घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग धिंड तिची की तुमची ?

धिंड तिची की तुमची ?

Subscribe

-कविता जोशी-लाखे 

सध्या गल्लीपासून दिल्लीच नाही तर परदेशातही मणिपूरमध्ये घडलेल्या भयानक घटनेचीच चर्चा आहे. कुकी जमातीच्या तीन आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मैतेई समाजाविरोधात जनक्षोम उसळला आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने खडबडून जागे झालेल्या मणिपूर सरकारने तब्बल घटनेच्या ७७ दिवसांनंतर याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. उद्या त्यांच्यावर कारवाईही होईल. पण ज्या महिलांची वस्त्र फेडून नग्न धिंड काढण्यात आली त्यांच्यावर कल्पनेच्या पलिकडे जाऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले त्यांच काय?

- Advertisement -

आरोपींना शिक्षा झाल्याने या महिलांच्या शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमांच काय? आणि व्हायरल व्हिडीओत या महिलांची अवस्था बघून आतल्याआत संतापाने पेटून उठलेल्या माझ्यासारख्या महिलांच काय ? अजून किती वर्ष हे चित्र पाहायचं आम्ही, किती वर्ष फक्त महिला असल्याची किंमत द्यायची आम्ही. यु्द्ध असो ,राजकारण, असो किंवा जातीयवाद प्रत्येकवेळी स्त्रियांवर अत्याचार करुनच का हा राक्षसी प्रवृत्तीचा अहंकार शांत होतो?

हजारो लोकांसमोर जेव्हा या महिलांना विवस्त्र करण्यात येत होतं, त्यांच्या शरीराबरोबर खेळलं जात होतं तेव्हा तिथल्या एकाही पुरुषाला त्याच्या आया बहीणीची आठवण झाली नसेल. एकानेही त्या नराधमांना अडवायचा तरी का प्रयत्न केला नाही?. जमावापुढे हतबल झालेले पोलीस तर बघ्याच्या भूमिकेत होते. म्हणजे समोर रक्षक असूनही महिला असुरक्षितच.

- Advertisement -

हीच देशातील आजची सत्य परिस्थिती आहे. कोणी तिचे प्रेमाच्या नावाखाली तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालतोय. तर कोणी बलात्कार करुन तिला जिवंत जाळतोय. कोणी तिला ब्लॅकमेल करतोय. तर कोणी तिला सोडून देतोय. कोणी तिला प्रेमात भुलवून परदेशात विकतोय. तर जन्मदाता बापचं तिच लैंगिक शोषण करतोय. महिला सुरक्षित राहतील असं एकही ठिकाणं या देशात उरलं नाही का? की या समाजाला तसं ठिकाण निर्माणच करायचं नाहीये. गर्दीला चेहरा नसतो असं म्हणतात. पण त्याच गर्दीत कोणाचा बाप, कोणाचा नवरा, कोणाचा मुलगा, काका , मामा आजोबा तरी असू शकतो ना. कि त्या क्षणाला सगळ्याचं पुरूषांच्या शरीरात पशू प्रवेश करतो. किती हा क्रूर मानसिकतेचा, द्वेषाचा कळस. वाद दोन समुदायांमधला. पण त्याची किंमत मात्र त्या त्या समुदायातील महिलांना द्यावी लागतेय. कायद्याची जरब राहीली नाही की पोलिसांचा धाक.

मग जगभऱात आपण का ढिंडोरा पिटतोय की मुलगी शिक्षित तर घर सुशिक्षित अरे थांबवा आता हे. भारताचा तालिबान होतोय..आपला देश पुढे नाही मागे जातोय…हीच प्रतिमा बनतेय जगभरात माझ्या देशाची. निर्भया प्रकरणामुळे संपू्र्ण जगाचा भारतीय पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला होता. रेपिस्ट म्हणूनच त्यांना हिणवलं जातं होत… याच घटना जगात देशाची प्रतिमा घडवतात आणि बिघडवतात. यामुळे नक्की कोणाला सुधरावयाचे समाजाला, येथील पुरुषांना की येथील पुरुषी मानसिकतेला?

यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मुलीचा जन्म हा शापचं समजला जाईल आणि पूर्वीप्रमाणेच मातेच्या गर्भातच उमळत्या कळ्यांना कुस्ककरलं जाईल…

- Advertisment -