घरफिचर्स..तर आपण काय शिकलो?

..तर आपण काय शिकलो?

Subscribe

गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या रोजच्या जगण्यातल्या असंख्य गोष्टी आपण गृहीत धरून चाललो होतो. स्वच्छ मोकळी हवा, बाहेर फिरण्याची मोकळीक, निसर्गाची हवी तितकी लूट, पैशाच्या जोरावर वाट्टेल ते खरेदी करण्याची खुमखुमी, समोर येईल ते आणि येईल त्याला जिंकू शकतो असा उन्माद, आजुबाजूचा निसर्ग, हवं ते दाराशी मिळण्याची व्यवस्था, अगदी रोजचा भाजीपाला, फळं, दूध, पाणी, वीज असं सगळं काही आपल्याला मिळत होतं. त्यामुळे त्याची किंमत कळत नव्हती आणि हो, इथे या सर्व गोष्टींची पैशातली किंमत अपेक्षित नाही. या सर्व गोष्टी आपल्या दाराशी, पायाशी आणून सोडणार्‍या सर्व व्यवस्थेला, निसर्गाला, पाण्याला अशा सगळ्यांनाच आपण गृहीत धरून चाललो होतो. माणूस हा एकमेव मेंदू असलेला बुद्धीवादी प्राणी म्हणून हुशार गणू लागलो होतो, पण माणूस हा एकमेव बुद्धीवादी जरी असला, तरी एकमेव श्रेष्ठ मात्र नाही.

आज हातात कितीही पैसा असला, तरी हवं ते खरेदी करता येणं शक्य नाही. आपली इच्छा सोडा, जेवढं शक्य आणि आवश्यक आहे, तितकंच मिळू शकेल अशी परिस्थिती. ज्या निसर्गाला बखोटी धरून पायाशी आणण्याची मिजास मनुष्यप्राण्यानं चालवली होती, त्याच निसर्गातल्या एका डोळ्यांनाही न दिसणार्‍या विषाणूनं या पृथ्वीतलावरच्या सर्वात बुद्धिवान मनुष्यप्राण्याच्या मानगुटाला धरून गरागरा फिरवत घरात कोंडून टाकलं आहे. काय हिंमत त्याची घराबाहेर पडायची आणि फक्त माणूसच नाही, माणसानं बनवलेल्या सगळ्या संस्था, व्यवस्था आज निसर्गापुढे गुढगे टेकून बसल्या आहेत, पण निसर्गाचा राग काही शांत व्हायचं नाव घेत नाहीये. शंकराचा तिसरा डोळाच म्हणा हवं तर!

इतक्या शतकांची आख्खी मानवजात अवघ्या काही महिन्यांमध्ये पार मेटाकुटीला आली. जगभरात आत्तापर्यंत किमान २५ लाख लोकांना करोना नावाच्या एका अतीअत्यंत सूक्ष्म विषाणूनं ग्रासून टाकलंय. जवळपास २ लाख लोकांचा जीव घेतलाय. अजूनही करोनाचं भीषण रूप दिसायचंय, एकही चूक महागात पडू शकते, करोना अजून बराच काळ आपल्यासोबत राहणार आहे हे खुद्द जागतिक आरोग्य संघटना सांगतेय. करोनावरची लस कधी येईल माहीत नाही. आली तरी तिच्यानं करोना पूर्ण निपटून टाकता येईलच याची शाश्वती नाही आणि एकदा गेला, तर करोना पुन्हा येणारच नाही हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. इतक्या बुद्धीवादी मनुष्यप्राण्याच्या जगभरातल्या संशोधन संस्था मिळून देखील करोनाची लस अद्याप शोधू शकलेल्या नाहीत आणि लाखो लोकांचे मृत्यू हतबलपणे बघत राहणं माणसाच्या हाती राहिलंय. अर्थात, हा विषाणू पसरणार नाही, याची काळजी जरी माणूस घेत असला, तरी कोणत्या क्षणी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या मार्गाने हा व्हायरस माणसावर हल्ला करेल, याचा ठावठिकाणा माणसाला नाही. या निसर्गाचा घटक असलेल्या एका अतीसूक्ष्म विषाणूपुढे अवघी मानवजात हतबल झालीये. कदाचित कालांतराने त्याला मारणारी लस शोधली जाईल देखील, पण तोपर्यंत त्यानं अजून किती जणांचे जीव घेतले असतील, याचा ताळमेळ आत्तातरी जगभरातल्या संख्याशास्त्रीय पंडितांना देखील लावता आलेला नाही.

- Advertisement -

करोना कुठून आला, त्याला कोण कारणीभूत झालं हे प्रश्न खरंतर गौण आहेत, पण करोनासारखे महाभयंकर आणि जीवघेणे हजारो विषाणू आजही या निसर्गात आहेत, हे माणसाला पुन्हा एकदा कळून चुकलंय. तसं ते प्लेगच्या वेळी कळलं होतं, मलेरियामुळे अजूनही कळतंय, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूू, निपाह…करोनाच्या अशा अनेक भावंडांनी त्या त्या काळात मानवजातीला उभं आव्हान दिलं आहे आणि शेकडो, हजारो, लाखोंचे जीव घेतले आहेत, पण इतक्या अनुभवांमधूनही माणसानं काही बोध घेतलाय हे अजूनतरी दिसत नाही. इथे कुठल्या देशाला किंवा तिथल्या खाद्यसंस्कृतीला दोष देऊन उपयोग नाही. कारण हे देश इतक्या वर्षांपासून हेच करत आले आहेत, पण तेव्हा त्यांना सतर्क करण्याचे कष्ट जगात कुणीही घेतले नाहीत. कारण? ‘चीनमध्ये ते सुरू आहे, आपल्याकडे कुठे येणार?’… सगळंच गृहीत धरण्याची आपली वृत्ती! वन्यप्राण्यांच्या अधिवासात आपण अतिक्रमण केलं की ते आपल्या अधिवासात मुक्तसंचार करू लागतात हे असंख्य उदाहरणांवरून आपल्याला दिसून आलं आहे. करोना हे त्याचंच व्यापक आणि भीषण रूप म्हणता येईल. माणसानं त्यांच्या क्षेत्रात घुसून खाद्य-अखाद्य असा फरक न करता भक्षण करायला सुरुवात केली. मग त्यांच्या अधिवासातल्या विषाणूंनी माणसाच्या पेशींचं भक्षण करायला सुरुवात केली. इतकाच काय तो फरक!

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी पर्ल हार्बर या अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून वेगळ्या पण त्यांच्याच देशाचा भाग असलेल्या तळावर जपानने बॉम्ब हल्ला केला आणि महायुद्ध पेटलं. कारण अमेरिकेच्या धर्तीवर कुणीतरी हल्ला केला होता. २००१ साली ओसामा बिन लादेनने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानं डागली आणि अमेरिका चवताळून उठली. कारण अमेरिकेच्या भूमीवर झालेला हल्ला. एरवी अमेरिकेतच काय, जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असलेल्या अमेरिकी नागरिकांच्या केसालाही धक्का लागला, तर खवळणारा अमेरिकेसारखा धनाढ्य, बलाढ्य, सर्वशक्तीमान देश आज करोनाच्या हल्ल्यापुढे अक्षरश: गलितगात्र झाला आहे. रोज शेकडो अमेरिकी नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. हजारोंना करोनाची लागण होत आहे आणि अमेरिकेचं सर्वशक्तीमान सरकार मात्र एका मर्यादेपलीकडे काहीही करू शकत नाहीये. जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र, अनेक देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, प्रतिनिधी यांनी सांगितलेल्या असंख्य गोष्टींमधली एक गोष्ट समान आणि महत्त्वाची आहे. इथून पुढची सामान्य जनजीवनाची व्याख्या इथून मागच्या सामान्य जनजीवनाच्या व्याख्येपासून फार वेगळी असेल. पूर्वीसारखं काहीही नसेल!

- Advertisement -

गेल्या काही शे वर्षांमध्ये माणसाच्या जीवनशैलीत जे काही बदल झाले, त्याचा परिणाम आधी निसर्गाला आणि अंतिमत: माणसाला भोगावा लागतो आहे. मग ते ग्लोबल वॉर्मिंग असो, दिवसागणिक वितळणारा हिमनग असो, जगात ठिकठिकाणी येणारे महापूर असोत किंवा मग कोरोना आणि त्याच्या भाऊबंदकीत येणारे व्हायरस असोत. त्यामुळे आता राहणीमान बदललं नाही, जगण्याच्या पद्धतीत बदल केला नाही, निसर्गाला गृहीत धरणं सोडलं नाही तर असे अनेक मनुष्यसंहार उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल. काही सवयी पूर्णपणे बदलाव्या लागतील, काही सवयी अल्प प्रमाणात का असेना पण बदलाव्या लागतील. निसर्गाभिमुख जीवनपद्धतीचा अवलंब करणं जास्त हितावह ठरेल. या सवयी जशा निसर्गात होणार्‍या अतिक्रमणाच्या बाबतीत आहेत, तशाच त्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेच्या बाबतीत देखील असतील. शासनाला देखील आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या घटकावर होणारा खर्च, तयार केल्या जाणार्‍या योजना यांच्यात वाढ करावी लागेल. संशोधनपर यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करावं लागेल. अशा कोणत्याही निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकटासाठी तयार राहावं लागेल. ग्रेटा थनबर्ग या तरुणीने मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेमध्ये व्यक्त केलेली भीती गांभीर्याने न घेता अजूनही असंच वागत राहिलो, तर पुढच्या दशकभरात ग्लोबल वॉर्मिंगचे भीषण फटके आणि चटके आपल्याला सहन करावे लागतील हे निश्चित.

खरंतर करोनाच्या या संकटात जमेची बाजू शोधायचीच झाली, तर स्वच्छ हवा म्हणजे काय प्रकार असतो, हे गेल्या कित्येक दशकांत आपण जणू विसरलोच होतो. त्याची जाणीव मनुष्यप्राण्याला पुन्हा झाली. जग बंद पडल्यामुळे हवेचा स्तर लक्षणीय रीत्या सुधारला! हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, दलित, मराठा, जात, पात, धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन करोनानं सगळ्यांना एका रांगेत उभं करून हल्ला केला आणि म्हणूनच हे सगळे एका रांगेत उभे राहून त्याचा सामना करतायत. असं चित्र फार कमी वेळा दिसतं. कारण कधी हल्ला करणारे निवडक लोकांवरच हल्ला करतात तर कधी सामना करणारे निवडकच लोकं असतात! सधन आणि सुस्थित माणसं घराघरातं बंद असली तरी पोटभर खात असताना रस्त्यावर उपाशी राहणार्‍यांना मदतीचा हात देणारी माणसातली माणुसकी पुन्हा एकदा समोर आली. जगातल्या सर्वच राजकारण्यांना कधीही वाटली नसेल एवढी राजकारण विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज वाटू लागली. अर्थात, याला काही अपवाद जरी असले, तरी एकूणच राजकारण्यांचा कल हा राजकारण सोडून समाजकारणाकडे अधिक जाणवू लागला. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था पार घुसळून निघाली. शेवटी जिथे भग्नावशेष होतात, तिथेच नव्या निर्मितीची शक्यता आणि संधी निर्माण होते. पण आता गरज फक्त एकाच गोष्टीची आहे…

करोनाच्या या संकटातून आपण खरंच काहीतरी शिकून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आपल्या आसपास आज घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवतेय…जर हे संकट ओसरल्यानंतर देखील आपण त्यातून काहीही धडा न घेता पुन्हा पूर्वीच्याच सवयींवर, राहणीमानावर आणि जीवनमानावर आलो, तर मात्र आपण करोनासारख्याच नव्या संकटाला आमंत्रणच देऊ. पण जर धडा घेतला आणि शिकून, तावून, सुलाखून बाहेर पडलो, तर आज करोनाचे फटकारे देणारा निसर्ग दोन्ही हात पसरून अलिंगन देण्यासाठी उभा आहेच!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -