोसो मैल दूर राहिली पाहिजे. राष्ट्रवादी हा शेताच्या बांधापासून ते कुस्तीच्या तालमीपर्यंत स्वैर संचार करणार्‍या नेत्यांचा पक्ष आहे. तर कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर उतरून राडा करणारी शिवसेना मनगटशाहीच्या जोरावर गेल्या पन्नास वर्षात देशातील भल्याभल्या पक्षांना जड गेलीय.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षं काळात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ऐकत बसली आहे. गटप्रमुखापासून ते लोकसभा अध्यक्षापर्यंत किंवा साध्या शिवसैनिकापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचा प्रवास करणार्‍या या पक्षातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या काळात बरेच सहन करावे लागत आहे, असे चित्र बघायला मिळतेय. एखाद्या मुंबईचा अपवाद वगळला तर राज्यभरात सत्तेच्या काळात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार पक्षातील आपल्या खालोखाल सर्वात मोठा ‘मास लीडर’ असलेल्या अजित पवारांची घुसमट करण्याचा येनकेन प्रकाराने प्रयत्न करत आहेत. तर अजित पवार हे पक्षातील आपली असलेली जनाधाराची ताकद कशी वाढेल याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. विकास कामांसाठीची निधीची उधळण हा त्यातलाच एक भाग.

- Advertisement -

सरकारवर अजित पवारांनी स्वतःची पूर्णपणे छाप सोडली आहे. सहाजिकच पक्षातील कार्यकर्त्यांना आणि आमदारांना अजित पवारांचा आधार वाटतो. शिवसैनिकांसाठी ही गोष्ट मात्र ठाकरे करू शकलेले नाहीत. सध्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचा शब्द परवलीचा मानला जात असला तरी ते वगळता लोकांमधून निवडून आलेला एकही नेता महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही. अपवाद ठाण्याच्या एकनाथ शिंदे यांचा. थोरल्या पवारांना अजित पवार राष्ट्रवादी ‘हायजॅक’ करतील असं वाटत राहतं. तीच गोष्ट शिवसेनेत एकनाथ शिंदेंबद्दल ठाकरेंना वाटत राहते. त्यामुळे ठाण्याच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंपेक्षा ‘मातोश्री’ सदस्य राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याशी अधिक मधाळपणे बोलत आणि वागत असतात. याचा परिणाम लोकांमधून निवडून येणार्‍या शिवसेनेतील लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेवर होत आहे. संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांची चलती पाहिली की मुख्यमंत्री पदानंतर विधान परिषदेवर निवडून जाणार्‍या उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना महत्व द्यायचं नाही हे सूत्र का स्वीकारलं याची प्रचिती येते.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या शिवसेनेच्या रोपट्याचा आज महावृक्ष झालाय. या महावृक्षावर कुर्‍हाड चालवून पाडून टाकणं अनेकांना शक्य झालं नाही. त्यामुळेच धूर्त आणि कावेबाज पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा मोरचूद या महावृक्षाच्या मुळाशी टाकून अख्खा महावृक्षच सुकवून टाकायचं ठरवलेलं आहे. भाजप असू द्या किंवा राष्ट्रवादी दोघांनाही शिवसेनेला वाढू द्यायचं नाही आणि जमलंच तर संपवूनही टाकायचंय. त्यातल्या एकाला म्हणजे भाजपला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशात अनिर्बंध सत्ता हवी आहे. राष्ट्रवादीला चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवायचा आहे आणि त्यामुळेच दोघांनाही येनकेन प्रकाराने शिवसेनेला दिवसागणिक अधू आणि अपंग करायचं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या टिकटिकीमध्ये सर्वात प्रभावशाली असलेल्या मुख्यमंत्री पदावरील संगीताचे सप्तसूरही शिवसेनेसाठी किरकिर ठरू लागलेले आहेत. कारण एका बाजूला विरोधी पक्षातले ‘ब्लॅकमेलर’ ठाकरेंच्या वाईटावर उठलेले आहेत तर दुसरीकडे यशवंत जाधवसारखा बाळासाहेबांच्या मुशीतला शिवसैनिकही स्वतः अडचणीत येताच पक्षाच्या सर्वेसर्वा उध्दव ठाकरेंना समस्यांच्या खोल दरीत लोटून मोकळा झाला आहे. घड्याळ पवारांचं असुद्या किंवा यशवंत जाधव यांचं ठाकरेंची वेळ त्यानं खराब केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -