घरफिचर्सस्वदेस ये जो देस हैं तेरा

स्वदेस ये जो देस हैं तेरा

Subscribe

प्रवास ही ‘स्वदेस’मध्ये समाविष्ट असलेल्या काही मूलभूत संकल्पनांपैकी एक आहे. प्रवास ही संज्ञा काही – ‘एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत केलेला प्रवास’ इतक्या शब्दशः अर्थापुरती कधीच मर्यादित नव्हती. प्रवास हा जितका भौतिक, शारीरिक स्वरूपाचा असू शकतो, तितकाच पात्रांच्या मानसिक स्थित्यंतराशी संबंधित असू शकतो. ‘स्वदेस’ पाहताना आपल्याला या गोष्टीची अनुभूती येते. त्यातूनच ये जो देस हैं तेरा, ही भावना उचंबळून येते.

चित्रपट या माध्यमाचा, आणि मानवी भावना, संवेदना, जाणिवा-नेणिवा या शब्दांचा घनिष्ट संबंध आहे. इतका की एखाद्या व्यक्तीला एखाद्या चित्रपटाच्या चांगल्या वाटण्या-न वाटण्याची तीव्रता अनेकदा त्या व्यक्तीची सदर चित्रपट पाहतानाची मनस्थिती, त्याचं चित्रपटातील पात्रांशी निर्माण होणारं (किंवा न होणारं) भावनिक नातं अशा गोष्टींवर अवलंबून असते. चित्रपटाची भिस्त जितकी कथा, पटकथा, मांडणी आणि इतर तांत्रिक बाबींवर असते, तितकीच भावनिक आवाहनावरही असते. त्यामुळे ‘सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ’, (नायकाचं) ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रण हे एव्हाना बर्‍याच लोकांच्या परिचयाचे झालेले शब्द चित्रपटाच्या एकूण परिणामाचा विचार करता महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच समकालीन भारतातील काही महत्त्वाच्या सांस्कृतिक, सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ (आणि त्यातील नायक) अनेक अर्थांनी वास्तविकतेचं दर्शन घडवणारा असला तरी तो पाहताना थोड्या प्रमाणात का होईना, पण सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफची गरज भासते.

- Advertisement -

कथेत येणार्‍या गावातील विजेच्या कमतरतेची समस्या आणि त्यावरील उपायाच्या प्रकरणाबाबत तर जरा अधिकच. अर्थात दाहक वास्तव आणि एका सुखद, सकारात्मक भविष्याची कल्पना दाखवणार्‍या ‘स्वदेस’मध्ये काही प्रमाणात भासणार्‍या सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफची गरज ही काही त्यातील मोठी उणीव नाही. कारण एका मोठ्या चित्राचा विचार करता ती भावनिक पातळीवर नक्कीच परिणामकारक ठरते.

मोहन (शाहरुख खान) हा ‘नासा’मध्ये कार्यरत असलेला परदेशस्थित भारतीय अमेरिकेत स्थायिक असताना सर्व सुखसुविधांनी संपन्न असं आयुष्य जगत असला तरी अजूनही भारतात राहणार्‍या कावेरी अम्माच्या (किशोरी बल्लाळ) रूपात त्याची भारताशी असलेली एकमेव नाळ टिकून आहे. त्याच्या बालपणी त्याच्या पालकत्वाची जबाबदारी निभावणारी कावेरी अम्मा त्याला प्राणाहूनही प्रिय आहे. आपण आता अमेरिकेत स्थिरस्थावर झालेलो असताना तिला भारतातून अमेरिकेत आणून तिची देखभाल करावी या इच्छेने तो भारतात येतो. कावेरी अम्मा आता वृद्धाश्रमात नसून गीतासोबत (गायत्री जोशी) चरणपूर नावाच्या एका गावात राहत असल्याचं कळाल्यावर त्याच्याकडे तिथे जाण्याहून वेगळा पर्याय उरत नाही. एकामागून एक गोष्टी घडत जातात, मोहनच्या प्रवासाचं भौतिकत्व कमी होत जाऊन त्याला त्याच्या आत्मशोधाच्या प्रवासाचं रूप प्राप्त होतं. त्याचा हा प्रवास केवळ एकट्याचा न राहता त्याच्या इतकाच त्यात जोडल्या गेलेल्या माणसांचा बनतो.

- Advertisement -

एकीकडे आपलं स्वातंत्र्य अबाधित राखू पाहणार्‍या, स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारसरणी असलेल्या गीताकडे मोहन आकर्षित होत जातो, तर दुसरीकडे पोस्ट मास्तर निवारण (राजेश कुमार) असो वा मेलाराम (दयाशंकर पांडे), प्रत्येक जण या प्रवासाचा भाग बनतो. निवारणच्या निमित्ताने प्रत्यक्ष सरकारी प्रणालीमधील उणिवा दिसतात, तर मेलाराम आणि इतर लोकांच्या माध्यमातून समाजातील जातिव्यवस्थेची उतरंड, गरिबीचे दर्शन होते. सवर्ण मोहन जसजसा भारतातील समाजव्यवस्था आणि शासनाच्या प्रक्रियेचा अनुभव घेत जातो, तसतसा त्याला आपलं विकसित राष्ट्रातील विशेषाधिकारांनी परिपूर्ण असलेलं सुखद आयुष्य आणि इथल्या वास्तवातील फरक लक्षात येत जातो. हळूहळू चित्रपटाची टॅगलाईन असलेले ‘वुई द पीपल’ हे शब्द अधिक ठळक होत जाऊन त्यांच्या महत्त्वात भर पडते.

एका थर्ड वर्ल्ड कंट्रीमधील अंतर्गत व्यवस्था, मग ती शासनप्रणाली असो की समाजव्यवस्था, तिच्यातील उणिवा इथे स्पष्टपणे अधोरेखित केल्या जातात. गावातील जातीभेदासारख्या त्याला खटकणार्‍या बाबी, देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मागे असणं या गोष्टींबाबत बोलत असताना मोहन एक मार्मिक टिप्पणी करतो. ती अशी, ‘जब भी हम मुकाबले में दबने लगते हैं, हम एक ही चीज का सहारा लेते हैं, हमारे संस्कार और परंपरा’. मात्र, असं दिसतं की खुद्द मोहनदेखील केवळ हातचं राखत टीका करण्यावर विश्वास ठेवतो. जे ‘स्वदेस’ मांडू पाहत असलेल्या आणखी महत्त्वाच्या मुद्याकडे आणून सोडतं. तो म्हणजे देशात बदल घडवून आणण्याची बौद्धिक क्षमता असणार्‍या तरुणाईची विदेशी कंपन्यांमध्ये रुजू होण्याच्या निमित्ताने घडून येणारी निर्यात. अर्थात, चित्रपट या समस्येचं पर्मनंट निवारण करता येईलसा उपाय सुचवत नसला तरी तो या मुद्याला अधिक संवेदनशीलरित्या हाताळतो. त्याच्या परिणामामुळे आशुतोष गोवारीकरच्या संयत दिग्दर्शनाचं महत्त्व लक्षात येतं.

गोवारीकरची संगीताची (आणि सांगीतिकेचीही) जाण इथेही अधोरेखित होते. कारण ए. आर. रेहमानचं संगीत-पार्श्वसंगीत आणि जावेद अख्तरचे शब्द ‘स्वदेस’चा जीव आहेत. ते केवळ जागा भरण्याचं काम न करता पात्रांच्या भावना पडद्यावर आणत चित्रपटाला पूरक ठरतात. ‘यूँ ही चला चल राही’ मोहनच्या पुढे येऊ घातलेल्या प्रवासाची कल्पना देतं. मात्र, मोहनचं आणि सदर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर भारतात परतलेल्या लाखो परदेशस्थित भारतीयांचं थीम साँग बनण्याचा मान निर्विवादपणे ‘ये जो देस हैं तेरा’कडे जातो. ज्यात चित्रपटाचा संपूर्ण अर्क एकवटत, त्याच्या मध्यवर्ती पात्राची मनस्थिती याहून परिणामकारकपणे चितारली जाते.

प्रवास ही ‘स्वदेस’मध्ये समाविष्ट असलेल्या काही मूलभूत संकल्पनांपैकी एक आहे. प्रवास ही संज्ञा काही – ‘एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत केलेला प्रवास’ इतक्या शब्दशः अर्थापुरती कधीच मर्यादित नव्हती. प्रवास हा जितका भौतिक, शारीरिक स्वरूपाचा असू शकतो, तितकाच पात्रांच्या मानसिक स्थित्यंतराशी संबंधित असू शकतो. मोहन भार्गव जेव्हा काही वैयक्तिक कारणांमुळे भारतात येतो, तेव्हा इथे हा प्रवास भौतिक आणि मानसिक, दोन्ही पातळ्यांवर घडून येणं साहजिक आहे. मात्र चित्रपटाच्या कथेचा आणि त्यातही पुन्हा पटकथेचा विचार करायचा झाल्यास कथानकाची पारंपरिकदृष्ठ्या केली जाणारी मांडणी इथे दिसत नाही.

चित्रपटात समस्यांचं अस्तित्त्व असलं तरी ते ‘विकसनशील राष्ट्रांमधील समस्या’ अशा संकल्पनात्मक स्वरूपाचं आहे. ते कथेतील पात्रांच्या स्वभावविशेषात, चित्रपटाच्या पुढे सरकण्याच्या प्रक्रियेत हातभार लावणारं नाही. त्यामुळे नेहमीच्या चित्रपटांमध्ये दिसून येणार्‍या चढ-उतारांचा आलेख स्थिर असणारा आहे. शिवाय, चित्रपटाचा संभाव्य शेवटदेखील भाकीत करता येण्याजोगा आहे. परिणामी कथेच्या मांडणीच्या पातळीवर ‘स्वदेस’ बर्‍याच अंशी अपारंपरिक स्वरूपाचा ठरूनही प्रभावी ठरतो. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास चित्रपटाचा अर्क लक्षात घ्यायचा झाल्यास असं म्हणता येईल की, इथे खुद्द प्रवासाची अनुभूती ही त्याच्या शेवटापेक्षा अधिक महत्त्व बाळगणारी आहे.

‘स्वदेस’ हा एक सदोष चित्रपट आहे. मात्र, तो त्याच्या प्रेमात पडायला भाग लावणाराही आहे. त्यातील भावना थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. त्यात मांडलेले मुद्दे विचार करायला भाग पाडणारे आहेत. त्यात देशप्रेमाचा आव आणलेला नसला तरी तो मनात जी भावना निर्माण करतो ती वर्णन करता न येण्याच्या पल्याडची आहे. त्याच्या या भावनिक परिणामाच्या माध्यमातून त्याच्या एकूण प्रभावात जी भर पडते ती त्याला अधिक समृद्धता बहाल करणारी आहे. त्यामुळेच त्याच्या एकत्रित परिणामाचा विचार केला जातो, तेव्हा तो नव-क्लासिक चित्रपटांच्या यादीत हमखास उल्लेख करावासा ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -