घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअवकाळीच्या फटक्याने कांद्याला ‘लाली’

अवकाळीच्या फटक्याने कांद्याला ‘लाली’

Subscribe

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. एका एकरामध्ये 120 क्विंटल कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी 45 क्विंटल कांदा खराब झाला. तो कांदा शेतामध्येच फेकून द्यावा लागला. एवढे संकट सोसून शेतकर्‍यांनी कांदा बाजारपेठेत आणला आहे. त्याला कमी दर मिळाला तर त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे सध्या मिळत असलेला भाव कायम राहावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. येत्या जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागडा कांदा खावा लागणार असला, तरी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत.

देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाणार्‍या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर 2 हजार 800 रुपयांदरम्यान आहे. कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. गतवर्षी या काळात कांद्याचा दर 1450 रुपये क्विंटलच्या दरम्यान होता. सध्या उन्हाळी कांदा बाजार समित्यांमध्ये येत आहे. तरीदेखील कांद्याचे दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात कांदा 50 रुपये किलोने विकला जातोय. ही शेतकर्‍यांच्यादृष्टीने चांगली बाब म्हणावी लागेल. ऑनलाईन मार्केट म्हणजेच ‘ई-नाम’नुसार राज्यातील लोणंदमध्ये मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. तर पंढरपूरमध्ये कांद्याचा दर 3200 रुपये इतका होता. तर दोन्ही बाजारपेठांमध्ये कांद्याचा कमाल दर 4 हजार रुपये क्विंटल राहिला. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याची आवक निम्मी असल्याचे सांगितले. त्यामुळे कांद्याचे दर वाढल्याचे ते म्हणतात.

वाशीतील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक चांगली होत असून ऑगस्टमध्ये ६४ गाड्यांमधून ६ हजार ९२५ क्विंटल कांदा विक्री झाला. घाऊक बाजारात एक किलो कांद्याची विक्री १४ ते २० रुपये दराने केली जात आहे. ठाणे, डोंबिवली, मुंबई परिसरात किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ३० ते ३५ रुपये किलो दराने केली जात आहे. गेल्या वर्षी नवीन कांदा लागवडीला पावसाचा फटका बसला होता. जुन्या कांद्याचा साठा संपला होता. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो असा उच्चांकी दर कांद्याला मिळाला होता.

- Advertisement -

राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाच्या 2017 च्या अहवालानुसार शेतकर्‍यांना एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी 9.34 रुपयांचा खर्च येतो. भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार लाल कांद्याला 24 ते 30 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. रब्बी हंगामामध्ये सरासरी 18 ते व 24 रुपये दर मिळतोय. दर अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले नसते तर कांद्याचा भाव 8 ते 14 रुपयांदरम्यान राहतो. सध्या कांद्याला चांगला दर मिळतोय; मात्र, नाशिक, पुणे, धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. जानेवारी महिन्यातील 7 ते 10 तारखेदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

कांद्याचा साठा मुबलक असून आवकही नियमित होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. अतिवृष्टी झाल्यास नवीन कांदा लागवडीवर परिणाम होऊ शकतो. सध्या कांद्याची आवक नियमित होत असून कांदा दरवाढीची शक्यता अजिबात नाही. पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होत चालला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ३० ते ४० गाड्यांमधून कांद्याची आवक होत आहे. नाशिक, नगर या भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पुणे जिल्ह्यातून राज्यातील अन्य बाजार समितीत कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशात कांदा लागवड होते. परराज्यातून कांद्याची मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे कांदा लागवडीस अतिवृष्टीचा फटका न बसल्यास कांदा दर स्थिर राहतील, असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

नाफेडने कांदा खरेदी केल्यानंतर कांदा दर दोन हजार क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ऑगस्ट महिन्यात कांद्याची आवक कमी होते. मात्र, यंदा कांद्याची आवक नियमित होत असून नाशिकमधील लासलगाव बाजारात दररोज १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लासलगाव बाजार समितीत पाच लाख क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दहाच दिवसात अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. येत्या काही दिवसांत कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. मात्र, नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम न झाल्यास सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर वाढू शकतात, अशी शक्यता नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली.

यंदा एप्रिलपासून उपाहारगृहचालक आणि खाणावळचालकांकडून कांद्याला असलेली मागणी एकदम कमी झाली. विवाह समारंभ पुढे ढकलण्यात आल्याने कांद्याला मागणी कमी राहिली. परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी जमा केलेल्या जुन्या कांद्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. कांदा व्यापार्‍यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटकात परतलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या मान्सूनच्या पावसाने कहर केला. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकर्‍यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होऊन ते आता बाजारात विक्रीसाठी येत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील,असा अंदाज आतापर्यंत खरा ठरला. जानेवारी, फेब्रुवारीत नवीन कांदा बाजारात येईल. तोपर्यंत कांदा तेजीतच राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव वाढले आहेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर, जुन्नर आणि नाशिक, संगमनेर, अहमदनगर येथील शेतकरी कांद्याचा मोठा साठा ठेवतात. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दररोज सुमारे ५० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. नाशिकच्या लासलगाव बाजारात सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या नवीन कांदा बाजारात उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला देशभरात सर्वाधिक मागणी आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे पुढील काही दिवस कांदा स्वस्त होण्याची आशा धूसर आहे.

अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांना कांद्याच्या भावामुळे तरी काही प्रमाणात धीर मिळाला आहे. यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन भाव कमी करण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. कांदा व्यापार्‍यांवर कारवाई करण्यास शेतकर्‍यांची हरकत नसेल. पण भाव कमी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या ‘पोटावर पाय’ देण्याचे पातक सरकारने करु नये, अशी माफक अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली. ‘पांढरं सोनं’ अर्थात कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटल दर मिळत असला तरी उत्पादन 50 टक्के घटले आहे. कांद्याच्या माध्यमातून मिळणारा पैसा दिसत असला तरी अवकाळी पावसाने त्याचे केलेले नुकसान एकदा आठवले तरी चालेल. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळत असले की लगेच ‘सर्वसामान्य’ व्यक्तींच्या डोळ्यात पाणी येते. पण शेतकरी रडत असताना त्याचे अश्रू पुसण्यासाठी कुणीही धजावत नाही. तुटपुंज्या मदतीने त्याची बोळवण करण्यातच राजकीय धन्यता मानली जाते. या तोकड्या मदतीपेक्षा त्याने कष्टाने कमावलेल्या पिकाला योग्य भाव मिळाला, तरी हा बळीराजा सदैव सुखी राहील.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -