घरफिचर्ससारांशअवास्तव अपेक्षांचे बळी!

अवास्तव अपेक्षांचे बळी!

Subscribe

विद्यार्थी आत्महत्या का करतात? तेही ऐन तरुणाईत, जेव्हा गुलाबी स्वप्न बघून आयुष्याची खरी चव अनुभवायची असते तेव्हाच हे विद्यार्थी असा चुकीचा विचार का करतात? बर्‍याच वेळेला तरुणाईच्या आत्महत्या ह्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या वेळी किंवा परीक्षेच्या वेळी घडून येतात. एकतर जीवघेणी स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या अपेक्षा यामुळे विद्यार्थी सतत दबावाखाली असतात. यातील बर्‍याचशा आत्महत्या आय. आय. टी., मेडिकल, प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी करतात. त्यानंतर स्पर्धा परीक्षा किंवा आय. आय. टी. आणि मेडिकल यांसारख्या विद्याशाखेत प्रवेश मिळाल्यानंतर तेथील अभ्यासाचे ओझे सहन न झाल्यामुळेदेखील आत्महत्या केल्या जातात.

–डॉ. जयश्री पाटील

१० सप्टेंबर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ जगभर साजरा केला जातो. सगळ्यात जास्त मृत्यूचे प्रमाण रस्ता अपघात असून आत्महत्या हे मृत्यूचे दुसरे कारण मानले जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अपघाती मृत्यू आणि भारतातील आत्महत्या अहवाल २०२१ दाखवतो की २०२० आणि २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीदरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि गेल्या पाच वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. या रिपोर्टनुसार दर दिवसाला ३५ विद्यार्थी आत्महत्या करतात आणि आत्महत्यांचे प्रमाण ४.५ टक्क्यांनी २०२०च्या तुलनेत वाढलेले आहे.

- Advertisement -

विद्यार्थी आत्महत्या का करतात? तेही ऐन तरुणाईत, जेव्हा गुलाबी स्वप्न बघून आयुष्याची खरी चव अनुभवायची असते तेव्हाच हे विद्यार्थी असा चुकीचा विचार का करतात? बर्‍याच वेळेला तरुणाईच्या आत्महत्या ह्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या वेळी किंवा परीक्षेच्या वेळी घडून येतात. एकतर जीवघेणी स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या अपेक्षा यामुळे विद्यार्थी सतत दबावाखाली असतात. यातील बर्‍याचशा आत्महत्या आय. आय. टी., मेडिकल, प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी करतात. त्यानंतर स्पर्धा परीक्षा किंवा आय. आय. टी. आणि मेडिकल यांसारख्या विद्याशाखेत प्रवेश मिळाल्यानंतर तेथील अभ्यासाचे ओझे सहन न झाल्यामुळेदेखील आत्महत्या केल्या जातात.

विद्यार्थी आत्महत्येमागील प्रमुख कारण असते ते म्हणजे दबाव. प्रामुख्याने जे विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षांची तयारी करतात त्यांनी खूप महागड्या कोचिंग क्लासला प्रवेश घेतलेला असतो आणि त्याच्या फीचे ओझे, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, कोचिंग क्लासमधील वेगवेगळ्या बॅचमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला घेतली जाणारी चाचणी किंवा परीक्षेचे ओझे आणि त्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर आपण खालच्या कमी हुशार बॅचमध्ये जाण्याची भीती, मित्रांकडून येणारा दबाव यातून विद्यार्थ्यांमधे खूप मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो आणि हळूहळू हे विद्यार्थी स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. त्यातून नैराश्य आणि चिंता वाढायला लागतात आणि विद्यार्थी आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहचतो. विद्यार्थ्याला अभ्यासापेक्षा स्वत:चे जीवन संपवणे जवळचे वाटते आणि ते स्वत:ला फॅन किंवा एखादा विषारी पदार्थ घेऊन संपवतात.

- Advertisement -

पालकांचा दबाव प्रामुख्याने नैराश्येचे कारण असते. नैराश्य कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बर्‍याच वेळेला पालक आपल्या पाल्यावर अभ्यासाचा खूप दबाव आणतात आणि पाल्याकडून अवास्तव अपेक्षा केल्या जातात. या अवास्तव अपेक्षांमुळे विद्यार्थी मात्र नैराश्येच्या खोल गर्तेत सापडतात आणि मग नको तो मार्ग निवडतात. पालकांनी जर आपल्या पाल्याला मदत केली तर तो या मार्गाकडे न जाता योग्य यशाचा मार्ग निवडू शकतो. सगळ्यात महत्त्वाची पालकांची भूमिका म्हणजे आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता ओळखून त्यानुसार त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी न करता त्याला त्याच्या क्षमतांनुसार प्रोत्साहन देऊन त्यात यश मिळविण्यासाठी मदत केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळेचे व्यवस्थापन ते आवर्जून पालकांनी मुलांना शिकवणे गरजेचे आहे, म्हणजे विद्यार्थी वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतील.

अभ्यासाबरोबरच खेळ, मित्र, सामाजिक संबंध, व्यायाम आणि मनोरंजन महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यालाही वेळ देणे गरजेचे आहे. बर्‍याच घरांमधे दहावी आणि बारावी आली की केबल आणि इंटरनेटचे कनेक्शन काढले जाते. त्यामुळे मुले बाहेर जाऊन या प्रकारचे मनोरंजन शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा घरातच या सुविधा दिल्या तर मुलं नक्कीच अभ्यास करतात. घरात मैत्रीपूर्ण वातावरण ठेवून आपल्या मुलाच्या लहान लहान यशाचे जर कौतुक करून त्याला प्रोत्साहित केले तर ते मूल आनंदाने अभ्यास करेल आणि तणावमुक्त राहील. आयुष्य फक्त परीक्षा आणि त्याचे निकाल असे असू शकत नाही, बरोबर? आयुष्य हा एक प्रवास आहे, ज्यात खूप चढ-उतार असतील. आपल्याला प्रत्येक यश- अपयशांमधून शिकून स्वत:ला सुधारण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -