घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफ्रंटमधील सारे प्रवासी सोयीचे...

फ्रंटमधील सारे प्रवासी सोयीचे…

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट होणार नाही. त्यामुळे खरंच भाजपविरोधी आघाडी होईल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याला कारण तसेच आहे. या फ्रंटमध्ये येऊ इच्छिणारे बहुतेक पक्ष भाजपाप्रमाणेच आपापल्या कार्यक्षेत्रात व प्रभावक्षेत्रात काँग्रेस विरोधक म्हणून उदयास आलेले आहेत. पण त्यांना त्या भूमिकेवर कायम टिकून राहता आलेले नाही. परिणामी त्यांना आपला प्रभावही कायम टिकवता आलेला नाही. जिथे जिथे म्हणून अशा पक्षांनी आपला काँग्रेस विरोध क्षीण होऊ दिला; तिथे तिथे त्यांनी आपला पाया गमावला आणि त्यांना पांगळे व्हावे लागलेले आहे. दोनतीन दशकांपूर्वी त्यांच्या इतकाच दुबळा असलेला भाजप, आज थेट काँग्रेसला आव्हान देऊन केंद्रात सत्ताधारी बनला. त्याचे श्रेय याच पक्षांच्या धरसोडवृत्तीला व भाजपच्या काँग्रेस विरोधावर ठाम रहाण्याला आहे.

मागल्या तीनचार दशकात भारतातला मतदार नागरिक काँग्रेसला पर्याय शोधत असताना, त्याने ज्या ज्या राजकीय पक्षांना संधी दिली त्यांनी सत्तेसाठी किंवा पोरकट कारणास्तव कधीतरी काँग्रेसची सोबत केली. मग स्थानिक पातळीवर त्याचा दांभिकपणा उघडा पडला आणि त्याची जागा दुसरा पक्ष व्यापत गेलेला आहे. अन्यथा अशाच भागात भाजपने आपले बस्तान बसवलेले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून मग सेक्युलर म्हणून निवडणूकीपूर्वी नाचणारे पक्ष, आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. सहाजिकच अशा पक्षांच्या फ्रंटची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. मग त्यांनी निवडणुकीआधी आघाडी करावी किंवा कसल्याही गमजा कराव्यात. लालू, पासवान, डावे पक्ष त्याचेच बळी आहेत.

- Advertisement -

म्हणूनच अशा पक्षांचा इतिहास हास्यास्पद आहे. तितकीच त्यांची फ्रंटही अविश्वसनीय आहे. काँगेसला जीवदान देणारे छुपे काँग्रेसजन असतात. त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिले त्यांना टिकून राहता आले. म्हणून लालू, पासवान, देवेगौडा किंवा डावे भूईसपाट होताना, ममता, जयललिता आपले प्राबल्य टिकवून राहू शकले आहेत. यावेळची निवडणूक त्या अर्थाने निर्णायक व्हायची आहे. त्यात जे खरेच भाजप काँग्रेसचे सारखेच विरोधक असतील आणि दोन्हीपैकी कोणाबरोबर निकाल लागल्यानंतर जाणार नाहीत, त्यांचाच टिकाव लागणार आहे. ज्यांचा इतिहास त्याबाबतीत शंकास्पद आहे, त्यांना आजवरच्या सेक्युलर पाखंडाची किंमत मोजावी लागणार आहे. किंबहुना, मोदींच्या रुपाने तेच खरेखुरे आव्हान या डुप्लीकेट काँग्रेसी पक्षांसमोर उभे ठाकलेले आहे. हे असे एकत्र येऊन पूर्वी इंदिराजींना वा आज मोदींना पराभूत करू बघणारे पक्ष वा नेते, खरोखरच विचारांनी एकत्र येत असतात का? असते तर त्यांच्या वागण्यात वा कृतीमध्ये एकवाक्यता दिसली असती.

पण तसे सहसा घडलेले नाही. ठराविक काळापर्यंत त्यांची एकजुट अभेद्य वाटते. पण त्यात थोडेफार जरी यश मिळताना दिसू लागले, की मूळचा हेतू बाजूला पडून हे लोक एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. हे प्रत्येक वेळी झालेले आहे. १९७७ सालात म्हणूनच जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि १९८९ सालातला जनता दलाचाही प्रयोग फसला. पुढे त्याचीच पुनरावृत्ती १९९६ सालात भाजपला सत्तेपासून अलिप्त राखण्याच्या फसव्या प्रयोगातून झाली. असे प्रत्येकवेळी कशाला व्हावे? आपला समान शत्रू वा प्रतिस्पर्धी संपला नसताना, हे लोक असे हेतूला हरताळ फासून एकमेकांचेच पाय कशाला ओढू लागतात? त्याचे विश्लेषण त्यांच्या मनातील कडव्या द्वेषभावनेत सामावलेले असते. त्यांना एकमेकांविषयी काडीचेही प्रेम नसते की आपुलकी नसते. त्यापेक्षा कुणाचा तरी समान द्वेष करण्याच्या भावनेने त्यांना एकत्र आणलेले असते.

- Advertisement -

१९७७ सालात जनता पक्षाचे यश इंदिराजींनी नव्हेतर समाजवादी माथेफिरूंनी मातीमोल केले होते. नसलेला द्विसदस्यत्वाचा मुद्दा उकरून काढण्यातून जनता पक्षात दुफळी माजली होती. तर १९९० सालात पुरोगामीत्वाचे भूत स्वार झालेल्या समाजवादी गटानेच जनता दलाचे तुकडे पाडलेले होते. त्यांच्या राजकारणाला आधी इंदिराजी वा नंतर राजीव गांधींना कुठलाही सुरूंग लावण्याची गरज भासलेली नव्हती. इंदिरा हटाव किंवा बोफोर्सने एकत्र आलेल्या असंतुष्टांना आपसात भांडणे करायला जराही वेळ लागला नाही आणि आघाडीत बिघाडी होऊन गेलेली होती. मोदी नावाचे भूत मानगुटीवर त्यांनीच चढवून घेतलेले आहे, तोपर्यंत आघाडी जोमात चालणार आहे.

पण जेव्हा मोदींपेक्षा आपलाच कोणी सहकारी पक्ष वा नेता शिरजोर होताना दिसेल, तेव्हा फाटाफुटीला इतकाच आवेश चढलेला दिसेल. कालपरवा बिहारमधला महागठबंधनाचा प्रयोग यशस्वी झालेला होता. पण भाजपाला पराभूत केल्यावर नितीशना सतत कोंडीत पकडून लालूंनी कोणते राजकारण यशस्वी केले? एकमेकांच्या प्रेमापायी किंवा आपुलकीने जवळ येण्याचा कुठलाही विषय नव्हता. या सर्वांना मोदींच्या यशाने पछाडलेले आहे आणि त्यातून आपले अस्तित्व टिकवण्याचा हा लढा सुरू झालेला आहे. हे समविचारी म्हणून एकत्र येत नसून भयगंडाने त्यांना एकत्र बांधलेले आहे. तो भयगंडाचा धागा जरासा सैल पडला, तरी ते लगेच विखरून जातील.

१९७० नंतरच्या काळात भाजप (पूर्वीचा जनसंघ) सहभागी झालेला होता. पण त्याची निष्फळता लक्षात आल्यावर त्यांच्या नेतृत्वाने स्वतंत्रपणे काँग्रेसला पर्याय म्हणून देशव्यापी पक्षबांधणीचा निर्धार केला. त्याला तीन दशकानंतर यश आलेले आहे. काळानुसार व गरजेनुसार त्यांनीही आघाडीत भाग घेतला. पण काँग्रेसच्या द्वेषापोटी नाही तर काँग्रेसला पर्याय होण्याच्या भूमिकेतून वाटचाल केली. आज भाजपच्या पंखाखाली आलेले विविध प्रांत बघितले, तर अशाच प्रयत्नातून आलेले आहेत. उलट याच कालावधीत आपले विस्कटलेले संघटन नव्याने उभारून वा लोकांमध्ये आपले बस्तान पक्के करण्यापेक्षा काँग्रेस झटपट सत्तेसाठी राजकीय द्वेषातून आघाडीच्या राजकारणात गुरफटत गेली. आता काँग्रेसही अशा दुबळ्या द्वेषाने भारावलेल्या माथेफिरूसारखी होऊन गेली आहे. त्यात त्यांनी हातातले गुजरात, दिल्ली वा उत्तर प्रदेश, बिहार गमावले. हळुहळू आपले बालेकिल्ले भाजपला मोकळे करून दिले. भाजपच्या नावाने बोटे मोडत बसणे, यापेक्षा काँग्रेसपाशी आज कुठला राजकीय अजेंडा राहिलेला नाही.

म्हणूनच मग ममतांनी जे पाऊल उचलले त्या स्पर्धेत सोनियांना उतरावे लागणार आहे. दुसर्‍या, तिसर्‍या फ्रंटचे नेतृत्व आपल्याला मिळावे, किंवा आपल्यापाशी टिकावे, म्हणून या शतायुषी पक्षाला कसरत करावी लागते आहे. त्यातून काँग्रेसचा जीर्णोद्धार होण्याची बिलकुल शक्यता नसून पुढल्या काळात मार्क्सवादी पक्षाप्रमाणे काँग्रेसही अस्तंगत होत जाणार आहे. त्या पक्षांमध्ये कोणी नेतृत्व करू शकणारा शिल्लक राहिलेला नाही. मोदी व भाजपच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे. कारण आघाडी हा पर्याय नसून एकजीव संघटनेत एकदिलाने काम करणारेच खरे आव्हान उभे करू शकतात आणि प्रस्थापितांमध्ये बदल घडवून आणू शकतात. बाकी कितीही मोठ्या संख्येने भयभीत लोक एकत्र आले, तरी तो निव्वळ जमाव असतो. तो फार काळ एकत्र राहत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -