घरफिचर्ससारांशपुणे विद्यापीठाचा नामकरण लढा

पुणे विद्यापीठाचा नामकरण लढा

Subscribe

समाज प्रबोधन, परिवर्तनासाठी सामाजिक क्रांती करणारे ज्योतिबा-सावित्री यांची कर्मभूमी आणि शिक्षणाचा पाया रोवलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंनी भारतीय स्त्री शिक्षणासाठी शेण, दगड, मातीचा मारा खाल्ला, पण शिक्षणाचा आग्रह सोडला नाही. त्यांच्यामुळेच दलित, बहुजन शिक्षण घेऊ शकले, नाहीतर अधोगतीच होती. मती, गती, नीती, वित्त जावून अनर्थच. त्याच सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला देतानासुद्धा अर्ज-विनंती केल्यानंतर लगेचच दिलं असं नाही. डॉ. गौतम बेंगाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांना संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाचे साक्षीदार असणारे आंदोलनकर्ते धनंजय धेंडे यांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत म्हणजे ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’.

–प्रदीप जाधव

नामांतर, नामविस्तार आणि नामकरण राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर राजकारणी जनतेला झुलवत किती दिवस ढकलायचं हे ठरवत असतात. आम्ही प्रथम समाजकारण नंतर राजकारण करतो, अशा गप्पा मारणारे प्रत्येक निर्णय राजकीय सूडबुद्धीनेच घेत असतात. एखाद्या शहराचा, विमानतळाचा, चौकाचा, विद्यापीठाचा, उड्डाणपुलाचा नामांतर कोणत्याही वादाशिवाय सहजासहजी झालाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होण्यासाठी 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला. त्यासाठी मोर्चे, निदर्शने, उपोषण, जेलभरो आंदोलने झाली. कोणी शहीद झाले, कोणी नामांतरवादी नेते म्हणून उदयास आले, तर कोणाच्या कारकिर्दीची नेता म्हणून सुरुवात आंदोलनाने केली. नामांतरासाठी इतकी वर्षे सतत सुरू असलेला हा लढा जागतिक इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करून आपापली ताकद दाखवली. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचे सरकार बहुमतात असताना त्यांनी सत्तेच्या जोरावर शहरांचे, जिल्ह्यांचे, पार्कचे महापुरुषांच्या नावाने नामांतर केले. औरंगाबाद शहराचं ‘छत्रपती संभाजी नगर’ नामांतर होण्यासाठी सत्ताबदल आडवं आल्याने श्रेयवादाने उशीर झाला. नामांतर करताना ज्या व्यक्ती, महापुरुष, समाजसुधारक, संतांचं नाव दिलं जातं ते व्यक्तिमत्व, मोठेपणा, त्यांचे कर्तृत्व त्या क्षेत्राशी संबंधित असूनसुद्धा केवळ आपला-परका असा भेदभाव करूनच निर्णय घेतला जातो.

- Advertisement -

समाज प्रबोधन, परिवर्तनासाठी सामाजिक क्रांती करणारे ज्योतिबा-सावित्री यांची कर्मभूमी आणि शिक्षणाचा पाया रोवलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंनी भारतीय स्त्री शिक्षणासाठी शेण, दगड, मातीचा मारा खाल्ला, पण शिक्षणाचा आग्रह सोडला नाही. त्यांच्यामुळेच दलित, बहुजन शिक्षण घेऊ शकले, नाहीतर अधोगतीच होती. मती, गती, नीती, वित्त जावून अनर्थच. त्याच सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला देतानासुद्धा अर्ज-विनंती केल्यानंतर लगेचच दिलं असं नाही. डॉ. गौतम बेंगाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांना संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाचे साक्षीदार असणारे आंदोलनकर्ते धनंजय धेंडे यांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत म्हणजे ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’. अर्थात हे पुस्तक म्हणजे संपूर्ण नामांतर प्रक्रियेचं दस्तऐवज आहे.

डॉ. गौतम बेंगाळे पुरंदर तालुक्यातील घेरापानवडी येथे जन्मलेले बी. एम. सी. कॉलेजचे क्रियाशील, उत्साही प्राध्यापक आणि लेखक. घेरापानवडी येथे 250 एकर जागेत उभारणार्‍यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक. पुणे विद्यापीठात डॉ. गौतम बेंगाळे आपला पीएचडीचा प्रबंध सादर करीत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण का करू नये? आणि नामकरणाच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास अत्यंत कठीण होता. सुरुवातीला डॉ. बेंगाळे यांनी ‘वन मॅन शो’प्रमाणे आंदोलनाला सुरुवात केली. मोर्चा काढला, आमरण उपोषण केलं. उपोषण करत असताना त्यांनी जीवाची पर्वा केली नाही.

- Advertisement -

पुणे विद्यापीठाची स्थापना स्वातंत्र्यसैनिक आदरणीय बॅरिस्टर मुकुंदराव रामराव जयकर यांनी खूप परिश्रम घेऊन केली. विद्यापीठाच्या उभारणीसाठी आयुष्यातील दहा वर्षे त्याग करून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला. पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांची मुंबईत जाऊन शिक्षण घेण्याची गैरसोय दूर केली. विद्यापीठ स्थापन करून पुणे विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदाची सूत्रे सांभाळणे ही अतिशय गौरवाची बाब आहे. त्याच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे असा विचार डॉ. गौतम बेंगाळे यांच्या मनात यावा ही विशेष अभिमानाची बाब आहे. यावरून त्यांची आत्मीयता, जिद्द आणि तळमळ दिसून येते.

9 सप्टेंबर 2011 रोजी पाथर्डी, अहमदनगर येथे डॉ. गौतम बेंगाळे यांनी महिला मंडळाच्या कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलताना त्यांच्या मनात अनेक महिन्यांपासून घोळत असलेल्या विचारांना भाषणात वाट मोकळी करून दिली. श्रोत्यांना उद्देशून म्हटले, पुण्यात 1848 मध्ये महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि पुणे विद्यापीठाची स्थापना 1948 साली झाली. म्हणजेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हे कार्य 100 वर्षे आधीच केले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळेसच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यायला हवे होते. श्रोत्यांमधून बरोबर आहे असा प्रतिसादात्मक आवाज आला आणि डॉ. बेंगाळे यांनी विचार मंचावरूनच ‘पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव द्यावे’ अशी घोषणा केली. पुणे विद्यापीठाच्या नामांतरासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली. त्या कृती समितीतील ज्येष्ठ मान्यवरांनी डॉ. बेंगाळे यांची निमंत्रक म्हणून एकमताने निवड केली आणि संघर्षाला सुरुवात झाली.

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिलेच पाहिजे यासाठी 20 ऑक्टोबर 2011 रोजी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना डॉ. बेंगाळे यांनी स्वहस्ताक्षरात पहिले पत्र लिहिले. प्रतिभाताई पाटील यांनी सकारात्मक पत्र लिहून सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला दिले पाहिजे अशी नोंद केली. त्यानंतर डॉ. बेंगाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व महाराष्ट्रातील 450 सामाजिक चळवळीतील संघटनांना पत्रव्यवहार केला. डॉ. बेंगाळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे या मागणीसाठी दिनांक 14 डिसेंबर 2011 रोजी पुण्यामध्ये समता भूमी, महात्मा फुले यांच्या वाड्यापासून ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढून यशस्वी केला.

10 मार्च 2012 रोजी डॉ. गौतम बेंगाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. कुलगुरू, पुणे विद्यापीठ, मुख्यमंत्री यांच्या समवेत नामकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने शासनाच्या विनंतीवरून डॉ. गौतम बेंगाळे यांनी सातव्या दिवशी आमरण उपोषण सोडले. डॉ. गौतम बेंगाळे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक, अमरावती, लातूर, अकोला इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांना, संमेलनांमध्ये उपस्थित राहून भाषणातून नामकरणाची भूमिका मांडत होते. डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, डॉ. भालचंद्र मुणगेकर, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गायकवाड, महादेव जानकर, श्रीमंत कोकाटे, राजा ढाले, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, माधुरी मिसाळ, दिप्ती चौधरी, नीलम गोर्‍हे, जयदेवराव गायकवाड, शरद रणपिसे इत्यादी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, नेते यांच्याशी डॉ. गौतम बेंगाळे यांनी चर्चा केली.

मार्च 2013 मध्ये अनेक नामवंतांच्या उपस्थितीत नामकरण निर्धार परिषद अल्पबचत भवन, पुणे येथे यशस्वी झाली. 11 जानेवारी 2014 रोजी पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद झाली. या परिषदेत निर्णय होईपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेतली. निर्णय होईपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार अडवून धरले. निर्णय होईपर्यंत व्यवस्थापन परिषद सदस्यांना बैठक सोडून बाहेर जाता येणार नाही, असा सांगावा डॉ. गौतम बेंगाळे यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांना दिला. चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाला. हा निर्णय विद्यापीठाचा होता.

विधानसभा, विधान परिषदेने विषय घेतला पाहिजे. यासाठी समितीच्या वतीने पाठपुरावा केला. कृती समितीचे निमंत्रक डॉ. गौतम बेंगाळे यांनी केलेल्या विद्यापीठातील कॅम्पसमधील धरणे आंदोलनाला यश आले व विधानसभेत ठराव मंजूर करून घेण्यात आला. सुधीर मुनगंटीवार (विधानसभा), विनोद तावडे (विधान परिषद) यांनी संबंधित ठराव मंजूर करून मान्य केले, परंतु फेब्रुवारी 2014 पासून लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली. लोकसभा निवडणुका पार पडल्या. केंद्रातील सरकार बदलले. राजकीय परिस्थितीत बदल झाला. नामकरणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. समितीने धीर, चिकाटी सोडली नाही. पुन्हा सर्व आमदार, मंत्री यांना पत्रव्यवहार केला. 10/12 मंत्री, 50/60 आमदारांना भेटले. विधिमंडळ, विधान परिषदेतील औपचारिकता पूर्ण झाली. पुढे मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक होती. अनेक दिवस प्रयत्न करूनही मंत्रिमंडळात विषय येत नव्हता. तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात आग्रह धरला. जुलै 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण केल्याचा ठराव केला आणि 9 ऑगस्ट 2014 रोजी पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याने धनंजय धेंडे यांनी वाचकांची सोय केली आहे. या पुस्तकात भारताच्या राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र, मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना, आमदार, खासदार यांना लिहिलेली पत्रे जशीच्या तशी छापली असून आंदोलन काळात वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्याही वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचून अनेकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहित्यिका आयदानकार उर्मिलाताई पवार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत प्रस्तावना लिहिली आहे.

लेखक धनंजय धेंडे यांनी लिहिलेल्या ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’ या पुस्तकाला साहित्यिक मूल्य किती? याचं मूल्यमापन करण्यापेक्षा इतिहासाच्या दृष्टीने केलेली मांडणी अधिक महत्त्वाची असून आंदोलनाची नोंद व्हावी या अर्थाने याला विशेष महत्त्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -