घरफिचर्ससोनियांचा राग भैरवी

सोनियांचा राग भैरवी

Subscribe

२०१९ च्या निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीपासून दूर झाल्यावर राहुल गांधी यांनी पक्षाशी संबंधित राजकीय घडामोडींच्या बाबतीत नेत्यांपासून लक्षणीयरीत्या फारकत घेतली होती. त्याआधी राहुल गांधी आपल्या सोयीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे अनेक नेत्यांना भेटत असत. त्यांच्याबरोबर राजकीय मुद्द्यांवर चर्चा करत बैठका करत. अनेकदा भोजनाचा कार्यक्रमही करत. मात्र पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर गेल्यावर या सगळ्या गोष्टींना राहुल गांधी यांनी पूर्णविराम दिला होता.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी आपल्या खमकेपणाचा कडक भैरवी राग काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये आळवला. या रागाचे सूर अगदी काँग्रेसजनांच्याच नव्हे तर काँग्रेसमधल्या पक्षीय विरोधकांच्याही आणि विरोधकांच्याही कानात उत्तमरित्या घुमले असतील. राहुल गांधी यांनी २०१९ ला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पूर्णवेळ अध्यक्ष कोण असणार याबद्दल विविध चर्चांना देशभरात ऊत आला होता. त्यातच जी- २३ मुळे काँग्रेसमध्येच विरोधाचे धुमारे फुटत असतानाच सोनिया गांधींनी जो खंबीरपणा दाखवलेला आहे तो पाहता या नेत्यांनी आपल्या विरोधी शिडात भरलेली हवा होती ती एव्हाना काढून घेतली असेल. पुढील वर्षी पक्षांतर्गत निवडणुका होतील तोपर्यंत मीच पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा असणार आहे. ज्यांना कोणाला पक्षांतर्गत विषयांबद्दल चर्चा करायची असेल त्यांनी ती थेट माझ्याशीच करावी. माध्यमांमधून करू नये. अशा स्वरूपाचा सज्जड दमच सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना भरला आहे. येणार्‍या वर्षभरासाठी काँग्रेसची सगळी सूत्रं आपल्या हाती ठेवणार्‍या सोनिया गांधी यांनी काल आणखी एक संदेश देऊन टाकला तो म्हणजे काँग्रेस पक्ष हा गांधींचा आहे आणि गांधी परिवार हाच या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये गांधींच्या व्यतिरिक्त नेतृत्व असावं असा विचार करणार्‍यांना ही सोनिया गांधींनी आपल्या दुर्गावताराने योग्य ते उत्तर दिले आहे. पुढील वर्षी जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेला प्रियांका गांधी नाही तर राहुल गांधीच पक्षाच्या अध्यक्षपदी असतील असे संकेत द्यायलाही सोनिया चुकलेल्या नाहीत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्ष काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रत्यक्ष उपस्थितीने झालेली नव्हती. ज्या बैठका होत होत्या त्या दूरदृश्य प्रणालीद्वारे होत्या. तसेच कोविडमुळे सोनिया गांधी यांना महत्वाच्या नेत्यांनादेखील भेटू दिलं जात नव्हतं. सध्या सोनिया गांधी या आजारी आहेत हे जरी खरं असलं तरी त्या पक्ष संघटनेच्या कामात पूर्णवेळ सहभागी असल्याचं के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं. काँग्रेस कार्यसमितीच्या या बैठकीला जे नेते उपस्थित होते. यापैकी अंबिका सोनी, चरणजीतसिंह चन्नी, अशोक गेहलोत या मंडळींनी राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष बनण्यासाठी आणि पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी जोरदार मनधरणी केली. त्यांचा आग्रह पाहता आपण अवश्य विचार करू असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं आहे. लखीमपुरमध्ये जाण्याआधीपासून काही महिन्यांपूर्वीच प्रियांका गांधी काँग्रेसची सूत्रं हाती घेणार की काय अशी एक चर्चा पक्षात आणि पक्षाबाहेरच्या राजकीय मंडळींमध्ये सुरू झाली होती. त्या चर्चेवर स्वतः सोनिया गांधी यांनीच पडदा टाकला. काँग्रेस हा जरी सव्वाशे वर्षे जुना पक्ष असला तरी त्यावर बहुतांश वेळ गांधी-नेहरू कुटुंबाचीच पूर्ण पकड राहिलेली आहे. शनिवारच्या बैठकीत पुन्हा एकदा या पक्षावर गांधी कुटुंबीयांची पकड आहे आणि तीच कायम राहील असे संकेत द्यायलाही सोनिया गांधी विसरल्या नाहीत. पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षांची निवड अशी घोषणा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी खरंतर त्रिसूत्री कार्यक्रमाचा समारोप करून टाकला. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जी २३ या बंडासाठी उत्सुक असलेल्या मंडळींच्या शिडातली हवा काढणे, त्यानंतर शारीरिकदृष्ठ्या अडचणी आणि तक्रारी असल्या तरी पक्षावर आपलीच पर्यायाने गांधी कुटुंबीयांची पकड आहे हा दुसरा मुद्दा तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भविष्यात प्रियांका नाही तर राहुलच काँग्रेस नेतृत्व करणार. प्रियांकाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हेदेखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचे वेध नरेंद्र मोदी यांना लागलेले आहेत. त्यासाठी मोदी यांचा अश्वमेध रोखणारा नेता सध्यातरी विरोधकांकडे दिसत नाही. २०२२ ला राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळालं तर त्यानंतर होणार्‍या २०२४ मधील निवडणुका या राहुल यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत हे देखील सोनिया गांधी यांनी काल स्पष्ट केलेलं आहे. भाजपकडून सुरू असलेल्या प्रत्येक डावपेचांना यथाशक्ती तोंड देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते राहुल गांधीच आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर नेतृत्व करण्यासाठी भावनिक दबाव आणण्याचा प्रयत्न अंबिका सोनी अशोक गेहलोत, चरणसिंग चन्नी, रणजीतसिंह सुरजेवाला आदी मंडळींनी केलेला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंह चन्नी यांची निवड करण्याचं पक्षाने ठरवलं असल्याचा फोन त्यांना केल्यावर समोरच्या बाजूला त्यांनी हा पक्ष निर्णय ऐकल्यानंतर भावना अनावर होऊन ते कसे ढसाढसा रडत होते ही गोष्ट राहुल गांधी यांनी सांगितली. पंजाबसारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंह चन्नी यांची झालेली निवड ही फक्त काँग्रेससारख्या दलित, मागासवर्गीय कार्यकर्त्यांना संधी देणार्‍या पक्षातच होऊ शकते. भाजप किंवा आरएसएस सारखी मंडळी हा विचारही करु शकत नाहीत असा मुद्दाही राहुल यांनी मांडला.

- Advertisement -

२०१९ च्या निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीपासून दूर झाल्यावर राहुल गांधी यांनी पक्षाशी संबंधित राजकीय घडामोडींच्या बाबतीत नेत्यांपासून लक्षणीयरीत्या फारकत घेतली होती. त्याआधी राहुल गांधी आपल्या सोयीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे अनेक नेत्यांना भेटत असत. त्यांच्याबरोबर राजकीय मुद्द्यांवर चर्चा करत बैठका करत. अनेकदा भोजनाचा कार्यक्रमही करत. मात्र पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर गेल्यावर या सगळ्या गोष्टींना राहुल गांधी यांनी पूर्णविराम दिला होता. त्या गोष्टी त्यांनी पक्षाध्यक्षपदाकडे जायचं असेल तर पुन्हा एकदा सुरू कराव्या लागतील. सोनिया गांधी यांचा आजारपण, कोरोना यामुळे अनेक महत्वाच्या नेत्यांनाही त्या भेटेनाशा झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस हा नेतृत्वाविना पोरका झालेला पक्ष अशी देशातील राजकीय वर्तुळामध्ये त्याची प्रतिमा झाली होती. काँग्रेसची ही हालत बघून शरद पवारांसारख्या फक्त प्रादेशिकच नव्हे तर उपप्रादेशिक नेते असलेल्या नेत्यांनाही काँग्रेसची खिल्ली उडवण्याची आयती संधी मिळाली होती. सोनिया गांधी यांनी केलेला हा प्रयत्न शरद पवारांसारख्या अनेकांना चपखल उत्तर देणारा ठरू शकतो. लखीमपूरमध्ये गेलेल्या प्रियांका गांधींची इंदिरा गांधींशी तुलना करणार्‍या काँग्रेसजनांनी आता काळ बदलतोय याचं भान ठेवण्याची गरज आहे. इंदिरा पर्व हा काँग्रेसच्या एकूणच वाटचालीतला सुवर्ण काळ असला तरी आता जमाना बदलला आहे. राजकीय वातावरण, त्यासाठीची साधनसामुग्री, माध्यमं, जनसामान्यांचे प्रश्न, देशासमोरील मुद्दे इतकंच काय पण राजकीय पक्षांची त्याकडे बघण्याची दृष्टी या सगळ्याच गोष्टींबाबत आता काँग्रेसला नव्याने विचार करावा लागणार आहे. सोनिया गांधी यांनी दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीमध्ये काँग्रेसच्या तळापासून ते अगदी वरपर्यंतच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करून नव्या उमेदीने मैदानात उतरावं लागेल तरच मोदींना रोखणं हे काँग्रेसला आता जरी अशक्य वाटत असलं तरी तोच एक असा पक्ष आहे जो देशभरात तळागाळात पोचलेला आहे. आणि त्यामुळेच मोदींना थोपवणं हे त्याला शक्य आहे. अर्थात नेतृत्वाची अग्निपरीक्षा काँग्रेस पक्षाध्यक्ष कशा स्वरूपात करून घेतात यावरच काँग्रेसची दारोमदार आणि विरोधकांची धार अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -