घरफिचर्सशाश्वत परिवर्तनाचे वाटसरु

शाश्वत परिवर्तनाचे वाटसरु

Subscribe

कालपर्यंत आम्ही बोलत नव्हतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही, रस्त्यावर आल्याशिवाय तुम्ही आमची दखल घेणारच नसाल तर आलो आहोत आम्ही रस्त्यावर. आपल्यालाही न्यायाच्या या लढाईत दलित, शोषित, स्त्रियांच्या बाजूने उभेच रहावे लागणार आहे. कारण आपण आज उठलो नाही तर आपणही मारले जाणार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. जोपर्यंत समाजात कोणीही जन्माने, जातीने, धर्माने दलित, उपेक्षित, वंचित राहणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवावी लागेल. त्यासाठी शाश्वत परिवर्तनाची गरज आहे.

सध्या देशात सगळीकडे प्रचंड हलचल सुरू आहे. काही लोक रस्त्यावर आले आहेत तर काहींना रस्त्यावर आणले गेले आहे. जे स्वतःहून आले आहेत आणि ज्यांना आणले गेले आहे दोघांचा एकच आक्रोश आहे की हा देश आमचा आहे. सर्व म्हणताहेत की, ‘भारत माझा देश आहे’ मग भांडण कुठे आहे? भांडण आहे ‘जो देश माझा आहे असे म्हटले जाते आहे त्या देशात राज्य कोण करणार? कसे करणार? कोणाला मारुन करणार? कोणाला बाहेर काढून करणार? आपण आज या विषयावर बोलणार आहोत. आपला देश विविधतेने नटलेला आहे हे आधी आपण हा विषय समजवून घेताना लक्षात घेतले पाहिजे. अनेक वर्षांच्या, अनेकांच्या मेहनतीतून, कल्पनेतून, विचारातून या देशाची जडण घडण झाली आहे हे जर मान्य नसेल तर चर्चा होणेच अवघड आहे.

ही चर्चा समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या. कुठलाही देश समजून घ्यायचा असेल तर त्याचे सर्वात छोटे युनिट म्हणजे कुटुंब असते. ते कुटुंब कसे आहे? कसे चालते? कोणाची, कोणावर हुकुमत असते की, खर्‍या अर्थाने सर्वाना निर्णय प्रक्रियेत घेतले जाते हे समजावून घेतले की, तो देश समजावून घेणे थोडे सोपे जाण्याची शक्यता असते असे मला वाटते. आपल्या कुटुंबात आपण सध्या तरी लग्न नावाच्या गोष्टीने एकत्र येतो. जे दोघे शरीराने एकत्र येतात त्यांच्या दोघांच्या संमतीने नवीन जीव जन्माला घातला जातो. आता यात मला माहीत आहे बरं का की, आपल्याकडचे बरेच नवीन जीव हे योगायोगाने जन्माला येतात. त्यात ना त्या बाई नावाच्या व्यक्तीची संमती असते ना त्या नवीन जीवासाठी काही स्वतंत्र विचार असतो किंवा काही नियोजन असतं.

- Advertisement -

पण वास्तवात तो/ती नवीन जीव जन्माला येतो/येते हे मात्र खरं. आपण लग्नाच्या वेळी विचार करीत नाही, पहिले स्थळ आले की लग्न जुळवतो, ती दोघे एकमेकांना सूट होतील की नाही याचा काहीही विचार नसतो, पण लग्न होते. आपणही अशा सर्व लग्नांमध्ये नटून थटून जातो, अक्षता फेकतो आणि परत येतो. म्हणून तर आपल्याकडे म्हण आहे की, ‘नवरा नवरी येते एकमेकांसाठी आणि वर्‍हाड येते जेवणासाठी’. आपण कधीच चौकशी करीत नाही की, मुलामुलीचे वय कायद्याने पूर्ण आहे का? पुढे आनंदाने जगण्यासाठी दोघांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक क्षमता आहे का? आपण म्हणतो आपल्याला काय करायचे आहे, ते दोघे पाहून घेतील. आपल्या या निष्काळजीपणामुळे पुढचे सर्व अपघात होत जातात.

आपल्या देशात एकूण हिंसाचारात सर्वात जास्त भर कौटुंबिक हिंसाचारामुळे घातली जाते. जे कुटुंब सर्व गोष्टींचा आधार आहे ते निर्माण होण्यासाठी जेवढा वेळ आपण खर्ची घातला पाहिजे तो घातलाच जात नाही. पाण्यात पडले की, पोहायला शिकतील या अडाणी शास्त्रावर आपली कुटुंब व्यवस्था उभी आहे. म्हणून ती उभीपेक्षा अधिक तुटलेली, जखमी जास्त आहे. अशी अनेक दुखावलेली जोडपी दुरुस्तीसाठी, एकमेकांच्या तक्रारीसाठी, आधी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी विविध प्रकारच्या मदती घेत राहतात. कधी ते आपल्याच कुटुंबातील वडीलधार्‍यांची मदत घेतात तर कधी आपल्याच जात समूहातील वरिष्ठ पंचाची मदत घेतात. तर हे पंच न्यायनिवडा करण्याच्या नावाखाली त्या कुटुंबातल्या बाईला सांगतात की, घर वाचवायचे असेल तर तू ऐकून घे.

- Advertisement -

कारण नसताना हिंसाचार सहन कराव्या लागणार्‍या महिलेलाच माघार घ्यायला सांगतात. काय होते एखादा फटका मारला तर? अनेक वर्षे हा असाच न्यायनिवडा सुरु आहे बरं का! आता काय झाले आहे की, परिवर्तनाच्या अनेक वर्षांच्या चळवळी नंतर मार खाणार्‍या या स्त्रिया सजग झाल्या आहेत. त्या आता एक साधा प्रश्न विचारत आहेत की, लग्न ही दोघांची गरज आहे ना? मग प्रत्येक वेळेस मीच माघार का घ्यायची? प्रश्न बोलून सुटू शकतात, मग मारहाण का तर आम्ही तुमच्या घरात राहतो म्हणून? बर जे घर स्त्रियांच्या कष्टाने उभं राहिलं, तिच्या शिक्षणाने सावरलं गेलं, तिने केलेल्या बालसंगोपणामुळे विस्तारलं गेलं, पण जेव्हा जेव्हा त्या घराची मालकी जाहीर करायची वेळ आली तेव्हा तेव्हा ते घर ‘पुरुषाच्या’ नावावर लिहिले गेले हे ते भांडण आहे.

घर उभं राहण्याचे सर्व क्रेडिट मी ‘ति’लाच देते, कारण तिची इच्छा असो अगर नसो आज तरी बहुसंख्य स्त्रियांना वरील सर्व कामाची जबाबदारी घ्यावी लागते. आपण घरीदारी भामटे आहोत बरं का! विचारा कसे? जसे आपल्याला धर्माच्या पावित्र्यासाठी लागणारी बांगडी मुस्लीमांकडून चालते, पुरुषांच्या कमरेला असलेला कोरगटा बहुतेक ठिकाणी मुस्लीमच विकतात तो चालतो, बिर्याणी खायची तर मुस्लीमांच्याच घरी, शिरखुर्मा खाण्यासाठी ईदची सुट्टी असायलाच पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण हा देश कोणाचा असं विचारलं की, आम्ही म्हणतो, ‘हिंदूंचा’. कसा तर आमचे संख्याबळ जास्त आहे म्हणून. बरं ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही, आपापल्या ‘शाखेत’च जे दक्ष राहण्यात रमले ते जेव्हा हा देश त्यांचा आहे असे म्हणतात तेव्हा खरा राग येतो. स्वतःची आणि बायकोचीही कमाई दारु, गांजा, जुगारीत उडवणारा पुरुष त्याला स्वतःची शुध्द नसते तर बायको पोरांची कुठून? अशा परिस्थितीत येईल त्या संकटाला तोंड देवून बाई स्वतःला, पोराबाळांना सांभाळते, त्यांना शिकवते आणि हा मात्र जेव्हा जेव्हा याच्या मनात येईल तेव्हा तिचे केस धरुन रस्त्यात मारतो तेव्हा मात्र ती त्याचा हात धरायला शिकते आणि या विषमतावादी, पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारते की, माझ्यावर हक्क सांगणारा तू कोण? तू कोण माझ्या या घराचे नागरिकत्व प्रमाणपत्र देणारा? या घरात मी कसे रहावे? काय खावे? हे ठरवणारा तू कोण?

स्त्रीवादी चळवळीत ‘बळाचा सिद्धांत’ सांगणार्‍यांना एक उत्तर दिले जाते ते आज मी तुम्हांला सांगणार आहे. स्त्री पुरुष विषमता मानणारे कायम एक प्रश्न उपस्थित करतात की, स्त्रिया का दुय्यम. कारण त्या शारीरिकदृष्ठ्या कमकुवत आहेत. मग, बळ हेच सक्षमतेचे प्रतीक मानायचे असेल तर हत्तीला, सिंहाला सर्वांचा प्रमुख मानला पाहिजे. पण मानवाने निसर्गातील सर्व ताकदवर प्राण्यांना आपल्या नियंत्रणात आणले तेव्हा शारीरिक कष्टापेक्षा बौद्धिक कुवत महत्वाची आहे असे मानले. या तत्वज्ञानावर सर्व जीवसृष्टी रचली असे आपण म्हणतो, पण जेव्हा स्त्री पुरुष यातल्या हक्कांचे वाटप होते, न्याय केला जातो तेव्हा परत बळाचा सिद्धांत कसा काय पुढे केला जातो? हा आजच्या शिकलेल्या, स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करणार्‍या, कार्यकारण भाव समजणार्‍या स्त्रियांचा प्रश्न आहे. यावर आपण सर्वच बुद्धीचा वापर करणारे नागरिक म्हणून विचार केला पाहिजे.

आपल्या आजच्या या चर्चेत शेवट करताना मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत. परिवर्तनाच्या चळवळीचा फायदा सर्वांना होतो बरं का! बाळंतपणाची पगारी रजा मिळावी यासाठी स्त्रीवादी चळवळीने खूप मेहनत घेतली त्यामागचे लॉजिक होते की, बाळंत होणारी स्त्री तिच्या लैंगिक सुखासाठी तो नवीन जीव जन्माला घालत नसून समाजाचे मानवी चक्र चालत रहावे यासाठी ती तिची जबाबदारी पूर्ण करते आहे म्हणून समाज तिला ही ‘आरामाची’ सवलत देत असतो. आता यात ज्या स्त्रिया सनातनी आहेत, जुन्या रूढी परंपराच मानतात त्यांनाही लाभ होतोच. जसे जेएनयु किंवा कुठल्याही विद्यापीठाचे विध्यार्थी फीवाढी विरोधात आंदोलन करतात त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो, म्हणून ही परिवर्तनवादी चळवळ समजावून घ्यायची असते, त्यात सहभागी व्हायचे असते. काल जामिया मिलीयाच्या एका हिंदू विध्यार्थ्याची मुलाखत बघत होते. तो म्हणत होता, प्रश्न मी हिंदू आहे की, मुस्लीम आहे याचा नाही, तर एक व्यवस्था प्रश्न विचारणार्‍या समूहाला प्रश्न विचारला म्हणून घरात घुसून मारते हा मानवतेचा अपमान आहे, संविधानाने दिलेल्या अधिकारांचे हनन आहे म्हणून मी यात सहभागी झालो आहे.

वाढलेल्या फीमुळे माझ्यासारख्या जात, धर्म आणि आर्थिक स्तराचे ‘प्रिव्हिलेज’ नसलेल्या अनेकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल याची मला जाण आहे, म्हणून मी यात सहभागी आहे. रवीशकुमारने शाहीनबागमधील आंदोलनकारी स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्या स्त्रिया म्हणत होत्या की, आम्ही घरात आहोत याचा शासनाने आणि व्यवस्थेने गैरअर्थ काढला आहे. कालपर्यंत आम्ही बोलत नव्हतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही, रस्त्यावर आल्याशिवाय तुम्ही आमची दखल घेणारच नसाल तर आलो आहोत आम्ही रस्त्यावर. आपल्यालाही न्यायाच्या या लढाईत दलित, शोषित, स्त्रियांच्या बाजूने उभेच रहावे लागणार आहे. कारण आपण आज उठलो नाही तर आपणही मारले जाणार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. जोपर्यंत समाजात कोणीही जन्माने, जातीने, धर्माने दलित, उपेक्षित, वंचित राहणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवावी लागेल. त्यासाठी शाश्वत परिवर्तनाची गरज आहे.

परिवर्तन म्हणजे आज याची सत्ता आहे तर उद्या त्याची सत्ता येईल असे असू नये. कारण खांदे पालटाच्या या गडबड घोटाळ्यात कायम चुकीच्या व्यक्ती सत्तेत येतात. म्हणून परिवर्तन शाश्वत असावे. त्यासाठी व्यक्तीच्या विरोधात असण्यापेक्षा मानसिकतेच्या विरोधात असायला हवे. त्याची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी, कारण आपण सुरुवातीलाच मान्य केले आहे की, कुटुंब हे देशाचे छोटे युनिट आहे. कुटुंबात बदल झाला की, आपोआप देशातही बदल होतो. पहिल्यांदा आपल्या घरात लोकशाही आहे का ते पहा. घरातले निर्णय नेमके कोण घेते? कुटुंब प्रमुखाच्या नावावर घरातला वयाने मोठा पुरुष की, घरातली प्रत्येक व्यक्ती त्या निर्णयात सहभागी होईल यासाठी जाणीवपूर्वक आपल्या घरातले वातावरण बदलावे लागेल.

आई, तुझ्या हाताला खूप चव आहे ग, तुझे प्रेम त्या भाजीत उतरते असे म्हणत आपण आयुष्यभर आयतं तर खात नाही आहोत ना? मग स्वयंपाक आपल्याला येत नसेल तर आपण धुणीभांडी करुयात. खूप घरांमधून तुला जितके छान, नीटनेटके आवरता येते तसे मला येत नाही असे म्हणत घरातली बाई आवरतच राहते आणि बाकी सर्व पसारा करणार्‍यांच्या गटात सहभागी होत तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाही जेव्हा घरात अंमलात येईल तेव्हा खर्‍या अर्थाने ती देशातही अंमलात येईल. मेधाताई पाटकर कार्यकर्त्यांना नेहमी एक गोष्ट सांगायच्या ती सांगते आणि थांबते. त्या म्हणतात एकत्र कुटुंबात नेहमी कामाची वाटणी कशी होते तर, कुटुंबातला प्रमुख पुरुष सांगतो की, चला आपण कामे वाटून घेऊ या, आम्ही आमच्या दाढी मिशा करून घेतो तोपर्यंत तुम्ही बायकांनी स्वयंपाक, धुणीभांडी पटकन आवरुन घ्या. समजली की नाही गंमत! असे आमचे कष्ट घ्यायचे आणि मालकीची वाटणी मात्र रक्ताच्या नात्यानुसार करायची, असा अन्याय करणार्‍यांच्या गटात तर आपण नाही ना, मग तुम्ही शाश्वत परिवर्तनाचे वाटसरू आहात, तुमचे मनापासून स्वागत…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -