घरताज्या घडामोडीभाजप नेत्यांचा झोपी गेलेला विवेक!

भाजप नेत्यांचा झोपी गेलेला विवेक!

Subscribe

भाजपच्या नेत्यांनी टीकेची जी पातळी गाठली आहे, त्यावरून त्यांचा विवेक झोपी गेला आहे की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भाजपचे उच्चविद्याविभूषित आमदार आशिष शेलार यांनी नायर हॉस्पिटलमधील घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी जी खालच्या पातळीची भाषा वापरली, त्याची दखल राज्य महिला आयोगाला घ्यावी लागली. शेलार यांच्यावर गुन्हा दाखल होताच मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेताल आक्रस्ताळेपणा केला. शेलार यांनी टीका करताना विवेकबुद्धी जागी ठेवली असती तर ही वेळ आली नसती.

कोणावरही टीका करण्याचा अधिकार लोकशाहीत असला तरी ती कोणत्या पातळीवर जाऊन करावी, याला काही तळमेळ असायला हवा. भाजपच्या नेत्यांनी तो केव्हाच सोडून दिला आहे. यामुळे ते कुठल्याही भाषेत विरोधकांचा उध्दार करतात. आपण करतो ती टीका म्हणजे व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर इतरांनी केलेली टीका कायदेभंग कसा ठरू शकतो? भाषण स्वातंत्र्याची ही भाजपच्या नेत्यांनी केलेली व्याख्या भलतीच म्हटली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधार्‍यांना जाब विचारण्याचा अधिकार त्या पक्षातल्या नेत्यांना जरूर आहे.

- Advertisement -

पण त्यासाठी काही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. तोंडात काही येईल, ते बोललंच पाहिजे, असं नाही. त्यामुळे विवाद होतो. आणि पुढे याचे परिणाम दूरगामी होतात. प्रगल्भ राजकारणात हे बसत नाही. असं कोणी अशिक्षित बोलत असेल तर एकवेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. पण सुशिक्षित आणि पेशाने वकील असलेल्या व्यक्तीने असं वक्तव्यं करताना अनेकदा विचार केला पाहिजे होता. दुर्दैवाने तसं झालं नाही. त्याचेच परिणाम त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आता भोगावे लागत आहेत. सत्तेत असलेल्यांचे दोष दाखवणे हे विरोधकांचे काम आहे. पण ते करताना विधिनिषेध आणि तारतम्य विसरून चालत नाही.

याआधी नागरिकत्वाच्या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भूमिका मांडणार्‍या उध्दव ठाकरेंचा बाप आशिष शेलार यांनी काढला होता. तेव्हा त्यांच्यावर प्रच्छन्न टीका झाली होती. राज्याच्या प्रमुखाला हे राज्य तुझ्या बापाचे आहे काय, अशी भाषा वापरण हे यातून आपल्या विचारसरणीचे किती अवमूल्यन झाले आहे, हेच दिसून आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला न जुमानणार्‍या पक्ष नेत्याचे कान ओढण्याऐवजी त्याच्या वक्तव्याचं कौतुक करण्याची पध्दत ही चुकीची असून त्यांच्या पक्षाचीच हानी करणारी आहे. कारण तुम्ही कुठली भाषा वापरता यावरून तुम्ही कुठल्या प्रकारची माणसे आहात याचा अंदाज लोक घेत असतात, तुमच्याविषयी तसा विचार करत असतात.

- Advertisement -

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या ठाम भूमिकेमुळे गेल्याने भाजपचे नेते अतिशय वैफल्यग्रस्त झालेलेे आहेत, आणि त्याचाच विस्फोट गेल्या दोन वर्षांमध्ये बरेच वेळा त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून होताना दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश येत नाही, यामुळे त्यांचे मानसिक स्थैर बिघडत जाताना दिसत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक खालच्या पातळीवरील भाषा वापरली जाऊ लागली, त्याचीच प्रचिती आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यातून आली. वायफळ बडबड करणार्‍या भाजप नेत्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. टीका ही समर्पक असावी. त्यात व्यक्तीगत द्वेषाचा वास नको.

पण आजकाल याकडे कोणाचीही पाहायची तयारी नसते. जणू समोरच्या व्यक्तीला जीवनातूनच उठवायचे, अशा प्रकारे टीका केली जाते. विशेषत: भाजपच्या नेत्यांकडून होणार्‍या टीकेबाबत सामान्यांचा सूर असाच आहे. आपली मर्यादा न पाहाताच नेते कोणावरही काहीही बोलत असतात. यात शेलार पुन्हा आघाडीवर आहेत हे सांगायला नको. याआधी देवेंद्र फडणवीस काहीबाही बोलायचे. पुढे त्यांची जागा चंद्रकांत पाटलांनी घेतली. आता तर यात सगळेच उतरले आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांपर्यंतच्या सगळ्याच नेत्यांना वायफळ बोलण्याची पक्षाने मुभा दिलेली दिसते. किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर तर या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरतील, अशी त्यांची वक्तव्ये आहेत. शरद पवारांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपर्यंतच्या नेत्यांना ते कोणत्याही भाषेत बोलू शकतात. तेव्हा महापौर किशोरी पेडणेकर यांनी समजून घ्यायला हवं होतं, असंच म्हणायची आता वेळ आली आहे. महिलांची कदर करण्याची तयारी या नेत्यांची नाही.

नायर हॉस्पिटलमधली घटना दुर्दैवीच आहे. यात महापालिका प्रशासनाची दिरंगाईही असू शकते. पण त्यासाठी कोणत्या शब्दात टीका करावी, उच्च शिक्षित असलेल्या आशिष शेलारांना कळू नये, याचं नवल वाटतं. महापौरांवर टीका करताना त्या महिला आहेत, याचं भान शेलारांना जसं नव्हतं तसं ते त्यांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही नाही. शिवसेनेवर टीका करतात म्हणून पोलिसांनी शेलारांचा बंदोबस्त केल्याचा शोध फडणवीसांनी लावला. गृहमंत्रीपदाची जबाबदारी असताना फडणवीसांनी आपल्याही नेत्यांची तमा बाळगली नव्हती, हे फडणवीस विसरलेले दिसतात.

७२ तास कुठे निजला होतात, असं एका महिला पदाधिकार्‍याला विचारणं हे सभ्यतेच्या कुठल्या संज्ञेत बसतं, ते एकदा फडणवीसांनी सांगितलं पाहिजे. नेत्यांच्या वायफळ वक्तव्याला चाप बसवण्याऐवजी फडणवीस त्यांची उघड बाजू घेत असं बोलायला ते या नेत्यांना प्रोत्साहन देतात असाच याचा अर्थ निघतो. किशोरी पेडणेकर महापौर असल्यामुळे त्या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत, इतकंही शेलार समजून घेऊ शकत नसतील तर दाद मागण्याचा प्रश्नच उरत नाही. आता याची तक्रार झाल्यावर नेते जागे झाले. मी नाही त्यातला, अशी ओरड शेलार आणि त्यांचे समर्थक करू लागले आहेत. यातून ते काही शिकतील, अशी अपेक्षाही ठेवण्यात अर्थ नाही.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या कारवाईला सामोरं जाण्याऐवजी तिथे पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमवून घोषणाबाजी करण्यात आली. या हुल्लडबाजीचंही उघड समर्थन भाजपचे नेते करत होते. अतुल भातखळकर यांनी तर सत्तेला आव्हान देत कारवाईविरोधात भाषा वापरली. हे अती होऊ लागल्यावर मग समर्थकांकडून धमक्यांचे पत्र महापौरांना पाठवण्यात आलं. या पत्रात अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली. हे प्रकरण भाजपकडून ज्या प्रकारे हाताळलं गेलं ते पाहता त्याचा असा गैरफायदा घेतला गेला तर त्याला जबाबदार कोण? याचा दोष येऊ नये, म्हणून मग पत्र पाठवणार्‍याचा शोध घेण्याची आणि चौकशी करण्याची मागणी हेच नेते करू लागले आहेत.

इतरांवर खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे नेते आपल्यावर होणारी टीका सहन करत नाहीत. टीका झाली की पोलीस तक्रार करायची आणि पुढे न्यायालयात खटला टाकायचा असं करत भाजप नेते इतरांना जखडून ठेवतात. लोकशाहीची अशी त्रेधा याआधी कोणी उडवली नसेल. ती आज महिलांवर अश्लाघ्य टीका करून उडवण्यात आली, हे उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हा स्तर परवडणारा नाही. यामुळेच टीका करणारा जो कोणी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा काळ सोकावेल हे सांगायला नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -