घरफिचर्ससारांशआला हिवाळा, आहार सांभाळा!

आला हिवाळा, आहार सांभाळा!

Subscribe

एकतर दिवाळीत फराळ खाऊन मस्त वजन वाढलेय. त्यात आता ही थंडीही वाढतेय. अशा वेळी नेमका काय आहार घ्यावा, असा प्रश्न अनेक जण विचारतात. वजनही वाढणार नाही आणि थंडीपासून बचाव होईल असा आहार या काळात आवश्यक असतो. कडाक्याची थंडी सुरू झाल्याने या काळात शरीर गरम ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की या थंडीमुळे तुम्ही आजारी पडू नये तर उष्ण गुणधर्म असणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात करा.

-मानसी सावर्डेकर

हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, मांसाहार, सुकामेवा (ड्रायफ्रूट) असे पदार्थ खावेत. हिवाळ्यात आहारात गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. भाकरीबरोबर लोणी किंवा तूप खावे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत फक्त सर्दी-पडसं, खोकला, ताप अशाच समस्या उद्भवत नाहीत, तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इतर गंभीर आजारही शरीराला विळखा घालतात, पण जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला व यथायोग्य काळजी घेतली तर सर्दी-पडसंच काय तर इतर गंभीर आजारांपासूनही तुम्ही दूर राहू शकता.

- Advertisement -

दालचिनी : हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचं मेटाबॉलिजम वाढतं, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जेव्हा स्किन ड्राय होते तेव्हा दालचिनी पावडर गुलाबजलमध्ये मिसळून तुम्ही त्वचेवर लावू शकता. दालचिनीचे पाणी प्यायल्याने खोकला व लठ्ठपणावर मात करता येते.

मोहरीचं तेल : मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे, जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतो. सफेद व काळ्या रंगाच्या मोहरीमध्ये एलिल आइसोथियोसाइनेट नामक घटक आढळतो, जो आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवतो.

- Advertisement -

साजूक तूप : हिवाळ्यात साजूक तुपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते. तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. कारण तुपात फॅटी अ‍ॅसिड असतं. हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू, हलवा, शिरा, उपमा असे पदार्थ खाणं लाभदायक ठरू शकतं. तुपात त्वरित ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी तूप फायदेशीर ठरते.

गूळ : गुळात भरपूर प्रमाणात कॅलरीस असतात. थंडीच्या दिवसांत शरीरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते, ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार उद्भवतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे. हिवाळ्यात मंदावलेली पचनशक्ती सुधारण्यासाठीही गुळाचा वापर करता येतो. जेवणानंतर छोटासा सुपारीएवढा गूळ जरी खाल्ला तरी चालू शकते. फक्त खूप जास्त नाही खायचा. गुळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही जीवनसत्त्वे असल्यामुळे थकवा दूर होतो. घसा आणि फुप्फुसातील संक्रमणापासून वाचण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते त्यांनी आपली साखर तपासूनच गुळाचे सेवन केलेले चांगले. गूळ शेंगदाणे किंवा तीळगूळ असं कॉम्बिनेशन आपण हिवाळ्यात खातोच हे आपल्याला माहितीच आहे.

ड्रायफ्रूट : शेंगदाणे, बदाम, पिस्ता, काजू असे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत हे गरम असतात. त्यामुळे ते आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात. म्हणून हिवाळ्यात हे अतिशय चांगले असतात. त्यामुळे आपल्याला ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मिळतात. तसेच याच्यात विटॅमिन्स मिनरल्सही मिळतात. त्यामुळे ते आपली भूक शांत करायला मदत करतात. आपल्याला सारखी भूक लागते. हिवाळ्यात ते वेदनाही कमी करतात. फक्त ड्रायफूट्स खाल्ल्या खाल्ल्या पाणी प्यायचं शक्यतो टाळावं.

केशर : केशरचा सुगंध व स्वाद एखाद्या स्ट्रेसबस्टरचे काम करते. एक कप दुधात ४ ते ५ केसरच्या कांड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते. तसेच केशर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते आणि याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो. याच्या सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.

तीळ : तिळाचा वापर चिक्की व इतर हिवाळ्यातील मिठायांमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात. यात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि ते आपली इम्युनिटी वाढवायचे काम करते, म्हणूनच तीळ हिवाळ्यात चिक्कीच्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा लाडूच्या कॉम्बिनेशनमध्ये गुळाबरोबर, शेंगदाण्याबरोबर आपण खातो.

आलं : आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी औषधांच्या स्वरूपातदेखील वापरलं जातं. आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतं, ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यांसारखे आजार दूर होतात. खवखवणार्‍या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं. आता आलं फक्त चहातच घ्यायचं असं म्हणून बसू नका. रोजच्या आहारात रोजच्या भाज्यांमध्ये त्याचा वापर करायला सुरुवात करा. आलं घ्यायचं म्हणून चहा प्यायचा, म्हणून लागले चहा प्यायला असं प्रमाणाच्या बाहेर करू नका. आल्यामुळे डायजेशन सुधारते. पचनशक्ती वाढते आणि ब्लड शुगर कंट्रोल करायलाही मदत मिळते.

रताळे : हिवाळ्यात रताळं खाणं म्हणजे खरंच खूपच चांगली बाब आहे. कारण त्यामध्ये भरपूर विटॅमिन ए असतं. फायबर्स असतात. अँटीऑक्सिडंट असतात. मिनरल्सही मिळतात आणि त्यामुळे तो एक चांगले पोषणमूल्य देणारा पदार्थ ठरतो.

संत्री, लिंबू : हिवाळ्यात बर्‍याच लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. अशा वेळी आपल्याला भरपूर विटॅमिन सी देणार्‍या या दोन फळांना कधीच आहारातून वगळू नका. फक्त ज्यांना अगोदरच सर्दी-खोकला झालाय त्यांनी थोडे दिवस हे टाळायचं. एकदा तो बरा झाला की तुम्ही ते हळूहळू वाढवू शकता. याचा घेण्याचा चांगला पर्याय म्हणजे लिंबाला प्रत्येक गोष्टीत तुम्ही भाज्यांमध्ये किंवा वरण भातात वगैरे अशा प्रकारे तुम्ही पिळून त्याचा वापर करू शकता. खूप आंबट संत्र खायचं नाही.

थोडक्यात काय तर हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळेल, ते पदार्थ आपल्याला मानवेल त्या प्रमाणात खावेत. हिवाळा हा व्यायामासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. जर योग्य आहाराला व्यायामाची जोड दिली तर तुमचे वजनही वाढणार नाही आणि तुम्ही सुदृढही राहाल. नियमित ४० ते ४५ मिनिटे व्यायाम करा. छान पौष्टिक खा आणि तुमचा हिवाळा आरोग्यपूर्ण घालवा. (ही संपूर्ण माहिती आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून घेतलेली आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -