Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश वंचितांचे शिक्षणमहर्षी

वंचितांचे शिक्षणमहर्षी

Subscribe

विद्वत्ता, व्यासंग, ध्येयनिष्ठा, निर्धार, परिश्रमशीलता, तत्त्वनिष्ठा, ऋजुता अशा इंद्रधनुषी रंगांनी सजलेले असे आकर्षक आणि आश्वासक व्यक्तिमत्त्व श्रीराम मंत्री सर यांचे होते. वंचितांसाठी शिक्षण हेच सेवेचे माध्यम मानले आणि शिक्षण प्रसाराच्या प्रक्रियेत प्रयत्नशील राहून निरीच्छ वृत्तीने ६० वर्षे उपनगर शिक्षण मंडळाच्या विकासासाठी झपाटून काम केले. अशा या आदरणीय, ऋषीतुल्य, शिक्षणमहर्षी श्रीराम मंत्री सरांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

–संतोष टक्के

अंधेरी जुहूच्या विद्यानिधी शिक्षण संकुलाच्या गेटमधून आत प्रवेश केला की दिसतो तो नेहमीच्याच सुहास्य वदनातील स्वर्गीय श्रीराम मंत्री सरांचा पुतळा. विद्यानिधीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेमाने व आग्रहाने विनंती करून हा पुतळा या जागी स्थानापन्न केला, जेणेकरून विद्यानिधीत प्रवेश केला की या कर्मयोगी विद्यार्थीप्रिय शिक्षकाचे सर्वांना प्रथम दर्शन व्हावे. या पुतळ्याचे अनावरण मंत्रीसरांच्या लाडक्या विद्यार्थ्याने, नाना पाटेकर यांनी मोठ्या आदरभावाने केले.

- Advertisement -

नाना यांच्याबरोबर होते तेव्हाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे. विद्वत्ता, व्यासंग, ध्येयनिष्ठा, निर्धार, परिश्रमशीलता, तत्त्वनिष्ठा, ऋजुता अशा इंद्रधनुषी रंगांनी सजलेलं असं आकर्षक आणि आश्वासक व्यक्तिमत्त्व होतं मंत्रीसरांचं. त्यांनी वंचितांसाठी शिक्षण हेच सेवेचे माध्यम मानले आणि शिक्षण प्रसाराच्या प्रक्रियेत प्रयत्नशील राहून निरीच्छ वृत्तीने ६० वर्षे संस्थेच्या विकासासाठी झपाटून काम केलं. अशा या आदरणीय, ऋषीतुल्य, शिक्षणमहर्षी श्रीराम मंत्री सरांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत. मानवी समुदायाच्या या अथांग सागरात अशी काही रत्ने जन्माला येतात की जी स्वतःच्या तेजाने, देदीप्यमान चारित्र्याने व चरित्राने मानवजातीचे दीपस्तंभ बनून राहतात.

सरांच्या आईचं नाव सरस्वती. सरांच्या जीवनात आईला अनन्यसाधारण महत्त्व होते. मंत्रीसरांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे १० सप्टेंबर १९२३ रोजी झाला. सरांचे बालपण फारच संघर्षमय गेले. सर अवघे सहा महिन्यांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. त्यामुळे त्यांची आई, स्वत: मंत्री सर आणि त्यांचा मोठा भाऊ मधुकर हे तिघेजण मामांकडे वेंगुर्ल्याला राहिले. तिथेच त्यांचे बालपण गेले. वेंगुर्ल्यातच त्यांचे शालेय शिक्षण झाले. येथील नगर वाचनालय आणि मंत्री सर यांचे अतूट नाते होते. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी या वाचनालयाशी संपर्क ठेवला. वाचनालयाला पहिला संगणक सरांनीच लायन्स क्लबमार्फत मिळवून दिला. नगर वाचनालयाला बरीच पुस्तके त्यांनी दिली. आताच्या तरुणांची वाचनाची आवड वाढावी याकरिता आई व मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कारांची कायमची व्यवस्था या वाचनालयात करून ठेवली आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक हे सरांचे आदर्श होते.

- Advertisement -

१९४८ मध्ये संघबंदी विरुद्धच्या सत्याग्रहात बिनदिक्कत भाग घेऊन मंत्रीसरांनी संघटनेकरिता समर्पणाची भावना जोपासली. मुंबईत आल्यावर अंधेरीच्या एम. ए. हायस्कूलमध्ये सहकारी शिक्षक या पदावर रुजू होऊन अध्यापनाचे कार्य करू लागले. या शाळेत असताना सरांना त्यांच्यासारखेच समविचारी दिनकर घाटे, राम दाभोळकर, चंद्रकांत वर्तक हे सहकारी भेटले. तसेच बंधू मधुकर मंत्री, ज. मे. गाडेकर, नि. ज. जूकर हेसुद्धा नेहमीच्या संपर्कात होतेच. १९५५ साली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा वैचारिक प्रारंभ झाला. भाषिक वाद थोड्याफार प्रमाणात सुरू झाला आणि या शाळेच्या व्यवस्थापनाने क्रमाक्रमाने मराठी वर्ग बंद केले. हे सरांसाठी एक आव्हान होते. त्यातून १८ नोव्हेंबर १९५६ रोजी सरांच्या कामा रोड, अंधेरी येथील टिळक धाम या चाळीतील घरी उपनगर शिक्षण मंडळाचा जन्म झाला.

सरांनी १९६१ साली सांताक्रूझला रात्रशाळा सुरू केली. शिक्षणापासून दूर गेलेली असंख्य मराठी मुले पुन्हा शिकू लागली. आपल्या खिशात काहीही धन नसतानासुद्धा मेहनत व तळमळीच्या जोरावर आपण वंचितांना शिक्षण देऊ शकतो हा विश्वास त्यांच्यात जागा झाला. जे. पी. नाईकांपासून सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. राव जोडले गेले. बँकर पी. ए. कामत, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे बंधू बी. एन आडारकर, टाटामधील अधिकारी बाबा गाडेकर अशी अनेक प्रतिष्ठित मंडळी संस्थेत सहभागी झाली.

उपनगर शिक्षण मंडळाला १९७१ साली जुहूचा भूखंड मिळाला. या जागेवरच आता विद्यानिधीची भव्य सुंदर सर्व शैक्षणिक सुविधांनी सज्ज अशी इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. येथे मराठी पूर्व प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत तसेच इंग्रजी पूर्व प्राथमिक ते माध्यमिकपर्यंत शिवाय वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय केंद्र यांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. श्रीराम मंत्री विद्यानिधी इन्फोटेक अ‍ॅकॅडमी तसेच बाजूच्याच प्लॅाटवर कमला रहेजा विद्यानिधी वास्तुकला महाविद्यालय आहे. श्रीराम मंत्री यांच्या चैतन्यमय आश्वासक आधारामुळे विद्यानिधीचे संकुल गगन सदन तेजमय झाले. उपनगर शिक्षण मंडळाच्या १४ शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे ५००० विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेखही सातत्याने उंचावत आहे. वंचितांच्या शिक्षणासाठी लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचा आता डेरेदार वृक्ष झाला आहे.

मंत्रीसर विज्ञान विषयाचे पदवीधर आणि शिक्षक होते, परंतु अनेक रंग घेऊन प्रौढ होत गेलेली त्यांच्या प्रतिभेची अनेक अंगे, रूपे आपल्याला पाहायला मिळतात. ते बहुभाषाकोविद होते. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृत भाषेचा अभ्यासही चांगला होता. रात्रशाळा व विद्यानिधी शिक्षण संकुल निर्माण करतानाच मंत्रीसर विद्या भारतीच्या देशातील १६००० शाळांमध्ये व १०००० एकल विद्यालयांमध्ये संस्कार शिक्षणाचे जाळे विणणार्‍या राष्ट्रीय विचारांच्या संस्थेचे पश्चिमांचलचे सक्रिय अध्यक्ष होते. तसेच ते महाराष्ट्रातील शिक्षण धोरणे व भारतीय संस्कार यावर काम करणार्‍या विद्या प्रतिष्ठानचेसुद्धा अध्यक्ष होते. भारतीय शिक्षण मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. अंमल विद्या मंदिराचे ते अध्यक्ष होते. रा. स्व. संघाच्या केशवसृष्टी भाईंदर प्रकल्पाच्या सुरुवातीच्या विश्वस्त मंडळात ते सक्रिय होते.

केशव सृष्टीतील उत्तन विविधलक्ष्यी शिक्षण संस्थेचे ते अत्यंत सक्रिय अध्यक्ष होते. त्यांनी सहकार्‍यांना बरोबर घेऊन रामरत्ना विद्या मंदिर या निवासी शाळेला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले. अंधेरी (प) येथील रा. स्व. संघाचे ते अनेक वर्षे संघचालक होते. अखेरपर्यंत त्यांची संघ शाखा कधीही चुकली नाही. संघाचे सर्व कार्यक्रम नेटकेपणाने आयोजित करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. लोकांना जोडण्याकरिता नवनवीन कल्पनांचे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले. त्यांचे कार्य, शिक्षणाविषयी, समाजाविषयी, वंचितांविषयी त्यांची असलेली तळमळ कायमच स्मरणात राहील. वंचितांना शिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणारा हा ज्ञानयोगी तपस्वी ३० जुलै २०१७ साली अनंतात विलीन झाला. काही माणसे जाताना आपल्या पाऊलखुणा ठेवून जातात. सरांच्या १००व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

- Advertisment -