घरक्रीडाऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप नकोच !

ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप नकोच !

Subscribe

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या खेळही बंद आहेत. जगातील सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाबाबत मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही. करोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बरेच आर्थिक नुकसान झाले असून ते हा विश्वचषक ठरल्याप्रमाणेच घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक घेणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अव्यवहार्य वाटते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत टी-२० विश्वचषकाबाबत चर्चा झाली, पण कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. परिस्थिती पूर्ववत झाल्यावरच ही स्पर्धा घेणे योग्य ठरेल असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याला वाटते. अगदी खरे सांगायचे तर टी-२० विश्वचषक ऑक्टोबरमध्ये घेणे अव्यवहार्य वाटते. सध्याच्या परिस्थितीत बरेच लोक एकत्र जमणे हा विचारही मूर्खपणाचा वाटतो. आंतरराष्ट्रीय प्रवास कधी सुरक्षित होईल हे आताच सांगणे अवघड आहे. काही लोक म्हणतात की जूनपासून प्रवास सुरक्षितपणे सुरु होईल, तर काही लोकांच्या मते आणखी वेळ लागेल. निर्बंध उठल्यावर प्रवास किती सुरक्षित आहे आणि करोनावर किती नियंत्रण आहे याचा अभ्यास झाला पाहिजे, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्या अधिकर्‍याने पुढे सांगितले, विश्वचषकासारखी स्पर्धा भरवताना खूप लोकांचा सहभाग असतो. या लोकांची जबाबदारी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी घेणार का, हा खरा प्रश्न आहे. तसेच ऑस्ट्रेलियन सरकार इतका मोठा धोका पत्करणार का? त्यांनी होकार दिल्यास इतर क्रिकेट संघटनांना पुरेसा वेळ मिळणार का? इतर देशांतील सरकारे त्यांच्या संघांना प्रवास करण्याची परवानगी देणार का? तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता चाहत्यांना स्टेडियममध्ये एकत्र जमून सामने पाहावेसे वाटेल का?, असे बरेच प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे मिळाल्यावरच टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय घेता येईल.

वर्ल्डकप लांबणीवर पडू शकेल -फिंच
करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषकही लांबणीवर पडू शकेल असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला वाटते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता टी-२० विश्वचषक महिना, दोन महिने, तीन महिने किंवा आणखी काही महिन्यांनी लांबणीवर पडू शकेल हे आपण गृहीत धरले पाहिजे, असे फिंच म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -