घरफिचर्ससारांशशेतकर्‍यांची दिवाळी!

शेतकर्‍यांची दिवाळी!

Subscribe

भारतीय शेती क्षेत्राचा ढोबळमानाने विचार करता आर्थिकदृष्ठ्या शेतकर्‍यांचे दोन गट पडलेले दिसतात. एका बाजूला गडगंज श्रीमंत असणारे शेतकरी आणि दुसर्‍या बाजूला अत्यंत गरीब असणारे शेतकरी. यात प्रामुख्याने गडगंज श्रीमंत असणार्‍या शेतकर्‍यांमध्ये जमीन-जुमला, घरदार, शेतीवाडी, नोकर-चाकर, सोने-नाणे यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अशा शेतकर्‍यांची दिवाळी प्रत्येक वर्षी जोरात साजरी होते, परंतु दुसर्‍या बाजूला अत्यंत गरीब शेतकर्‍यांचा एक फार मोठा वर्ग आपणास दिसून येतो. त्यांचे मात्र बरेचदा दिवाळे निघालेले दिसते.

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठे हिंदू राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख हा जगभरात मोठ्या अभिमानाने केला जातो. भारताचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला तीन क्षेत्रे आहेत. शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र यापैकी भारतीय अर्थव्यवस्थेत जवळजवळ ६० टक्के नागरिकांच्या चरितार्थाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या असणारे साधन म्हणजे शेती होय. शेतीतून देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. देशातील नागरिकांच्या अन्नधान्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते.

- Advertisement -

तसेच अन्नधान्य, फळे, फुले, प्रक्रियायुक्त पदार्थ यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच शेतकरी होय. या शेतकर्‍यांची दिवाळी हीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. भारतात अतिप्राचीन कालावधीपासून शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. किंबहुना भारत हा कृषिप्रधान देश आहे, अथवा भारताची संस्कृती कृषिप्रधान आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे.

वर्षभरातील आनंदाच्या अनेक सणांपैकी एक अत्यंत मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. शेतकर्‍यांना वर्षभरात त्यांनी पिकवलेल्या पिकाचे जर चांगले पैसे मिळाले तर शेतकर्‍यांची दिवाळी मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत आनंदात साजरी केली जाते, परंतु शेती क्षेत्रातील विविध नाशवंत पिकांच्या किमती बाजारात सातत्याने बदलत असतात. त्यामुळे अनेकदा शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कित्येक वेळेस उत्पादन खर्चदेखील भरून येत नाही इतकी कमी किंमत शेतकर्‍यांना मिळते. या वर्षभरात आपण कांदा आणि टोमॅटो यांचे दर अत्यंत कमी झालेले पाहिलेत.

- Advertisement -

या परिस्थितीमध्ये काही शेतकर्‍यांचा त्या पिकाच्या उत्पादनावर येणारा उत्पादन खर्चदेखील भरून निघाला नाही. अशा प्रकारे ज्या पिकाचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही अशी पिके रस्त्याच्या कडेला, बाजारपेठेच्या बाजूला किंवा इतरत्र शेतकर्‍यांनी फेकून दिलेली आढळतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पीक तयार करत असताना आलेला खर्चदेखील भरून निघत नाही. त्यामुळे हे पीक विक्री करून काय उपयोग? अशा परिस्थितीमुळे शेतकरी विस्थापित होतो. शेतकर्‍यांचे हे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी शासकीय पातळीवर मदत केली जाऊ शकते. यासाठी विविध पिकांना आधारभूत किंमत मिळणे महत्त्वाचे आहे.

शेतकर्‍यांना वर्षभरात विविध पिकांसाठी लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा यांसारख्या गोष्टींबरोबरच श्रमिकांची उपलब्धता असावी लागते. नैसर्गिक परिस्थितीने साथ दिली आणि चांगली पिके आली आणि चांगल्या आलेल्या पिकांना बाजारपेठेत चांगली किंमत मिळली तर शेतकर्‍यांना चांगल्यापैकी नफा होतो. तेव्हाच शेतकर्‍यांची दिवाळी अत्यंत आनंदात होते, परंतु असे होणे हे खूप अवघड असते. बाजारात कोणत्या पिकांना काय भाव मिळतो आणि शेतकर्‍यांचा किती फायदा किंवा नुकसान होते या बाबी महत्त्वाच्या ठरतात. शेतकरी हा घटक बाजार यंत्रणेत अनेक ठिकाणी नाडला जातो. त्याचे अनेक ठिकाणी नुकसान होते. त्यांचा गैरफायदा घेतला जातो.

भारतीय शेती क्षेत्राचा ढोबळमानाने विचार करता आर्थिकदृष्ठ्या शेतकर्‍यांचे दोन गट पडलेले दिसतात. एका बाजूला गडगंज श्रीमंत असणारे शेतकरी आणि दुसर्‍या बाजूला अत्यंत गरीब असणारे शेतकरी. यात प्रामुख्याने गडगंज श्रीमंत असणार्‍या शेतकर्‍यांमध्ये जमीन जुमला, घरदार, शेतीवाडी, नोकर-चाकर, सोने-नाणे यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अशा शेतकर्‍यांची दिवाळी प्रत्येक वर्षी जोरात साजरी होते, परंतु दुसर्‍या बाजूला अत्यंत गरीब शेतकर्‍यांचा एक फार मोठा वर्ग आपणास दिसून येतो. यापैकी काही शेतकरी हे सीमांत शेतकरी असतात, तर फार मोठ्या प्रमाणावर भूमीहीन शेतमजूरदेखील दिसून येतात. अशा प्रकारच्या शेतकर्‍यांना वर्षभरातील शेतीचे विविध हंगाम हे चांगले सापडले आणि त्यातून पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले तरच त्यांना चार पैसे गाठीशी गोळा होतात. यातून त्यांची दिवाळी कशीबशी सर्वसाधारणपणे साजरी केली जाते.

थोडक्यात शेतकर्‍यांच्या दिवाळीसंदर्भात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. खुल्या खुल्या पद्धतीने दोन गट यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून पडलेले दिसतात. शासनाने प्रामुख्याने सीमांत शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे झाल्यास सर्वच शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी करता येऊ शकेल असे वाटते.

-(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -