घरठाणेठाण्यात रामदास कदम समर्थकांची बॅनरबाजी

ठाण्यात रामदास कदम समर्थकांची बॅनरबाजी

Subscribe

ढाण्या वाघ संबोधून बाप, बापच असतो, असा इशारा

ठाणे – शिवसेनेत काही तरी शिजतेय. कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. तसेच अनेक शिवसैनिकांचा त्यामुळे कदम यांच्यावर रोष आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम आले तर त्यांचा हुर्यो उठवण्याचा बेत होता, असे कळते. पण तो अगोदरच कळल्यामुळे रामदास कदम हे प्रकृतीच्या कारणामुळे मेळाव्याला आले नाहीत. त्यातच आता ठाण्याच्या नितिन कंपनी चौकात एक मोठे बॅनर फडकले आहे. त्यात रामदास कदम यांना ढाण्या वाघ असे संबोधण्यात आले असून काहीजणांना त्याद्वारे इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर शिवसेना असा उल्लेखही नाही. या बॅनरची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बापच असतो’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. तर त्यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणार्‍या वाघाचे चित्रही काढण्यात आले आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचे दोन कट्टर समर्थक विठोबा कदम आणि रविशेठ आमले यांचे फोटो आहेत.बॅनरवर शिवसेनेचा उल्लेख नसला तरी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. रामदास कदम यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरील मजकूर कुणाला उद्देशून आहे? कुणी कुणाची सुपारी दिली? अशी चर्चा आता ठाणे आणि परिसरात सुरू झाली आहे.

- Advertisement -

रामदास कदम यांनी ६ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे. त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याला एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं होतं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -