घरफिचर्ससारांशफटाक्यांची वात, करी पर्यावरणाचा घात!

फटाक्यांची वात, करी पर्यावरणाचा घात!

Subscribe

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या अनेक व्यापक सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती ह्या पर्यावरणपूरक, काल सुसंगत, विधायक सण-समारंभ, उत्सव साजरा करण्याचा सातत्याने आग्रह धरतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून तसेच लोकसमूहात कृतिशील प्रबोधनाचे कार्यक्रम राबवतात. मागील 20 वर्षांपासून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांतून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पपत्रे विद्यार्थ्यांकडून भरून घेतली जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपये तर वाचलेच शिवाय मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायूचे प्रदूषणही थांबले आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्यात चांगले यश मिळाले.

–डॉ. ठकसेन गोराणे

सजीव सृष्टीतील माणूस हा इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय दुबळा प्राणी आहे, पण त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे तो स्वतंत्रपणे आणि बर्‍याच वेळा सृजनशील विचार करू शकतो. उत्क्रांतीच्या टप्प्यांवर चतुष्पाद अवस्थेतून जेव्हा माणूस दोन्ही पायांवर सरळ उभा राहिला, तेव्हा त्याचा पाठीचा कणा सरळ झाला. आडवे स्वरयंत्र सरळ झाले. त्याला वेगवेगळे स्वर काढता येऊ लागले. त्यातून त्याने भाषा विकसित केली. माणसामाणसांत विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली. विचार प्रक्रिया विकसित होत राहिली. हाताच्या पंज्याचा अंगठा पुढील चार बोटांच्या काटकोनात विकसित झाल्यावर माणूस हाताने वस्तू घट्ट पकडू लागला. त्याद्वारे निसर्गावर प्रक्रिया करता करता त्याने हत्यारे, वस्तू, अवजारे बनविली. अशा प्रकारे भौतिक क्रियांचा विकास करता करता त्याने विचारांची झेप घेतली. माणसाची विचार प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याच्या मेंदूतील चेतापेशींची संख्या वाढली. परिणामी त्याच्या मेंदूचे वस्तुमान हळूहळू वाढत गेले. म्हणजे साधारण दहा लाख वर्षांपूर्वी माणसाचे मेंदूचे वस्तुमान केवळ साडेसातशे ते आठशे ग्रॅम होते. ते आजच्या प्रगतिपथावर असलेल्या माणसाच्या मेंदूचे वस्तुमान साडेतेराशे ते पंधराशे ग्रॅम एवढे भरते.

- Advertisement -

म्हणजे मेंदूच्या वस्तुमानात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. इतर प्राण्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने घडली किंवा घडलीच नाही. त्यामुळे अजूनही त्यांच्या मेंदूचे वस्तुमान जवळपास आहे तेवढेच आहे. निसर्गात सर्वांत दुबळा असलेला हा माणूस प्राणी मात्र आपल्या मेंदूमधील स्वतंत्र विचार प्रक्रियेमुळे इतरांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला. त्यांच्यावर राज्य करू लागला.

मेंदूमधील चेतापेशींची संख्या वाढत वाढत गेल्याने त्याच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होत गेला आणि विकास होत राहिला. त्यातून त्याने नवनवीन शोध लावले. विज्ञानाची सृष्टी त्याने निर्माण केली, मात्र अशा विज्ञान सृष्टीचा करता करविता असलेला माणूस अजूनही अनेक वेळा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेल्या घटनांना जाणते अजाणतेपणाने प्राधान्य देताना दिसतो. आपल्या मनातील भीतीपोटी आणि लालसेपोटी तो अनेक दैवी, अविवेकी, अवैज्ञानिक, अंधश्रद्धायुक्त घटनांना थारा देतो आणि त्यांचा बळी ठरतो. म्हणजेच तो जसा चांगले विचार करू शकतो तसे वाईट विचारही त्याच्या मनात कधी कधी उद्भवतात. ह्या विनाशकारी वाईट विचारांना आणि भावनांना योग्य दिशेने वळवण्यासाठी कुटुंब, समाज, शिक्षण व्यवस्था याचा फार मोठा उपयोग त्याला होतो. म्हणून कुटुंबात आणि समाजात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांचा परिणाम त्याच्या मनावर सातत्याने होत असतो.

- Advertisement -

विशेषतः सण, उत्सव, समारंभातून सर्वांशी प्रेमाने, स्नेहाने वागण्याची, सर्व मिळून आनंद घेण्याची, सामाजिक एकोप्याची भावना व्यक्तीच्या बालपणातच त्याच्यावर संस्कारित होत असते. म्हणून प्रत्येक सण, उत्सव, समारंभ हा अतिशय संवेदनशील भावनेने, पर्यावरणपूरक, विधायक अंगाने व कालसुसंगत आयोजित करून साजरा होणे अतिशय गरजेचे आहे, मात्र अलीकडच्या काळात अशा सण-उत्सवांना केवळ दिखाऊ व चंगळवादाचे स्वरूप आल्याचे दिसते. प्रत्येक सण, उत्सव, समारंभ हा निसर्गाला ओरबाडून, हानी पोहचूनच साजरा केला जातो असेही ठळकपणे जाणवते. लग्न समारंभ, वाढदिवस, क्रिकेटचे सामने, नववर्षाचे स्वागत, राजकीय नेत्यांचे स्वागत, दिवाळी अशा विविध प्रसंगी प्रचंड फटाक्यांची आतषबाजी होताना आपण पाहतो.

भारतात आता सुरू असलेल्या विश्वकप क्रिकेट साखळी सामन्यातील एक सामना दिल्लीत होणार आहे, मात्र ह्या सामन्याच्या वेळी कोणीही फटाके उडवणार नाही, असा बंदीचा आदेश तेथील सरकारने दिला आहे. खरंतर ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव निसर्गाला, सजीवांना धोका पोहचत असेल अशा प्रकारच्या कोणत्याही सण-उत्सवांवर तातडीने कायदेशीर बंदी आणायला हवी. तेथे कोणत्याही जातीधर्माच्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरांचा मुलाहिजा ठेवता कामा नये.

ज्या ज्या सण-उत्सवांमध्ये फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली जाते, त्या त्या ठिकाणी सर्वांनी सुज्ञपणा दाखवला, शहाणपण दाखवले तर त्या त्या ठिकाणाहून फटक्यांना हळूहळू आपला गाशा गुंडाळावा लागेल हे मात्र नक्की! पण अजून तरी हे स्वप्नवतच वाटते. कारण फटाके उडवण्याची उत्सुकता जशी लहान मुलांमध्ये दिसून येते, त्याहून अधिक ती युवकांपासून तर प्रौढ व्यक्तींमध्येही दिसून येते. एखाद्या गल्लीत, गावात अतिशय मोजकी कुटुंबे अशी असतात की ते पर्यावरण प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करतात आणि तो कसोशीने अमलातही आणतात. लोक काय म्हणतील याला ते भीत नाहीत आणि भीकही घालत नाहीत. एकही फटका ते उडवत नाहीत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या अनेक व्यापक सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती ह्या पर्यावरणपूरक, काल सुसंगत, विधायक सण-समारंभ, उत्सव साजरा करण्याचा सातत्याने आग्रह धरतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून तसेच लोकसमूहात कृतिशील प्रबोधनाचे कार्यक्रम राबवतात. मागील वीस वर्षांपासून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांतून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पपत्रे विद्यार्थ्यांकडून भरून घेतली जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपये तर वाचलेच शिवाय मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायूचे प्रदूषणही थांबले आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्यात चांगले यश मिळाले. फटाकेमुक्त सण-उत्सव साजरा करण्याचा विचार करणार्‍या व्यक्तींची, कुटुंबांची, गल्ल्यांची, गावांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसे अशा फटाके उडवण्याच्या विकृतीला आळा बसू शकेल. दरवर्षी कुठेतरी फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याच्या बातम्या येतात. त्यामध्ये अनेक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. फटाके विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात.

विशेषतः मध्यम किंवा लहान आकाराच्या फटाक्यांना जास्त पसंती दिली जाते. त्यामुळे त्यांची मागणी जास्त असते. अशा लहान फटाक्यांमध्ये दारू भरण्यासाठी मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलांना प्राधान्य दिले जाते. कारण त्यांची बोटं लहान असतात आणि बोटाने फटाक्याच्या आत दारू भरणे सोपे जाते. त्यामुळे फटाक्यांच्या कारखान्यात मोठ्या संख्येने बालमजूर असतात. अर्थातच त्यांना अल्पमजुरी दिली जाते. शासकीय पातळीवर याकडे डोळेझाक केली जाते.

पोटाची आग शमवण्यासाठी पालकही डोळ्यांवर कातडे ओढून आपल्या लहान वयातील मुलांना या कारखान्यात कामाला जुंपतात. परिणामी अशा बालकांचे शिक्षण खंडित होते. शिक्षण नसल्यामुळे आणि विशेष कोणत्याही कामाचे कौशल्य प्राप्त न झाल्याने अशी मुले नंतर आयुष्यात समाजातील बेकारीचे बळी ठरतात. खरंतर जेव्हा आपल्या सण- उत्सवाला उधाण आलेले असते आणि आपल्या आनंदालाही भरते आलेले असते, त्यावेळी जी आपण फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करतो त्यावेळी आपण या बालमजुरांच्या आयुष्यात प्रकाशाऐवजी अंधारच पेरतो एवढे मात्र नक्की!

खरंतर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करणे म्हणजे पैसा जाळणे, असंच म्हणावं लागेल. फटाक्यांतून तो धूर निघतो तो पैशांचाच धूर असतो. उत्क्रांतीच्या टप्प्यावर विकसित झालेल्या माणसाला अजूनही हे का समजत नाही, असा मोठा प्रश्न पडतो. कारण फटाके उडवल्याने कोणतीही फायद्याची गोष्ट घडत नाही. उलट पैसा आणि पर्यावरण यांची हानीच होते. फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायूचे प्रदूषण होते हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि कानांनी ऐकतो.

नैसर्गिक मर्यादेपलीकडील ध्वनीच्या आवाजाने माणसाच्या कानांना इजा होते, कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. मर्यादेपलीकडील धुराने, वायूने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होऊन डोळ्यांसहित फुप्फुसालाही इजा होते. दमा, खोकला, डोकेदुखी हे आजार उद्भवतात, उचल खातात, बळावू शकतात. कोरोना या जगाला संकटात घालणार्‍या व्हायरसने जगातील जवळपास सर्वच माणसांच्या फुप्फुसाला कमी, अधिक प्रमाणात इजा केलेली आहे. फटाक्यांसारख्या अनावश्यक गोष्टींनीही पुन्हा आपण आपले जीवन धोक्यात घालत असू, तर त्याला शहाणपण म्हणता येणार नाही. फटाक्यांची आतषबाजी शक्यतो रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात केली जाते. परिसर दणाणून सोडणारा आवाज आणि तीव्र प्रकाश यामुळे प्राणी, पक्षी भयभीत होतात, सैरावैरा पळू लागतात. त्यामुळे त्यांना अपघात होतात आणि मोठ्या प्रमाणात इजाही होते. वृद्ध आणि आजारी व्यक्ती, परीक्षार्थी, लहान बालके यांनाही फटाक्यांचा अतोनात त्रास होतो. आताच पार पडलेल्या गणेशोत्सवामध्ये डीजेच्या प्रचंड दणदणाटाच्या तालावर नृत्य करणार्‍या अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गणेशमूर्तींचे विसर्जन करायला जाणार्‍या आणि खोल पाण्यात बुडून मृत्यू पावणार्‍यांच्या संख्येमध्येही तरुणांचीच संख्या अधिक होती. म्हणून अशा सर्व सण-उत्सवांमध्ये कालसुसंगता, सावधानता आणि विधायकता आणण्यासाठी आता तरुणांनीच पुढे यायला पाहिजे.

अनेक शहरांमध्ये फटाके तसेच वाद्य साहित्याच्या दणदणाटाने ध्वनीची पातळी ओलांडल्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. एकूणच सजीव सृष्टीला आल्हाददायक वाटणारी, असणारी ध्वनीची आणि वायूची पातळी निसर्गानेच निश्चित केलेली आहे. ती ओलांडली तर त्या सगळ्यांचेच जीवन संकटात येईल. असे होऊ नये म्हणून काही कायदेही अस्तित्वात आहेत, मात्र तरीही यात विशेष फरक पडत नाही असे दिसून आले आहे. म्हणून प्रचलित कायद्यांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आणि प्रत्यक्षात त्या राबवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही जातीधर्माच्या चालीरिती, रूढी, प्रथा, परंपरा यांचा मुलाहिजा ठेवता कामा नये. कोणत्याही कारणास्तव पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होणार नाहीत याची तेथील प्रशासनाने काळजी घ्यावी. असे घडले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2005 साली पारित केले आहेत. त्यांची जाणीवपूर्वक कडक अंमलबजावणी व्हावी, असे यानिमित्ताने सांगणे आवश्यक आहे. कारण पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची आताच महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांत तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

होमो सेपियन सेपियन, अशी माणसाची व्याख्या आहे. म्हणजे माणूस शहाणा शहाणा, असा याचा अर्थ आहे. म्हणजे माणूस दिवसेंदिवस शहाणा होत आहे असे समजूया. वरील सगळ्या ओढून आणलेल्या घटना पाहिल्यावर आपण खरोखर शहाणे झालो का, शहाणे होण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहोत का, हा प्रश्न पडतो. वास्तविक कोणताही सण, उत्सव, समारंभ हा सर्वांना निखळ आनंद देणारा, समाजात एकोपा व स्नेह वाढविणारा, ताण-तणावातून माणसांना बर्‍यापैकी मुक्त करणारा, वैरभाव संपवणारा, माणसांच्या मनात, शरीरात ऊर्जा भरवणारा, निसर्गाची जपणूक व संवर्धन करणारा, नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी देणारा प्रसंग किंवा घटना असते. तसाच तो असायला हवा, अशी अपेक्षा आहे.

पुढील आठवड्यात दिवाळी सण येऊ घातलेला आहे. त्यासाठी फटक्यांसाठीची रक्कम ही दिवाळी अंकांची खरेदी, ऐतिहासिक, वैज्ञानिक गोष्टी असणार्‍या पुस्तकांची खरेदी, दैनंदिन वापरता येण्यायोग्य व आवश्यक वस्तूंची खरेदी, मानवतेच्या भावनेतून कुणाला तरी मदत अशा विविध चांगल्या कारणांसाठी वापरता येईल. टाकाऊ आणि घरातल्याच वस्तू वापरून सुंदर आकाश कंदील बनवता येईल. सुरेख नक्षीकाम केलेली शुभेच्छापत्रे बनविता येतील. वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक व मनमोहक रांगोळ्या चितारण्याचे कौशल्य प्राप्त करता येईल. त्यांची स्पर्धा घेता येईल.

समाजात जे वंचित, दुर्लक्षित घटक आहेत, त्यांच्यासाठी फराळ करून त्यांच्या समवेत त्याचे सेवन केले तर दोन्ही समाज घटकांच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचा, एकोप्याचा प्रकाश पसरेल. अशा अनेक चांगल्या गोष्टी करता येतील. खरंतर प्रत्येक सण-समारंभात, उत्सवात असा नैसर्गिक, मानवतावादी आनंद निर्माण करता येईल आणि मनमुरादपणे तो लुटताही येईल. हे सर्वांना सहज शक्य आहे. चला तर मग अशा नावीन्यपूर्ण पद्धतीने आनंददायी, पर्यावरणपूरक, सर्वांच्या जीवनात सोनेरी प्रकाश पेरणारी दिवाळी आणि सर्वच सण, उत्सव साजरे करूया.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -