घरफिचर्स...असे ‘अखिल भारतीय’ होणे जमेल का आपणाला?

…असे ‘अखिल भारतीय’ होणे जमेल का आपणाला?

Subscribe

सामाजिक पातळीवर व्यक्तीचे ‘भारतीयीकरण’ करण्याचे प्रयत्न सतत सुरूच असतात. पण दिवसेंदिवस औपचारिक शिक्षणातून केले जाणारे प्रयत्न अपुरे ठरू लागले आहेत. त्यातही आता कुटूंब आणि समाजाच्या पातळीवर जे औपचारिक शिक्षण मिळते, त्यातून तर जातीय, पंथीय, धार्मिक अस्मिता तीव्र करण्याची स्पर्धा सुरू आहे. आपण कोणत्या जातीचे, त्यातही पोटजातीचे, पंथाचे, धर्माचे आणि प्रदेशाचे आहोत हे अधिकाधिक ठळक करत जाणे याची तीव्रता वाढत असताना ‘भारतीयत्व घडविण्याची प्रक्रिया’ जणू विखंडित झाली आहे. नेमक्या अशा वेळी ‘करायचे तरी काय?’ याची चिंता गडद होत असताना आपण कला, साहित्य आणि संस्कृती यांच्या परिशीलनाकडे वळायला हवे. कारण त्यांच्यामध्ये ‘भारतीयत्वाकडे घेऊन जाण्याचे’ खरेखुरे सामर्थ्य आहे, याची जाणीव जागृत करण्यासाठी ‘आंतरभारती’चा हा प्रयोग आहे.

‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ आणि ‘संभाव्य राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ या सात शब्दांनी देशभरातील चर्चा विश्व अक्षरशः ढवळून निघाले आहे. पोलीस विद्यापीठांच्या थेट आत घुसताहेत आणि विद्यार्थी आक्रोशाने रस्त्यावर उतरताहेत…
नागरिकत्वाची नोंदणी केली; म्हणजे देशातील लोकांची नेमकी आकडेवारी कळेल; परिणामी योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करणे सरकारला सोपे जाईल, हा सरकारी युक्तिवाद तर ‘आम्ही वर्षानुवर्षे इथेच राहतोय, मग नागरिकत्व नोंदणीच्या नावाने ‘आमच्या’ अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह का?’ असे देशभरातील लक्षावधी लोकांचे म्हणणे आहे. यावरून ‘ते’ आणि ‘आपण’ अशी विभागणी घडून आली आहे.

थोडक्यात काय तर ‘भारतीय कोण?’ आणि ‘ते ठरवायचे कशावरून?’ हे या सगळ्या चर्चेचे मध्यवर्ती केंद्र आहे.
‘कागदाशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होणारी नसते, ज्याच्याकडे शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड आहे, तो भारतीय’ हे सरकारी व्यवस्थेकडून दिले जाणारे ‘तर्कशुद्ध स्पष्टीकरण’ आहे तर ‘जो वर्षानुवर्षे या भूमीत राहतोय, मग त्याच्याकडे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा कागद असो वा नसो- पण तो भारतीयच!’ असा त्या सरकारी तर्काचा केला जाणारा ‘भावशुद्ध प्रतिवाद’ आहे.

- Advertisement -

पण या दोन्ही बाजू समान अंतरावर ठेवून ‘भारतीयत्वाची’ कसोटी पडताळून पाहायची ठरवली तर….
म्हणजे ‘कुणीतरी वर्षानुवर्षे केवळ या भूमीवर राहत आले आहे, म्हणून त्यांना भारतीय मानायचे का?’ किंवा ‘एखाद्याकडे आपले इथले अस्तित्व सिद्ध करणारे भरमसाठ पुरावे आहेत, म्हणूनही त्याला भारतीय म्हणता येईल का?’
थोडेसे वेगळ्या शब्दात हे म्हणणे मांडायचे झाल्यास ‘भारतीयत्व ही केवळ जन्माने प्राप्त होणारी गोष्ट आहे का?’ तसेच ‘ती केवळ कागदाने सिद्ध करता येणारी गोष्ट असेल का?’ की यापलीकडे जाऊन ‘जन्माच्या पार जाणारी आणि कागदावरही न उमटू शकणारी एखादी दीर्घकालीन प्रक्रिया आहे?’

जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला माणूस बनण्याची /बनविण्याची जशी एक प्रक्रिया असते, तशीच या भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला ‘भारतीय’ बनण्याची/बनविण्याचीही काहीएक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून घडून येणारे प्रत्यंतर म्हणजे ‘भारतीयत्व’ असे आमचे म्हणणे आहे.

- Advertisement -

जन्माला येणार्‍या व्यक्तीला निसर्गाकडून आणि अनुवंशाकडून काही गोष्टी आपोआप मिळतात, परंतु कित्येक गोष्टी त्याला स्वतःला ‘अर्जित’ कराव्या लागतात. चालणे, पळणे, झोपणे, जेवणे या साध्या वाटणार्‍या शारीरिक क्रिया शिकाव्या लागतात तशी भाषाही शिकावी लागते, रूढी समजून घ्याव्या लागतात, परंपरांचा अन्वयार्थ अनुसरावा लागतो, जातीची मर्यादा आणि धर्माची व्याप्तीही लक्षात घ्यावी लागते… जे जे आपल्या भूमीशी निगडित आहे, त्याला दिलेल्या साद-प्रतिसादांवरुन त्याची भूमिका आकारला येत असते.

मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्हींच्या आधारे ही प्रक्रिया आपण समजून घ्यायला लागलो तर आपल्या लक्षात येते की, कोणत्याही व्यक्तीला पहिली ओळख मिळते ती आपल्या कुटुंबाची, जातीची, मग गावाची, भाषेची, पंथाची, धर्माची….. आणि या सगळ्यांनंतर राष्ट्राची! खूपदा तर देशाच्या बाहेर गेल्यावर आपण ‘भारतीय’ आहोत, हे खूप जणांच्या पहिल्यांदा लक्षात येते; याचा अर्थ ‘भारतीयत्व’ ही परिघाच्या पल्याडची गोष्ट ठरते.

एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती असे एकजिनसीकरण देशात आहे, तिथे आपल्या राष्ट्रीयत्वाचा परिचय ही इतकी अवघड गोष्ट नसावी; मात्र भारतासारख्या भाषा, धर्म, पंथ, संस्कृती अशा कितीतरी बाबतीत कमालीची विविधता असणार्‍या देशात ‘भारतीय’ बनण्याची प्रक्रिया ही सहज सोपी नाही.

खरेतर औपचारिक शिक्षणातून ही प्रक्रिया संथ गतीने का असेना, पण सुरू असते. दररोज शाळेत होणारे राष्ट्रगीत, ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा अशा गोष्टींतून या प्रक्रियेचे अनुसरण सुरू असते. याशिवाय कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरही व्यक्तीचे ‘भारतीयीकरण’ करण्याचे प्रयत्न सतत सुरूच असतात. पण दिवसेंदिवस औपचारिक शिक्षणातून केले जाणारे प्रयत्न अपुरे ठरू लागले आहेत. त्यातही आता कुटूंब आणि समाजाच्या पातळीवर जे औपचारिक शिक्षण मिळते, त्यातून तर जातीय, पंथीय, धार्मिक अस्मिता तीव्र करण्याची स्पर्धा सुरू आहे.

आपण कोणत्या जातीचे, त्यातही पोटजातीचे, पंथाचे, धर्माचे आणि प्रदेशाचे आहोत हे अधिकाधिक ठळक करत जाणे याची तीव्रता वाढत असताना ‘भारतीयत्व घडविण्याची प्रक्रिया’ जणू विखंडित झाली आहे. एका अर्थाने ‘सारेच दीप मंदावले आता; ज्योती विझू विझू झाल्या’, अशी हताशतेची परिस्थिती वाढत चालली आहे.

नेमक्या अशा वेळी ‘करायचे तरी काय?’ याची चिंता गडद होत असताना आपण कला, साहित्य आणि संस्कृती यांच्या परिशीलनाकडे वळायला हवे कारण त्यांच्यामध्ये ‘भारतीयत्वाकडे घेऊन जाण्याचे’ खरेखुरे सामर्थ्य आहे, याची जाणीव जागृत करण्यासाठी ‘आंतरभारती’चा हा प्रयोग आहे.

लहानशा वर्तुळाच्या सीमेतून बाहेर पडून स्वतःला मोठ्या वर्तुळाशी संलग्न करत नेणे हा भारतीयत्वाकडे जाण्याचा रोडमॅप आहे. जरासे इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्या हे लक्षात येऊ लागते की ज्यांना ज्यांना हे वर्तुळाचे विसर्जन करता आले त्यांना ‘भारतीय’ बनता आलेले आहे. मध्ययुगीन कालखंडातील संत मंडळी आणि आधुनिक काळातील महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, साने गुरुजी ही यामधली काही ठळक नावे आहेत.

ज्ञानेश्वर म्हणजे ब्राह्मण, कबीर म्हणजे हिंदू, तुकाराम म्हणजे कुणबी, गांधी म्हणजे गुजराथी, नेहरू म्हणजे काश्मिरी पंडित, विनोबा म्हणजे मराठी आणि साने गुरुजी म्हणजे कोकणी… या सगळ्यांची अशी ओळख चुकून तरी कधी आपल्या ध्यानी येते का? खरेतर या सगळ्यांची वर नोंदवलेली ही (मर्यादित अर्थाने का असेना) ओळख खरी आहे; मात्र अशा बिंदूवजा ओळखीला त्यांनी भारतीयत्वाच्या सिंधूमध्ये विसर्जित केले आहे.

हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी गांधी आणि विनोबा यांच्या संदर्भातले एक एक उदाहरण घेता येईल. गांधींना आपण ‘भारतीय’ मानतो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भारतीयत्वाचे कोणते ठळक विशेष दिसतात?

गांधी एकीकडे आधुनिक भारताचे सर्वोच्च नेते होते, पण त्याच वेळी मध्ययुगीन विचारधारेकडेही त्यांचा कमालीचा ओढा होता, एकीकडे ते सगळ्या धर्मांप्रती सारखाच आदर ठेवणारे होते, पण त्याचवेळी स्वतःला आग्रहाने ‘हिंदू’ मानत होते, गुजराती भाषेवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी एकीकडे ते गुजरातीमधून सतत लिहीत होते तर दुसरीकडे ‘हिंदी पढो, आगे बढो, भारत जोडो’ चा नाराही देत होते.

भले अनेकांनी गांधींमधील असे दोन टोकांमध्ये वावरणार्‍या या वृत्तीला ‘गांधी गोंधळ’ म्हणून हिणवले असेल, पण गांधीजींच्या व्यक्तीमत्वामधील वेगळेपणाची नोंद घेताना नरहर कुरुंदकर यांनी जे म्हटले आहे, ते समकालीन परिस्थितीतही तितकेच महत्त्वाचे आहे. कुरुंदकर म्हणतात, ‘गांधीजींमध्ये जे अंतर्विरोध आहेत ते भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहेत; वरवर पाहता परस्परविरोधी वाटणार्‍या गोष्टींतले साम्य समजून घेण्याची सवय जोपर्यंत आपल्याला लागणार नाही, तोपर्यंत ना गांधी आपणाला कळतील, ना भारत आपणाला कळेल.’
दुसरे उदाहरण विनोबा भावे यांचे आहे.

मराठी भाषेवर असणार्‍या कमालीच्या प्रेमापोटी त्यांनी संस्कृतमधील तत्त्वज्ञान एकीकडे मराठीत भाषांतरित केले, परंतु त्याच वेळी स्वतःला मराठीपणाच्या वर्तुळात सीमित करून घेतले नाही. 1924 मध्ये ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचे साप्ताहिक सुरु करताना विनोबांनी आपल्या मराठीपणाचा अर्थ स्पष्ट केला होता. ते म्हणाले होते, ‘महाराष्ट्रधर्म हा प्रथम दर्शनी वामनासारखा दिसला तरी वस्तुतः तो दोन्ही पावलांत विश्व व्यापून टाकणार्‍या त्रिविक्रमासारखा आहे, हे दिसून येईल. या त्रिविक्रमाचे पहिले पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय आहे.’

संघर्षाकडून संवादाकडे, प्रतिकाराकडून प्रतिसादाकडे, ‘स्व’कडून समुहाकडे, भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे, आसक्तीकडून विरक्तीकडे… हे जसे संतत्वाचे विशेष आहेत, भारतीयत्वाचेही विशेष आहेत. म्हणून तर आपणाला हे गुणविशेष जसे मध्ययुगीन संतांमध्ये पाहायला मिळतात, तसेच गांधी-विनोबा-साने गुरुजी या आधुनिक संतांमध्ये ही पाहायला मिळतात.

सर्वसामान्य माणसांमध्ये अशा ‘संत-तत्वा’चे सर्जन करणे म्हणजे भारतीयत्व घडविण्याची प्रक्रिया आहे, परंतु यातून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ‘भारत’ कळाल्याशिवाय हे ‘भारतीयत्व’ अंगीकारता येणारे नाही.

संतांचे मन मुक्त होते, म्हणून त्यांना भौतिक प्रवास न करताही भारत कळाला. गांधी-विनोबा-साने गुरुजी यांना मात्र भारत कळण्यासाठी लौकिक आणि मानसिक दोन्ही प्रवास करावे लागले, पण आता अवघे जग मोबाईलने मुठीत आणलेले असताना, भारत कळण्यासाठी आपणाला काय करावे लागणार आहे?

‘गुगल’ला गुरु मानून आपण जर भारताचा केवळ स्क्रीनवरील नकाशा सर्च करत राहिलो; तर खरा भारत हाती लागणार नाही. विचारसरणीचे चष्मे डोळ्यांवर चढवून ‘भक्त’ भावाने आपण जर ‘राष्ट्रा’ ला शोधत राहिलो तरी खरा भारत आपणाला सापडणार नाही. ‘राष्ट्र नावाची कल्पनाच मुळात झूठ आहे, राष्ट्रवाद वगैरे काही नसते; असतो तो आंतरराष्ट्रवाद!’ अशा धर्म आणि राष्ट्र या दोन्हींना निकालात काढणार्‍या कोरड्या आणि कोडग्या भूमिकेची री ओढत राहिलो तरीही खरा भारत कळणार नाही.

खरा भारत आपणाला सापडू शकेल, तो कला-साहित्य आणि संस्कृतीच्या अवकाशात!
पण यासाठी आपणाला भाषेची बंधने बाजूला सारावी लागली, प्रदेशाच्या रेषा ओलांडून बाहेर पडावे लागेल, छोट्या-मोठ्या ओळखीचे जोडे बाहेर सोडावे लागतील…

वरवर पाहता हे खूप सोपे वाटेल, पण आहे भलते अवघड! कारण आपली भाषा, कला, साहित्य, संस्कृती तेवढी ग्रेट; बाकीच्या सगळ्या चिरीमिरी. ही भावना भलती बलवत्तर झाली आहे सध्याच्या काळात.

अशावेळी ‘जगाला प्रेम अर्पित’ ‘भारताला बलसागर करण्या’चे साने गुरुजींचे स्वप्न साकार करणारी ‘आंतरभारती’ हा कोणत्याही शहाण्या माणसाचा ध्यास असायला हवा. त्याशिवाय भेदांच्या भिंतीचे बांधकाम जोरात असताना सहिष्णू संवादाचे सेतू बांधता येणार नाहीत!

नीलिमा गुंडी म्हणतात त्याप्रमाणे तेराव्या शतकात ‘हे विश्वची माझे घर’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर, विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला न साहे’ म्हणणारे केशवसुत आणि एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘यापुढचं महाराष्ट्रगीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं अटलांटिक किंवा पॅसिफिकच्या किनार्‍यावरून मुक्त लयीत’ असे म्हणणारे दि.पु.चित्रे यांच्यात एक समान धागा आहे. एका केंद्रबिंदू भोवती अधिकाधिक मोठ्या त्रिजेची वर्तुळे काढता येणे; गाभा जपत विश्वामध्ये विस्तार पावणे हे मराठीपणाचे खरे सत्व आहे.’
वेगळ्या शब्दात हे सत्व म्हणजे खरेखुरे भारतीयत्व आहे!

… असे ‘अखिल भारतीय’ होणे ही आपली अनिवार्य गरज आहे.

कुणी असे म्हणेल की ‘वैश्विक आणि अखिल भारतीय होण्याच्या अट्टाहासापोटी आम्ही आमची आयडेंटिटी सोडून द्यायची का? ग्लोबल व्हायच्या नादात ‘लोकल’शी काडीमोड घ्यायचा का? आत्ता आत्ता तर कुठे आमच्या विस्मृतीत हरवलेल्या अस्मितेला धुमारे फुटताहेत; मग अशावेळी त्यांची निगा राखणे सोडून आम्ही एलियनेट व्हायचे का?’

ताणलेल्या बाणागत सणानत येणार्‍या या प्रश्नांचे एकच एक उत्तर देता येणे अवघड आहे; शतकानुशतके दाबून टाकलेला ‘क्रिएटिव फोर्स’ लाव्ह्यासारखा उफाळून वर येत असताना त्याला नाकारण्याची भावना यामागे नाही. परंतु आपण आपल्याच अस्मितांची अरेरावी वाढवत नेली की त्यामधून हळूहळू आपण आवर्तात अडकून पडतो. आणि मग हळूच कुठल्यातरी जात, पंथ, धर्म किंवा पक्षाचे अनौपचारिक प्रवक्ते म्हणून काम करू लागतो. हे टाळायचे असेल तर ‘उघड्या डोळ्याने’ स्व आणि समष्टीकडे पाहायला शिकले पाहिजे.

यासाठी वसंत गोवारीकर यांनी एक दाखला दिला आहे, ते म्हणतात, ‘अलीकडच्या काळात मराठी माणूस अखिल भारतीय होण्याची आकांक्षा बाळगू लागला आहे, यात तो बर्‍यापैकी यशस्वी होऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक इष्ट बदल घडवून आणले आहेत. तामिळ, मारवाडी, गुजराती आणि मल्याळी माणसांतले चांगले गुण प्रयत्नपूर्वक अंगीकारले आहेत. आणि ते आज ‘तामागुम’ झाले आहेत. राडा करून घामाघूम न होता, स्वेच्छेने, शांतपणाने त्यांनी स्वतःला ‘तामागुम’ करून घेतले आहे… असे भारतीय भाषा प्रदेशातले किती गुण आपण स्वतःमध्ये अंगीकारायला तयार आणि तत्पर आहोत, यावरच आपल्या मराठीपणाचे व भारतीयत्वाचे भवितव्य अवलंबून आहे! ’

-डॉ. विश्वाधार देशमुख,नांदेड.
-(लेखक यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे भाषा साहित्य व संस्कृतिअभ्यास विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -