बद्रीनाथ

Subscribe

मंदिरापाशी येऊन दर्शन घेतले असता तेथे जडीबुटी विकणार्‍या बाबांनी माहिती दिली की हे अतीप्राचीन गरूडमंदिर आहे. गरूडाच्या पंखासारखे म्हणून या गावाला पाखी म्हणतात. येथून गरूडगंगा उतरत जाऊन अलकनंदेत सामावते. गरूडाने बद्रीनाथ धामाच्या दक्षिणेकडील ‘गंधमादन’ पर्वतावर ३०,००० वर्षे दिव्य तपश्चर्या करून भगवान विष्णूचे वाहन होण्याचे सौभाग्य प्राप्त केले. आजही लोक येथील दगडाचा सर्पदंशासाठी औषध म्हणून उपयोग करतात. या नदीपात्रातील छोटा दगड घरात ठेवला असता बाधांपासून मुक्ती मिळते. हे वरदान मिळाल्यानंतर एका शिळेवर बसून पुन्हा तीन दिवस तपश्चर्या गरूडाने केली असता बद्रीनाथांनी पुन्हा साक्षात्कार दिला. आजही ही शिळा बद्रीनाथाच्या मुख्य मंदिरासमोर ‘गरूडशिळा’ म्हणून पवित्र मानली जाते.

–स्मिता धामणे

गंगेच्या पवित्र पात्रात रमे जें… तेही जीवन
जलधीचे भयकारक तांडव… तेही जीवन
सूर्यकरांसह अरूप होऊनी गगनी चढते… तेही जीवन
श्याम…नील…घन…उदार…बरसे…तेही जीवन.

- Advertisement -

उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर असे वसुंधरेचे व्यापक रूप गेली आठ दिवस रात्रंदिनी न्याहाळून…
वसुंधरा माझी सखी…सोबती

अनंत उपकार…
तिचे अमुच्यावरती…
हा अनुभव आम्ही सर्वजण घेत होतो.

- Advertisement -

प्रभू श्रीरामचंद्र, थोर संत महात्म्यांच्या रहिवासाने पावन झालेल्या संतभूमी, पुण्यभूमी नाशिक पुण्यनगरीस सोडून आठ दिवस होऊन गेलेले. आमच्या तनमनात संमिश्र भावनांचा गोंधळ चाललेला. देवभूमीत रममाण होत असतानाच घरच्यांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या. आतापर्यंतचा सर्व प्रवास, दर्शन नितांतसुंदर झालेले. ७ जून केदारनाथ दर्शनाने विश्वनिर्मितीमागील अव्यक्त अशा परमेश्वर शक्तीचा प्रत्यय घडवून दिला होता.

आज ८ जून २०२३. केदारनाथ स्वपायांच्या बळावर चढाई.. उतराई करून पुन्हा लॉजवर येण्यास रात्रीचे दोन वाजलेले. तरीही आम्ही सकाळी पाच वाजता तयार होतो. काही सोबती अजून उशिरा आलेले म्हणून सकाळी नऊ वाजता बद्रीनाथ प्रवासास ‘जय शंभो भोलेनाथ’च्या गजरात सुरुवात केली. आज साधारण २०० किलोमीटरचा प्रवास पवित्र मंदाकिनी आणि बर्फाच्छादित ‘चौखंबा’ पर्वत शिखरांच्या मांदियाळीसोबत होणार होता. साधारण ४५ किलोमीटर अंतरावर उखीमठ नंतर चोप्ता.. मंडल.. बंडवारा.. गोपेश्वर अभयारण्य.. नेचे, बेल, देवदार, साग अशा गर्द वनराई.. भरपूर हरीण, माकडे इतर पशुपक्षी यांच्या मुक्तसंचारासोबतच सर्पाकृती अन् हिरव्या नव्याकोर्‍या पैठणीतल्या डोंगररांगा… सुखद वाट संपूच नये असे सारखे वाटत होते.

हरणांचा फार मोठा कळप बघून गाडी बाजूला थांबवून क्लिकक्लिकाट करून घेतला. उत्तराखंड सरकारने पर्यटन वाढीसाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. फुलोंकी घाटी, हिमकुंड साहिब, गोविंद घाट अशी सुंदर स्थळे पार करत आम्ही जात होतो. पुढच्या भेटीत बघण्यासाठी मी बाजूला ठेवत होते. आमच्या जवळील खाद्यपदार्थ सर्वांसोबत खाण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता. सदैव आठवणीत ठेवावासा वाटणारा प्रवास आम्हास चमोली, बिराही पार करत १५ किलोमीटरवरील पाखी गरूड गंगा येथे केव्हा घेऊन आला ते कळलेही नाही.

रूम मिळाल्यानंतर बरेच सहप्रवासी विश्रांती करत निद्राधीन झालेले. आवरसावर करून आम्हीही बाहेर आलो. हॉटेलमधील नदीकडच्या बाजूने असलेल्या टेबल-खुर्चीवर बसून चहाचे घोट घेत समोर बघितले.. तो.. छान.. नितळ.. स्फटिकजल असलेली गरूडगंगा नदी मोठमोठ्या शिळा.. कातळ यांना पार करत छोटा धबधबा तयार करून अतिशय मंजुळ स्वरात भगवान श्रीकृष्णाचे वाहन गरूडाचे मंदिर, त्याच्या पायर्‍यांना.. मंदिराला स्पर्श करून पुढे जात होती.

उगवतीलाच नमस्कार करण्याची जगाची रीत, परंतु हा संधीकाळ, कातरवेळ मला नेहमीच लोभस वाटते अन् खुणावतेही. प्रत्येक सांज.. सूर्यास्त अनुभवला म्हणजे जीवनातील तो दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतोय. पुलावरून नदीपात्रापाशी आलो. आकाशाकडे नजर टाकली तो काय? संध्याराणीच्या दरबारात ‘मेघमल्हार’ मस्त रंगला होता. कृष्णकाळ्या मेघांची दाटीवाटी, स्तब्ध वारा, कुंद वातावरण, पडणारे थेंबांचे मोती नदीपात्रातील पाण्यात छान नक्षी निर्माण करत होते. नदीपात्रातील पाणीही त्यांना स्वतःत आपणहून सामील करून घेत होते. आजूबाजूची छोटी झुडूपे, लता-वेलींवरील पाने-फुले त्या तालावर डोलत होती, दाद देत होती. आमच्या मनमोरातील प्रसन्नतेचा पिसारा थुईथुई नाचू लागला. कोसळणारे पाणी, धबधबे, खडक, हिरवेगार डोंगर ह्या सर्वांसोबत फोटो.. व्हिडीओ.. काढण्याचा मनमुराद आनंद घेतला. क्षणात वातावरण बदलले. जणू आम्हा सर्वांना आनंद देण्यापुरत्याच पाऊसधारा बरसलेल्या.

मंदिरापाशी येऊन दर्शन घेतले असता तेथे जडीबुटी विकणार्‍या बाबांनी माहिती दिली की हे अतीप्राचीन गरूडमंदिर आहे. गरूडाच्या पंखासारखे म्हणून या गावाला पाखी म्हणतात. येथून गरूडगंगा उतरत जाऊन अलकनंदेत सामावते. गरूडाने बद्रीनाथ धामाच्या दक्षिणेकडील ‘गंधमादन’ पर्वतावर ३०,००० वर्षे दिव्य तपश्चर्या करून भगवान विष्णूचे वाहन होण्याचे सौभाग्य प्राप्त केले. आजही लोक येथील दगडाचा सर्पदंशासाठी औषध म्हणून उपयोग करतात. या नदीपात्रातील छोटा दगड घरात ठेवला असता बाधांपासून मुक्ती मिळते. हे वरदान मिळाल्यानंतर एका शिळेवर बसून पुन्हा तीन दिवस तपश्चर्या गरूडाने केली असता बद्रीनाथांनी पुन्हा साक्षात्कार दिला. आजही ही शिळा बद्रीनाथाच्या मुख्य मंदिरासमोर ‘गरूडशिळा’ म्हणून पवित्र मानली जाते.

दर्शन घेऊन निवांत बसलो असता सहजच मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली. कोण्या एका हळव्या क्षणी मानवाला मर्यादांची जाणीव झाली. अगतिकतेनं त्याला घायाळ केलं असणार. अमूर्त, अनादी, अनंत दिव्यत्वाची साक्ष पटून ‘देव’ ही अतिरम्य, भव्य, उच्च कल्पना स्फुरली असणार. भौतिकाला अध्यात्मिक अधिष्ठान, उंची, खोली देणारं मूर्त झालं. एखाद्या किमती हिर्‍याला कुशल सोनार जसा कोंदणात बांधतो तसं पावित्र्य, मांगल्य, शुचिता यांच्या त्रिवेणी संगमातून देवासाठी मंदिर अस्तित्वात आणलं. सारी मंदिरे मला मानवाच्या मनाच्या उदात्ततेची प्रतिकं वाटतात.

देह देवाचे मंदिर… आत असे आत्माराम…

प्रत्येक मंदिराला केवढा तरी इतिहास, भूगोल असतो. प्रत्येक स्थापत्य रचनेमागे शास्त्र, अर्थ, तत्त्व भरलेले असते. प्रत्येकाची एक विशिष्ट सौंदर्य रचना असते. आपण फक्त उघड्या डोळ्यांनी समजावून घ्यायला हवी. कोणीतरी भाविकाने येऊन केलेला घंटानाद माझ्या मनमंदिरात निनादत राहिला. आम्ही जड अंतःकरणाने उठून मंदिराचा निरोप घेतला. सर्वजण जेवायला बसलेले. आम्हीसुद्धा जेवण करून थोड्या गप्पा मारत दुसर्‍या दिवसाची तयारी करून गरूड गंगा नदीच्या अविरत प्रवाहाच्या आवाजात निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

९ जून २०२३… सकाळी पाच वाजताच शुचिर्भुत होऊन सर्व तयारीनिशी बाहेर पडलो. अंधाराचे जाळे फिटू लागलेले. उषाराणी रजनीला निरोपाचे विडे देण्याचे काम चोख बजावत होती. निरोप समारंभास पक्ष्यांचा किलबिलाट होताच. मंद, शीतल, मरुतराणा त्याची वार्ता पसरवत होता. अरुणाच्या रथात बसून रविराज अवकाश भ्रमंतीस निघणार तोच केशरी रंगाची उधळण आकाश अंगणात झाली. निळ्या आकाश अंगावर ही उधळण मोहवून टाकत होती. कुठे आणि किती किती बघू.. सारे.. सारे.. कोठे साठवू असे मला झाले. पवित्रता, मंगलता, प्रसन्नता यात सारी सृष्टी न्हाऊन निघत होती. चराचरामधील चैतन्य आमच्यात सामावत होतं. पुन्हा एकदा दर्शन घेऊन ह्या सार्‍या निसर्गाला सहकार्‍यांसोबत कैद करून चहा घेऊन बद्रीनाथ भगवान की जयच्या गजरात प्रवासास सुरुवात केली.

या मुसाफिरीत आम्हाला पंचप्रयाग दर्शन घडले. भागीरथी आणि अलकनंदेचा संगम म्हणजे ‘देवप्रयाग’. भागीरथी गंगा बनते. मंदाकिनी आणि अलकनंदेचा संगम म्हणजे ‘रुद्रप्रयाग’. संगमावर ‘रुद्रेश्वर’ महादेवाचे मंदिर आहे. येथेच नारदांनी आराधना करून महादेवांकडून ‘वीणा’ प्राप्त करून घेतली होती. शंखाकृती पर्वत शृंखलांना पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. यदुराजांच्या राजधानीचे ठिकाण ‘नंदप्रयाग’ अलकनंदा आणि मंदाकिनी संगम. अलकनंदा आणि नंदावती संगम ‘कर्णप्रयाग’ तर अलकनंदा आणि कर्णावती संगम..‘विष्णूप्रयाग’ म्हणून ओळखला जातो. नंतर पांडुकेश्वर, हनुमानचट्टी असा प्रवास करत साडेनऊ वाजता विशाल बद्रीनाथला पोहोचलो.

मोठ्या आणि छोट्या चारधामांपैकी एक धाम, पंचबद्रीतील विशाल बद्री, भगवान विष्णूच्या आठ स्वयंभू तसेच १०८ दिव्यस्थानांपैकी एक स्थान. असा महामहिमा असलेले हे तीर्थस्थळ उत्तराखंड राज्यातील चमोली जनपद येथील ‘अलकनंदेच्या’ प्रवाहापासून फक्त ५० मीटर अंतरावरील उंच जमिनीवर विशेष म्हणजे नदीच्याच दिशेने प्रवेशद्वार असलेले बौद्धविहारासारखी स्थापत्यकला असलेले हे मंदिर दूरवरून आपले लक्ष वेधून घेते. आठव्या शतकात जगद्गुरू आदी शंकराचार्य ह्यांनी सहा महिने राहून सनातन हिंदू धर्माच्या जनजागृतीसाठी ह्या मंदिराचे पुनरूज्जीवन केले. तीर्थक्षेत्र म्हणून स्थापना करून कनकपाल या गढवाल राज्यकर्त्यांकडे व्यवस्थापनासाठी दिले. कालांतराने बद्रीनाथ हे नाव प्रचलित झाले. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराच्या कलशावर सोन्याची छत्री चढवली होती. भगवान शंकरांनी ह्या देवभूमीत विष्णू म्हणजेच बद्रीनाथांसाठी जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून प्रथम केदारनाथ मग बद्रीनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा पांडवांपासून आजतागायत सुरू आहे.

गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून खूप लांबपर्यंत असणार्‍या दर्शन रांगेत आम्ही उभे राहिलो. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला ‘नीळकंठ’ पर्वत आणि त्याचा सारा गोतावळा दाट धुक्याचा पडदा बाजूला सारून अधूनमधून दर्शन देत होते. दोन -अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर ‘सिंहद्वार’ प्रकारातील प्रवेशद्वारातून जात असताना दरवाजावरील तीन सोनेरी कलश आणि छताच्या मध्यभागावरील विशाल घंटा आपले लक्ष वेधून घेते. सभामंडप, दर्शनमंडप, गर्भगृहातील बद्रीनारायणाची साधारण एक मीटर उंची असलेल्या शालिग्राम मूर्तीच्या दर्शनाने सारा थकवा नाहीसा झाला. भगवान विष्णूसोबत नारद, उद्धव आणि नरनारायणाच्या मूर्ती आहेत. मंदिराभोवती नारायणाचे वाहन गरूड, लक्ष्मी आणि नवदुर्गा आहेत. देवाच्या चार प्रमुख निवासस्थानांपैकी एक पवित्र स्थान का आहे ह्याची अनुभूती प्रत्यक्ष दर्शनानेच आपणास होते.

पृथ्वीवर गंगा नदीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी बद्रीनाथ मंदिरात माता मूर्तीचा मेळा हा महोत्सव बद्रीनाथाच्या आईची पूजा करून केला जातो. मुख्य मंदिरापासून ३ किलोमीटर अंतरावर नारायणाच्या मातेचे छोटेसे मंदिर आहे. भाद्रपदातील द्वादशीला मेळा भरतो तेव्हा स्वयं नारायण मातेच्या दर्शनाला येतात अशी आख्यायिका आहे. खरोखर आपला हिंदू सनातन धर्म कृतज्ञता आणि विनम्रता शिकवणारा अत्यंत महान असा धर्म आहे. जून महिन्यात बद्रीकेदार हा महोत्सव केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात लाखो देशविदेशातील भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. पुरातन वैदिक काळापासून आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांचे ज्ञान आणि कर्तृत्व अचाट आणि अफाट असे आहे. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले असताना अत्यंत हुशारीने माता लक्ष्मीने बद्री वृक्षाच्या रूपात भगवान विष्णूचे रक्षण केले. त्यांनी प्रसन्न होऊन त्या ठिकाणाला ‘बद्रिका आश्रम’ नाव दिले. मोठी बेरी म्हणून बद्री विशाल. बद्रीचा स्वामी म्हणून बद्रीनाथ म्हणतात. प्राचीन काळी प्रत्यक्ष सिद्ध गंधर्व येऊन बद्रीनाथाची पूजा करत असत. आता ‘रावल’ करतात. बाहेर येऊन नतमस्तक होताना

जाणीव झाली…
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी…
तेणे मुक्तीचारी… साधीयली.

बद्रीनाथाच्या दर्शनाची पवित्र स्पंदने आणि कृतार्थभाव सोबत घेऊन आम्ही अलकनंदेच्या समोरच्या किनारी असलेल्या माना आपल्या भारत-चीन सीमेवरील १०१३३.५ फूट उंची आणि लोकवस्ती असलेल्या शेवटच्या गावी जाण्यास निघालो. डोंगर उतरणीवरची शेते मन आकर्षित करत होते, तर रानफुलांचा गंध चित्तवृत्ती उल्हासित करत होता. घरांच्या आजूबाजूला भाज्यांची शेती केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम विकास होत आहे. स्वच्छता, टापटीप, नदीच्या बाजूने संपूर्ण बॅरिकेड्स, स्वच्छ प्रसाधनगृह, भरपूर दुकाने खाण्यापिण्याची, होमस्टेज. पारंपरिक ‘भूतीया’ जमातीच्या वनवासी स्त्रियांची कष्टाळू वृत्ती शेतीकामे, वीणकाम करून घराबाहेर लावलेल्या विणलेल्या वस्तूंच्या दुकानांमधून तसेच प्रत्येक घराबाहेरील भिंतीवर असलेल्या सुंदर ‘पेन्टिंग्स’मधून परावर्तीत होत होती. येथून जात असतानाच उजव्या हाताला ‘माता सरस्वती’ची सुंदर, नाजूक, पांढरीशुभ्र संगमरवरी मूर्ती कातळ डोंगरात दिसली.

पूजा करून नतमस्तक होऊन पुढे येताच दोन्ही बाजूंनी उचलल्या गेलेल्या कातळ डोंगरांच्या मागून अतिशय धसमसत आणि गर्जना करत येणारी सरस्वती अतिशय वेगाने येऊन स्वत:ला अलकनंदेत झोकून देते. हा संगम केशव प्रयाग होय. सरस्वती ही अलकनंदेची प्रमुख उपनदी असून तिचा उगम ‘रुपण ’.. हर.. की.. दून नावाच्या हिमनगातून होतो. ज्ञान.. बुद्धी.. संगीत.. आणि सृजनाची देवता असलेली सरस्वती चक्क १५०० किलोमीटर लांब आणि ३ ते १५ किलोमीटर रुंद आहे. भूकंपामुळे कातळ वर उचलले गेल्याने तिचा प्रवाह जमिनीत लुप्त झालेला दिसतो. आता मातेचे फार मोठे मंदिर बांधकाम सुरू आहे. हे सर्व बघत असताना तिचे गार तुषार आम्हाला ताजेतवाने करून जात होते. स्वर्गात जात असताना बलशाली भीमाने मोठमोठ्या कातळशिळा उचलून आपल्या भावंडांसाठी आणि द्रौपदीसाठी बांधलेला पूल भीमपूल म्हणून ओळखला जातो. अत्यंत थकल्याने द्रौपदी स्वर्गापर्यंत जाऊ शकली नाही. भीमपुलापासून फक्त ५० मीटर इतक्याच अंतरावर तिचे जय माँ त्रिपूर बाला सुंदरी या नावाने छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पळतच जाऊन दर्शन घेऊन आले.

प्रथम दुकानातील चहा आम्ही सर्वांनी घेतला. व्यास गुंफा.. व्यास पोथी नावाचा डोंगर.. खरोखर छताची रचना ग्रंथाच्या पानांप्रमाणे असलेल्या कातळासमान आहे. विशालकाय पुस्तकच डोंगरावर ठेवल्यासारखी कातळरचना बघतांना अद्भुत वाटत होते. खरोखर माझा हिंदू सनातन धर्म महान असल्याची ग्वाही आम्हास मिळत होती. येथेच महर्षी वेदव्यासांनी वेद, पुराणे, गणेशासोबत महाकाव्य महाभारत यांच्या रचना रचल्यात. बाजूलाच छोटीशी गणेशगुंफाही आहे. येथूनच पाच किलोमीटर पुढे वसुंधरा कुंड आणि २५ किलोमीटर पुढे स्वर्गारोहिणी आहे. येथील निर्मोही वातावरण अपार आनंद देत होते. सारं.. सारं नजरेत.. मनात.. हृदयात साठवून.. आठवण म्हणून काही वस्तूंची खरेदी करून भरलेल्या अंतःकरणाने परतीचा मार्ग धरला.

गाडीत आसनस्थ झाल्यावर सहजच मनात आले..काय म्हणावे ह्याला.. प्रथम दिवशीच पर्वत रांगेतून सुसाट वेगाने.. मोकाट आलेला मोठा दगड गाडीच्या जाड गजाला लागून शांत होऊन खाली पडतो. ह्या दहा दिवसात कृष्ण घनांचे तांडव, मेघराजाचा मेदिनीसोबतचा धसमुसळेपणा, वार्‍याचा जटा आपटणारा आडदांडपणा, थेंबांसोबत बेभान नाचणारा, मेघांच्या पखवाजाच्या गर्जनेसोबत शंख फुंकणार्‍या रुद्रावतारापासून आम्ही वंचित राहिलो. कोठेही वादळ, घाबरविणारा पाऊस, अतिकडक ऊन, रस्ता बंद, दर्शन थांबले.. असे कोठेही झाले नाही. याउलट वैभवशाली हिमशिखरे.. जंगले.. कृतार्थतेने वाहणार्‍या पवित्र नद्या.. दुधाळ.. नजर तृप्त.. तृप्त करणारे धबधबे.. थंड.. बदलणारे वातावरण.. कष्टप्रद परिस्थितीतसुद्धा भगवंताने दिलेले लोभस.. कृतार्थ करणारे दर्शन.

खरोखरंच ह्या आठवणी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशाच ताज्या अन् इतक्याच सुगंधीत राहून आनंद देत राहतील. जणू सर्व निसर्गाची सुखावह ‘पाखर’ ब्रह्मा.. विष्णू.. महेशाने आमच्यावर धरली, आम्हास सुखरूप घरी पोहचवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -