घरफिचर्सवेगळ्या वाटेवरचा मनसे

वेगळ्या वाटेवरचा मनसे

Subscribe

गुरुवारच्या मुंबईतील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक घोषणा केली. त्यांनी जनतेला सबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, असे आवाहन केले. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा कोणताही पक्ष मग त्याची क्षमता कितीही कमी का असेनात तो जनतेला सत्ता द्या, म्हणून आवाहन करत असतो. त्यासाठी जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध करतो. राज ठाकरे हे एकमेव असे नेते असतील ज्यांनी राज्यातील जनतेला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, असे आवाहन केले आहे. त्यामुळेच राज यांच्या या घोषणेमागे नेमकी नीती काय, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांपासून सर्वसामान्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. तेव्हापासून त्यांच्यावर भाजपा वा मोदी समर्थकांनी सतत तोफा डागलेल्या आहेत. अलीकडल्या काळामध्ये राज यांच्या मनसे पक्षातले अनेक जुने सहकारी त्यांना सोडून गेले आणि मागल्या पाच वर्षात त्यांच्या पक्षाची पुरती वाताहत होऊन गेलेली आहे. त्यातून नव्याने आपला पक्ष व संघटना उभी करण्याची त्यांची धडपड चालू होती. मात्र, इतकी मोदीविरोधी जबरदस्त आघाडी उघडूनही त्यांना अपेक्षित असलेले सहकार्य राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून मिळू शकले नाही. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापर्यंत काँग्रेस आघाडीत मनसे दाखल होण्याच्या बातम्या रंगत होत्या, पण काँग्रेसला ते मंजूर नव्हते आणि राष्ट्रवादीला मनसेची साथ हवी होती. त्यामुळे आधीच मोदीविरोधी भूमिका घेऊन बसलेल्या राजना त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य नव्हते. मग त्यांनी अनपेक्षित पवित्रा घेतला. अखेरच्या क्षणी त्यांनी आघाडीतून वा स्वतंत्रपणे लोकसभा लढवण्याचा नाद सोडून दिला, पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या गदारोळातून अलिप्त राहता येत नाही आणि तसे झाल्यास त्यांची संघटना अधिकच विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे निवडणुका लढवल्या नाहीत, तरी त्यापासून अलिप्त राहता येत नाही. त्यामुळे लढायचे नाही, पण निवडणुकीच्या रणभूमीत टिकायचे; असा पर्याय राजना काढावा लागला. त्यांनी आपले उमेदवार उभे करायचे सोडून दुसर्‍या कुणाचे पाडायचा असा अजब पवित्रा घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार किंवा भाजप-सेनेच्या विरोधातला प्रचार असा त्यांनी कार्यक्रम चालू केला. साहजिकच काँग्रेसला फुकटचा प्रचारक मिळाला; अशीही टीका राजवर झाली.
काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत आघाडीत घ्यायला नकार दिला होता. त्यामुळे विधानसभेतही काँग्रेस राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही राज फुटकचा प्रचार करत होते का? लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि याक्षणी तरी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्यानंतर गर्दी खेचणारा स्टार प्रचारक राज ठाकरेच आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवावी लागत होती, पण विविध काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या भागात मतदारसंघात राज यांनी प्रचाराला यावे किंवा सभा घ्यावी; अशी मागणी करत होते. किंबहुना पवार-राहुलसाठी जितकी मागणी नाही, त्याच्या अनेकपटीने मोदी विरोधासाठी राज यांच्याकडे उमेदवारांची रीघ लागलेली होती. अगदी कालपर्यंत राज व मनसेच्या प्रांतवादी संकुचितपणावर सडकून टीका करणारे मूठभर पुरोगामी सेक्युलरही राजच्या एकाकी झुंजीचे गुणगान करू लागले होते. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे, तर आज महाराष्ट्रात मोदीविरोधी राजकारणाचा सर्वात मोठा लढवय्या किंवा म्होरक्या नेता, अशीच राज यांच्याविषयी जनमानसात प्रतिमा झालेली होती. त्यात सर्व काँग्रेसी वा राष्ट्रवादी नेते मागे पडले होते. अगदी प्रकाश आंबेडकरांचेही नाव पुसले गेले होते. ही त्यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या फुकटच्या प्रचाराची खरी किंमत होती. यात काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे जे निष्ठावान मतदार अनुयायी असतील त्यांना सोडूनही लाखो हजारो मोदी भाजप विरोधक आहेत. जे मनापासून मोदींचा द्वेष करतात व त्यासाठी कोणाच्याही मागे जायला असा वर्ग तयार आहे. त्यांच्यासाठी आता पवार वा अशोक चव्हाण वा तत्सम कुठल्याही नेता किंवा पक्षापेक्षा राज ठाकरे हाच एकमेव प्रभावी पर्याय म्हणून पुढे आलेला आहे. जागेसाठी हुज्जत केली नाही की कुठली सौदेबाजी नाही. आपली सगळी शक्ती मोदी विरोधासाठी निरपेक्षरितीने पणाला लावणारा एकमेव नेता राज ठाकरे आणि एकमेव पक्ष मनसे झालेला आहे. मग असा एक नवा मतदार राजनी या प्रयत्नातून गोळा केलेला आहे. त्याच्याच जमण्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी वा अगदी मुस्लीम वा दलितांचा एक वर्ग राजकडे ओढला गेला आहे.
वरकरणी बघितले तर राज ठाकरे कंबर कसून मोदी-शहा वा भाजप-शिवसेनेला पराभूत करायला मैदानात उतरले होते आणि कसलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी जीवाचे रान केलेले होते. त्यावेळी भाजप वा युतीचे शिवसैनिक समर्थकही राजची त्यासाठी हेटाळणी करीत होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठवित होेते, पण राजनी कितीही प्रचार केला वा रान उठवले, तरी सेना-भाजपच्या एक टक्काही मतांवर परिणाम झाला नाही, पण त्याचवेळी राज यांच्याकडे संशयाने बघणार्‍या समाजघटक वर्गाची राजकडे बघण्याची दृष्टी अचानक बदलून गेली. त्यानंतर जेव्हा निकालातून काँग्रेस, राष्ट्रवादी मोठे यश मिळवणार नाही आणि युतीच विजयी होईल, तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बाबतीत असा कडवा भाजप, मोदी विरोधक पुरता निराश होऊन जाईल. त्याचा ओढा मग अन्य कुणा भाजपविरोधाचे समर्थ नेतृत्व करू शकेल त्या नेत्याकडे पक्षाकडे वळेल. तो पक्ष कुठला असेल? आपसात जागेसाठी भांडून मोदींना विजयी करणारे पवार चव्हाण वा प्रकाश आंबेडकर तसे नेते मानले जातील? की कुठलीही जागा लढवत नसतानाही मोदी विरोधातल्या कोणालाही निरपेक्ष वृत्तीने मदत करणारा राज ठाकरे, असा समर्थ नेता असेल? एकही जागा लढवत नसतानाही राज ठाकरे आपला नवा मतदारसंघ तयार करत होते. आज राज ठाकरे यांनी त्या मतदाराला हाक दिली आहे. मला सत्ता नको, पण सरकारला जाब विचारण्यासाठी सबळ विरोधी पक्षाचे स्थान द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यातून त्यांना आपणच सरकारविरोधी किंबहुना मोदी, भाजपविरोधी ठामपणे उभे राहू शकतो, हेच राज ठाकरे यांना त्यातून सुचवायचे आहे. लोकसभा निवडणुकीत फुटकात भाषण करून राज यांनी जे बीज पेरले आहे आज त्याचे पीक घ्यायला ते सरसावले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा वंचित आघाडी हे सत्ताधारी तर होऊ शकत नाहीत, पण सक्षम विरोधी पक्षही बनू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या जागी आपली विरोधी पक्ष म्हणून निवड करा, असे राज ठाकरे यांनी मतदारांना सुचवले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी फुकटात प्रचार करताना काँग्रेस, राष्ट्रवादीने राज अस्त्र भाजप-सेनेविरुद्ध वापरले. त्यावेळी त्याची किंमत राज यांनी घेतली नाही, पण आज राज ती किंमत घ्यायला सरसावले आहेत. त्यात राज ठाकरेंना किती यश मिळेल हा पुढचा मुद्दा निदान भाजप-सेना कट्टरविरोधी म्हणून मतदार किती साथ देतात, हे राज ठाकरे या निवडणुकीच्या माध्यमातून जाणून घेणार हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -