Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश बॉक्स ऑफिस पुन्हा गजबजलं!

बॉक्स ऑफिस पुन्हा गजबजलं!

Subscribe

सिनेमा फक्त तीन गोष्टींमुळे चालतो… इंटरटेनमेंट, इंटरटेनमेंट आणि इंटरटेनमेंट… विद्या बालनचा हा डायलॉग कित्येकदा आपण ऐकला असेल. पण याहून अधिक उघड सत्य हे आहे की, सिनेमा हा फक्त आणि फक्त प्रेक्षकांमुळे चालतो. थिएटरमध्ये होणार्‍या सिनेरसिकांच्या गर्दीमुळे चालतो. बॉक्स ऑफिसवर जमणार्‍या बक्कळ गल्ल्यामुळे चालतो. मात्र, कोरोना महामारीत हे सिनेमागृहदेखील बंद होते. कोरोनामुळे गेल्या काही काळापासून वारंवर देशात लागू करण्यात येणारे निर्बंध असो किंवा लॉकडाऊन असो सिनेमा मेकर्ससह कलाकारांचे डोळे देखील मोठा पडदा कधी उघडतो याकडे लक्ष लागून राहिले होते. आता ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमा पुन्हा बहरू लागला आहे. हॉलिवूड, बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमा त्याचबरोबर मराठी सिनेसृष्टीनेही भरगच्च गल्ला जमवत कोट्यवधी रुपयांची कामाई केली. यातील अनेक सिनेमे हे फक्त थिएटर्समध्येच रिलीज करण्याचा अट्टाहास सिनेनिर्मात्यांनी घेत ‘सुर्यवंशी’ सारखा बिग बजेट सिनेमा अखेर ५ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. शिवाय ‘झिम्मा’, ‘पांडू’ या मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदाच्या वर्षात अवघ्या काही दिवसांसाठी गजबजणार्‍या चित्रपटगृहांचा घेतलेला हा आढावा….

‘झिम्मा’, ‘पांडू’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

मराठी प्रेक्षकही गेल्या काही काळापासून मोबाईलच्या स्क्रिनवर वेब सीरिज, सिनेमा पाहून पूरते वैतागले होते, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर अनेकांनी आपल्या कुटुंबासह सिनेमागृहात हजेरी लावली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा मराठीतील पहिला सिनेमा लॉकडाऊननंतर सिनेमागृहात झळकणारा पहिला चित्रपट ठरला. या सिनेमाने तर अनेक रेकॉर्ड ब्रेक करत समिक्षकांच्या कौतुकाचीही थाप मिळवली. या पाठोपाठ आलेल्या ‘पांडू’ सिनेमाने सर्वांचा मूड हलका आणि फ्रेश करण्यासाठी भाऊ कदमच्या कॉमेडीसह सोनालीच्या हॉटनेसचा तडका या सिनेमाला लाभल्यामुळे प्रेक्षकदेखील ही आगळीवेगळी जोडगोळी पाहून सुखावले. मराठी प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना भरभरून प्रेम दिले. कदाचित गेल्या काही काळापासून कोरोनाचे निर्बंध, लॉकाडाऊन यामुळे वैतागलेल्या लोकांनी निर्बंध शिथिल होताच बाहेर पडण्यास सुरुवात केल्याने सिनेमा मेकर्सलाही याचा प्रचंड फायदा झाला. पुढील वर्षात ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘बलोच’, ‘मी वसंतराव’, ‘गोदावरी’, ‘पावनखिंड’ यासारखे बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहेत.

‘सुर्यवंशी’ जेमतेम, तर ‘८३’ ब्लॉक बस्टर
- Advertisement -

दरम्यान, हिंदी सिनेसृष्टीने देखील सिनेमा रिलीज करण्याचा सपाटाच लावला. प्रदर्शनाच्या वाटेवर असणारे अनेक सिनेमा हे एकापाठोपाठ एक रिलीज होत गेले. मात्र निवडक कलाकारांच्या सिनेमालाच प्रेक्षकांनी दाद दिली. हे सिनेमे म्हणजे ‘अंतिम’, ‘सुर्यवंशी’, ‘८३’. यासह काही सिनेमे आगामी काळात प्रदर्शित होणार असून त्याच्या प्रमोशनची तयारी सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य सिनेकलाकारांचे अनेक सिनेमे रिलीज होऊ लागल्याने आगामी काळात बॉलिवूडला देखील त्यांचा कंटेन्ट चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडावा लागणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बहुचर्चीत कलाकारांनी आता बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. याापैकी सध्या ‘आरआरआर’, ‘राधेश्याम’, ‘केजीएफ चॅप्टर २’, ‘लायगर’ या सिनेमांची हवा आहे. यामध्ये जरी बॉलिवूड कलाकारांना महत्वाचे स्थान असले तरी हे सिनेमे प्रामुख्याने दाक्षिणात्य पठडीतले आहेत. आधीच बॉलिवूडच्या अर्ध्याहून जास्त सिनेमांमध्ये कंटेट नसतो, अशी बोंब सगळीकडे उठली आहे. त्यात दाक्षिणात्य कलाकार सादर करत असलेला उत्तम परफॉर्मन्स पाहून बॉलिवूडला उतरती कळा लागली आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारे नेपोटीजम, कास्टिंग काऊच हे काही नवे नाही. यात आणखी भर म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या मागे लागलेला ईडी आणि एनसीबीचा ससेमीरा. गेल्या काही काळापासून बॉलिवूडची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गाजत आहे. प्रेक्षक तसेच चाहत्यांसमोर कलाकाराची इमेज डाऊन होत आहे. आगामी सिनेमा रिलीज करताना बॉलिवूडकरांना सावधानतेने पाऊले उचलावी लागणार आहेत. नुकताच रिलीज झालेला ‘८३’ हा सिनेमा तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची गर्दी जमवण्यास यशस्वी ठरला आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. १९८३ साली भारताने पटकावलेल्या वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक घटनेवर हा सिनेमा बेतलेला आहे. अर्थात अभिनेता रणवीर सिंहने यामध्ये जीव ओतून काम केले आहे. यासह अनेक धुरंदर कलाकारांची फळी सिनेमात आहे. ‘८३’ या सिनेमाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ख्रिसमस आणि नववर्षाचे निमित्त साधून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सिनेमा रिलीज झाल्याने याचा आर्थिक फायदा मेकर्सला झाला आहे.

हॉलिवूडपटांचा प्रेक्षकवर्ग कायम

भारतामध्ये हॉलिवूडपटही तितक्याच आवडीने पाहिले जातात. नुकताच रिलीज झालेला ‘स्पायडर मॅन नो वे टू होम’ या मार्वल सीरिजने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. मार्वलचा स्पायडरमॅन अर्थातच आपला पिटर पार्कर गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. हॉलिवूड सिनेमाप्रेमी मार्वलची प्रत्येक सीरिज पाहिल्याखेरीज राहत नाहीत. मार्वलने त्याचा एक वेगळा स्वतंत्र असा फॅनबेस भारतात तयार केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जरी ओटीटीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची धुरा सांभाळली असली तरी भारतीय प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्याची भूरळ अद्याप कायम आहे. गेल्या काही काळापासून संपूर्ण मनोरंजन सृष्टीला या वाईट दिवसाचा सामना करावा लागला. अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हायरस पसरण्याची भीती कायम आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेत थिएटर्स ५० टक्के आसन क्षमतेसह खुली करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, अशा परिस्थितही अनेक सिनेमाने आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने या दिवसात आपली मक्तेदारी कायम ठेवत अनेक सिनेमांना कोट्यवधी रुपयात खरेदी करत बक्कळ पैसा कमावला. दरम्यान, ओटीटीवाल्यांची डीमांड पाहत मराठी सिनेसृष्टीचे काही निवडक सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले. मात्र, त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. आता सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारही प्रचंड सुखावले आहेत.


- Advertisement -

हे हि वाचा –  भारतीय महिलांची गगन भरारी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -