घरफिचर्सयुद्ध संपलेले नाही...

युद्ध संपलेले नाही…

Subscribe

3 मे नंतर लॉकडाऊन हटवण्यात येणार असल्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून त्याबाबत सुस्पष्ट सूचना आलेल्या नसल्याने या केवळ अफवा आणि अफवाच असल्याचे उघड आहेच. लॉकडाऊन हटवण्याबाबत 3 मे नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. लॉकडाऊन संपणार किंवा नाही, अंशतः तसेच पूर्णतः किंवा आणखी कठोर होईल, या प्रश्नांची उत्तरे त्याच वेळी मिळतील. मात्र, लोकांमध्ये आतापासून सुरू असलेली लॉकडाऊन संपवण्याविषयीची चलबिचल धोकादायक आहे. लॉकडाऊनमध्ये बदल करण्याबाबत निश्चित धोरण ठरवले जायला हवे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. कोविड 19 चा संसर्ग त्याचे प्रमाण सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि लोकांमधील संयम याचा विचार करून लॉकडाऊन शिथिल किंवा कठोर करावा, याबाबत निर्णय होईल.

राज्यामध्ये रेड, ग्रीन आणि आँरेंज झोनमध्ये विभागवार रचना करण्यात आल्यानंतर हॉटस्पॉटही ठरवण्यात आले आहेत. सामाजिक संसर्गाला अजूनतरी महाराष्ट्राने रोखून धरलेले आहे, ही जमेची बाब आहे. भारतीयांची आजाराची लढण्याची क्षमताही इतर देशांच्या तुलनेत उजवी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. करोनाविरोधातील लढ्यात ही दिलासादायक बाब आहे. याशिवाय उन्हाळ्यात किंवा जास्त तापमानात करोनाचा विषाणू फार काळ तग धरू शकत नाही, याबाबतही काही परदेशातील संस्थांनी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय मे महिन्यात देशात करोना अधिक सक्रिय होणार असल्याचेही अभ्यासगटांचे मत आहे. ही दोन्ही मते परस्परविरोधाभासी आहेत. मे महिन्यात देशातील विशेष करून महाराष्ट्रातील तापमान वाढलेले असते. कमाल तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्याही पुढे गेलेले असते. हे वाढलेले तापमान करोनाच्या विषाणूसाठी पुरेसे अनुकूल ठरणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास कोविड 19 ला रोखण्यात आपल्याला पूर्ण यश येईल.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यानंतर इतर राज्यातील स्थितीचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. योग्य ठिकाणी लॉकडाऊन कायम रहावा आणि लोकांचे दैनंदिन जगणे सुकर व्हावे, यासाठी योग्य उपाययोजनेची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा कहर वाढलेला नाही. हे जरी खरे असले तरी गाफील होणे परवडणारे नाही. देशातील दहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची सूचना केंद्राकडे केली आहे. ही परिस्थिती सकारात्मक आणि परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करणारी आहे.

यात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. तसेच तेलंगण राज्याने सात मे पर्यंत लॉकडाऊन यापूर्वीच वाढवलेला आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आखलेल्या उपाययोजनेचे परिणाम दिसू लागले आहेत. देशातील काही जिल्हे करोनामुक्त होत आहेत, तर काही जिल्हे करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लॉकडाऊनबाबत जो काही निर्णय होईल तो होईलच. मात्र, महाराष्ट्रातील रेल्वे आणि वाहतूक सेवा सुरू करण्याची घाई राज्याला परवडणारी नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे ही तीन महत्त्वाची शहरांध्ये करोनाचा कहर सुरू आहे. ही तीनही शहरे महानगरे आहेत. या शहरांमधील लोकसंख्या आणि दाटीवाटीने असलेल्या लोकवस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईतील धारावीतील प्रत्येक व्यक्तीच्या तपासणीचा केलेला प्रयत्न स्वागतार्ह आहे. धारावीप्रमाणेच मुंबईतील दाटीवाटींच्या वस्त्यांवर महापालिका आणि आरोग्य यंत्रणांचे चोख लक्ष आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सकारात्मक संवाद साधला. येत्या रमजानबाबतही त्यांनी सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातील देवाला ओळखण्याची साद घातली. संयम, शिस्त आणि योग्य दिशेने केल्या जाणार्‍या उपायांच्या मार्गाने महाराष्ट्र करोनामुक्त होईल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तबलिगी प्रकरण, वांद्रे स्थानकातील अचानक झालेली गर्दी, तसेच पालघरमधील साधूंच्या हत्येची गंभीर घटना, यावरून राज्यातील राजकारण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे मनसुबे राज्य सरकारने आणि जनतेने हाणून पाडले. करोनाविरोधातील लढ्याची दिशा जमातवादी राजकारणाकडे वळवण्याचे हे प्रयत्न करोनासारखेच धोकादायक होते. परंतु, राज्यातील संयमी नेतृत्वाने ही तीनही प्रकरणे योग्य पद्धतीने हाताळल्याने तणाव नियंत्रणात आला. परंतु, ही लढाई अद्याप संपलेली नाही.

परदेशातून खासकरून चीनमधून देशात आणलेल्या कोविड 19 च्या युद्धात सर्वात पुढे असलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षा किटच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही किट्स सदोष आहेत, शिवाय करोनासाठीच्या जलद तपासणीतील साधनेही सदोष असल्याने ती पुरेशी विश्वासार्ह नसल्याचेही म्हटले जात आहे. याशिवाय ज्यांच्यात कोविड 19 ची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, ते पॉझिटिव्ह असू शकतात, या शक्यतेबाबतही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. या सर्व कमकुवत बाजूही ध्यानात घेतल्या तरी राज्यात करोना नियंत्रणातच आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकाडाऊनचे नियम पाळून करोनाविरोधातील ही लढाई आपणास जिंकायची असेल तर आपल्याकडे मे महिन्याचाच कालावधी आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर ही लढाई आपल्यासाठी कठीण होणार आहे. त्यामुळे हीच वेळ आहे करोनाविरोधात लढण्याची.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -