घरफिचर्ससारांशकोरोनाने उद्ध्वस्त केलेल्या सरिताची गोष्ट!

कोरोनाने उद्ध्वस्त केलेल्या सरिताची गोष्ट!

Subscribe

महिना बारा हजार पगारात सार्‍या गरजा भागणे कठीण होते, पण सरिता कसेबसे दिवस काढत होती, प्रत्येक क्षण लढत होती. घरातील फर्निचर, काही भांडी, वस्तू तिने गरजेपोटी मिळेल त्या भावास विकल्या. ती एकांतात धाय मोकलून रडायची, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नवर्‍याला आठवायची. तेव्हा दोन्ही लेकरं सैरभैर व्हायची. आई का रडते? त्यांना कळत नसे. तिचं दुःख फक्त तिचं होतं, बोलायला सांगायलाही कुणी सोबत नव्हतं. नवराच सारे व्यवहार बघायचा म्हणून तिला ना दुनियादारी कळली होती, ना माणसं. ती पार एकटी पडली.

सरिता निम्नमध्यमवर्गीय घरात वाढलेली. आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या आणि खाऊन-पिऊन समाधानी असणार्‍या कुटुंबात वाढलेली. दोन भाऊ, दोन बहिणी, मोठ्या भावाच्या पाठची ही! आई-वडील दोघे अशिक्षित आणि जुन्या विचारसरणीचे, ‘नकोशी’ म्हणून सतत लिंगभेदाचे चटके हिच्या वाट्याला आलेले. मुलगी म्हणून आई नेहमीच घालून पाडून बोलणार, सार्‍याच बाबतीत भेदभाव ठरलेला तोही अगदी उघड! बारावीनंतर सरिताला शिकायचे होते पण मुलीच्या जातीला एवढं शिक्षण कशाला? म्हणत तिच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे प्रयत्न सुरू झाले. खरे तर घरात सतत उपेक्षा आणि अन्याय वाट्याला आलेल्या वातावरणानेच तिला बंडखोर केलेलं. तिचं सारं कुटुंब मागासवर्गीय म्हणून गावाचे जातीय विषमतेचे चटके सोसत होते आणि ती घरात लिंग विषमतेचे; काय विचित्र विसंगती आहे बघा!

तिचे पुढचे शिक्षण बंद केल्याने आता ती पूर्ण वेळ घरातच असे, सुयोग्य वरही मिळेना. इथल्या पितृसत्ताकतेशी इमान बाळगणार्‍या तिच्या आईशी तिचे सतत काहीतरी वाद-कुरबुरी होत. त्यादिवशीही घरात असाच वाद झाला, तिला मारहाण झाली आणि रागाच्या भरात आत्महत्या करायला म्हणून ती घराबाहेर पडली. घरचे किती निष्ठुर बघा त्यांनी ना तिला थांबविण्याचा प्रयत्न केला ना शोधण्याचा प्रयत्न केला. नागपूरहून ती थेट पुण्यात आली. पुण्यात खासगी नोकरी करणार्‍या मैत्रिणीच्या खोलीवर काही दिवस थांबली, मिळेल ते काम शोधू लागली, किती दिवस मैत्रिणीकडे थांबणार होती?

- Advertisement -

एका मोबाईल फ्रेंचायजी कार्यालयात काम मिळाले, पगार फार काही नव्हता पण आता ती काहीशी स्वावलंबी झाली होती. पुण्यात स्वतंत्र खोली भाड्याने घेतली. वर्षं लोटलं पण घरच्यांनी तिचा कोणताही तपास केला नाही, त्यांना वाटलं हिने रागाच्या भरात आत्महत्या केली असावी, तिच्या परतीची त्यांना आशा नव्हतीच. तिलाही आता त्या नात्यांशी संपर्क ठेवावासा वाटत नव्हता, तिचा नात्यांवरचा विश्वास पार उडून गेला होता. एकटीच राहात होती, आला दिवस ढकलत होती. बाईसाठी शहरात एकटी राहणेही तेवढेसे सुरक्षित नसतेच म्हणा, गिधाडं टपलेली असतात. तिला परिस्थितीने आता निर्विकार बनवले होते. तिला तिचे भविष्य माहिती नव्हतं, ही वाट कुठे नेणार ठाऊक नव्हतं.

ती केवळ मायेच्या दोन शब्दांची भुकेली होती कारण कुटुंबात प्रेम असं तिला कधी लाभलंच नव्हतं आणि अशात ‘तो’ तिच्या आयुष्यात आला. परक्या शहरात ‘आपलं’ कुणीतरी तिला भेटलं आणि तिला जगावंसं वाटू लागलं. डोळे स्वप्नाच्या दुनियेत हरवू लागले. हरवलेलं स्मित पुन्हा ओठी मोहरू लागलं. त्याचं नाव ‘सागर’! खाजगी कंपनीत काम करणारा तोही सर्वसामान्य कुटुंबातला. दोघेही मागासवर्गीय समूहातील असले तरी त्यांच्या जाती भिन्न होत्या, पण त्यांच्या नात्यात ‘जात’ महत्वाची नव्हती तर ‘साथ’ महत्वाची होती.

- Advertisement -

दोघेही परिस्थितीचे ओचकारे, सपकारे सहन करत प्रवास करत होते, दोघांची वेदना आता परस्परांची झाली आणि महिनाभरात त्यांनी लग्न केले. तिकडे घरी नागपुरात काहीच थांगपत्ता नव्हता. सासरचे म्हणाले, दुसर्‍या जातीची पोरगी घरात घेणार नाही, आमचा यापुढे तुमच्याशी काही सबंध नाही. झालं तिला माहेर केव्हांच संपलं होतं. आता सासरही नव्हतं. सागरचं मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम, एकमेकांना कधीच अंतर द्यायचं नाही असं ठरवत त्यांनी छोटासा सुखी संसार उभा केला. वर्षभरात मुलगा जन्मास आला. ह्या काळात ते दोघेच एकमेकांसाठी होते, तिचे डोहाळे पुरवणारे कुणी नव्हते ना बाळ-बाळंतिणीची काळजी घेणारं जवळ कुणी होतं. नवरा कामावर गेला की वनवासी जीव बाळाला कवटाळून एकटाच पडून असायचा. नाही म्हणायला कधीतरी पुण्यातली मैत्रीण जिव्हाळ्यापोटी भेटायला यायची तेवढंच!

बाळ वर्षाचं झालं, ती नको म्हणत असताना तिच्या घरी सागरने फोन केला व सर्व हकीकत सांगितली. ती आता ह्या जगात नसेल असे गृहीत धरणारे तिच्या घरचे तर कावरेबावरे झाले. ‘नकोशी अजून जिवंतच!’ असेही त्यांना वाटले. तिचा पत्ता, नातू याबद्दल कळूनही त्यानंतर त्यांनी तिच्याशी फार काही संपर्क ठेवला नाही. तिनेही सासर-माहेर आयुष्यातून वजा केलेलं. तिचं कुटुंब हेच तिचं जग होतं बस्स….

सारं बरं चाललं असताना त्याची खासगी नोकरी सुटली. काही थोडीफार रक्कम त्याने बचत केली होती ती मित्रांच्या आग्रहावरून शेअर बाजारात लावली. त्यात नुकसान झाले; सारी रक्कम बुडाली. आता तो खूप तणावात राहू लागला, अशातच दुसर्‍या अपत्याची चाहूल लागली. कोरोनाची दुसरी भयंकर लाट आलेली. अशा वातावरणात हा नोकरी, कामधंदा शोधत वणवण भटकत असे. तिचे मंगळसूत्र मोडले, प्रसूतीचा खर्च भागवला. मुलगी जन्मास आली होती, दोघांनाही ती ‘हवीशी’ होती. आता त्यांच्या कुटुंबाचा ‘चौकोन’ पूर्ण झाला होता.

कोरोनाकाळात लोकांचा रोजगार सुटला होता अशात याला कसे काम मिळणार होते? तरी तो आशेने रोज बाहेर पडायचा, उसनं अवसान आणून सारिताला धीर द्यायचा, सर्व ठीक होईल म्हणायचा. एके सायंकाळी तो घरी आला तोच तापाने फणफणलेला, शिंकत, खोकत. नोकरी तर मिळाली नव्हतीच, पण कोरोनाचा संसर्ग मात्र त्याला झाला होता. आजाराचे निदान होईपर्यंत संसर्ग वाढला होता. तान्ह्या बाळाला घेऊन ती त्याच्या सोबत कुठे जाणार होती? म्हणून त्या वाईट अवस्थेत तोच शासनाच्या जंबो कोव्हिड सेंटरमध्ये भरती झाला. त्यांचे जे बोलणे व्हायचे ते फोनवरच. त्याला ऑक्सिजन लावला होता, फोनवर फार तर एखादे वाक्य तो बोलू शकत असे. डोक्यातील ताणतणाव, खालावलेली आर्थिक परिस्थिती, कुटुंबाने सोडलेली साथ, दोन्ही लेकरं-बायकोचा चेहरा हे सारं त्याला तिथे अस्वस्थ करे.

१९ एप्रिल रोजी तो भरती झालेला. तिला मात्र पक्की खात्री होती १ मे रोजी लग्नाचा सहावा वाढदिवस आहे तेव्हा तो नक्की बरा होऊन परतेल, मग आपण दोघे मिळून नव्याने कष्ट करू. तो २५ तारखेला तिच्याशी फोनवर शेवटचा बोलला. २६ एप्रिलला तिने फोन केला तर फोन बंद येत होता. बाळाच्या दुधाला जवळ पैसे नव्हते की, त्याच्या चौकशीसाठी जावं तर रिक्षाभाड्यासाठीही जवळ पैसे नव्हते. सतत फोन करून ती वैतागली, त्याच्या फोनची चार्जिंग संपली असावी अशी तिने स्वतःची समजूत घेतली, पण तिचा अंदाज साफ चुकला होता. त्याचा श्वासच थांबला होता. सायंकाळी घरी नात्यातील दोन तरुण आले आणि सागर कोरोनात दगावल्याची बातमी त्यांनी तिला दिली. ध्यानीमनी नसताना अनपेक्षित अशी बातमी ऐकून ती कोसळली, सुन्न झाली, तिच्या कानावर तिचा विश्वासच बसेना. त्याचा अंत्यविधीही तिच्या दिराने परस्पर उरकून टाकलेला. त्याला शेवटचे डोळे भरून तिला पाहता आले न बोलता आले. वयाच्या ३२ व्या वर्षी तिचं सारं विश्व उध्वस्त झालं होतं…

तिला काय करावं? काही सुचेना. सासरचे म्हणाले, आमचा मुलगा गेला सारं संपलं. तुझी मुलं आणि तू बघ काय करायचं ते. पुन्हा तोंड दाखवू नकोस. माहेरच्यांनीही नाकारलेले, मनाने लग्न केलं, तुझे निर्णय होते. तुझे प्रश्न तूच बघ, आमचा काही सबंध नाही म्हणत त्यांनीही तिला थारा दिला नाही. रक्ताची नातीही किती फितूर होतात ना हल्ली? पुन्हा तिच्या त्याच मैत्रिणीने तिला आधार दिला. घरात धान्याचा कण; ना जवळ पैसे अशा परिस्थितीत मिळेल तिथे काम करायला ती तयार होती. १२ हजार रुपये पगारावर ती सुरक्षारक्षक म्हणून एका ठिकाणी रुजू झाली. सकाळी सात ते सायंकाळी सात अशी बारा तासांची ड्युटी. मुलांना कुठे ठेवणार? मोठा प्रश्न होता. कुणीही मदत केली नाही. पुण्यातील दहा बाय दहाच्या खोलीचे भाडे साडे चार हजार रुपये होते. पाळणाघर तिला परवडणारे नव्हतेच. सकाळी सात ते सायंकाळी सात ती दोन्ही मुलांना घरात कुलूप लावून ठेवी; सहा वर्षाचा मुलगा लहान बहिणीला आईने दिलेल्या सूचनेनुसार सांभाळत असे. मनावर दगड ठेवून तिला हे करणे भागच होते, कारण इतर कोणताच पर्याय तिच्यासमोर नव्हता.

बारा हजार पगारात सार्‍या गरजा भागणे कठीण होते, पण ती कसेबसे दिवस काढत होती, प्रत्येक क्षण लढत होती. घरातील फर्निचर, काही भांडी, वस्तू तिने गरजेपोटी मिळेल त्या भावास विकल्या. ती एकांतात धाय मोकलून रडायची, त्याला आठवायची. तेव्हा दोन्ही लेकरं सैरभैर व्हायची. आई का रडते? त्यांना कळत नसे. तिचं दुःख फक्त तिचं होतं, बोलायला सांगायलाही कुणी सोबत नव्हतं. नवराच सारे व्यवहार बघायचा म्हणून तिला दुनियादारी कळली होती ना माणसं. ती पार एकटी पडली. कोरोनात निधन झालेल्यांसाठी शासनाकडून मिळणारी ५० हजारही सासूने आधीच ऑनलाईन अर्ज करून काढून घेतलेले. ती तिच्या दु:खात गाफील, अनभिज्ञच राहिली. आपली नातवंडं, आपल्या मुलाचा अंश, आपला वंश म्हणूनही त्या मुलांप्रती सासरच्यांना आपुलकी नव्हती हे सर्वात भीषण, असंवेदनशील!

एकदा ती कोरोना एकल महिलांच्या सभेस गेली, सामजिक कार्यकर्त्यांशी बोलून, भेटून तिला सोबतीची खात्री झाली. तिच्यासारख्याच अनेक दुःखी भगिनी आहेत आणि त्या जगण्याची चिवट लढाई लढताहेत हे बघून तीही खंबीर होऊ लागली. आपल्या दोन्ही लेकरांसाठी तिला आता जगणे भाग होते. पुण्यातील तळमळीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वनिता हजारे यांच्या संपर्कात सरिता आली. सामजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या कोरोना एकल महिला पुनर्वसनाच्या कार्यात वनिताताई नि:स्वार्थ योगदान देत आहेत. वनिता ताईंनी सरिताची संपूर्ण कहाणी ऐकली, तिच्या भावना समजून घेतल्या, तिला धीर दिला. ‘आपण यातून काहीतरी वाट काढू’ म्हणत खूप धडपड करत त्यांनी एका वसतीगृहात सरिताच्या लेकरांसह तिची व्यवस्था केली, तिची वास्तव परिस्थिती सांगून नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश मिळवून दिला.

तिला व तिच्यासारख्या अनेकींना सन्मानाने जगता यावे, आर्थिक स्वावलंबी होता यावे म्हणून वनिताताई हजारे सतत क्रियाशील आहेत. आज सरीताशी बोलले तेव्हा सारी कहाणी सांगताना तिचा दाटून आलेला कंठ, भरून येणारे डोळे तिच्या वेदनेची तीव्रता सांगत होते. काय बोलावं? मला सुचेना तरीही येणारा काळ तुझ्यासाठी चांगला असेल फक्त तू हारु नकोस, जिद्द ठेव, त्यामुळेच तुझ्या लेकरांना चांगलं भविष्य लाभेल. एवढेच मी बोलू शकले. त्यावर ती म्हणाली, वनिता ताईंना भेटून मी जरा सावरले आहे, त्यांनी खूप केलेय माझ्यासाठी, मोठ्या बहिणीसारख्या त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, म्हणून मीही जिद्द ठेवू शकतेय… हे सारं ऐकून सरिताचा अभिमान आणि वनिताताईंबद्दल अधिक आदर वाटू लागलाय कारण वनिताताई स्वतः कोरोना एकल महिला आहेत, त्या सरीतापेक्षा वयाने ज्येष्ठ असून सुखवस्तू कुटुंबातील आहेत हाच एक दोघींमधील फरक आहे. वेदना तर त्यांच्या अंतरीही आहेच की, पण आपले दुःख बाजूला ठेवून त्या आपल्या समदु:खी भगिनींसाठी झटताहेत, काम करताहेत, म्हणून त्या मला खर्‍या अर्थाने ‘मोठ्या’ वाटतात. आपणही ह्या महिलांना सन्मानाने जगण्यास आपल्यापरीने नक्कीच मदत करू शकतो.

-(सदर कथा वास्तव घटनेवर आधारित आहे.)

— डॉ.प्रतिभा जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -