घरफिचर्समरणारी मुंबई आणि स्पिरीटवाला मुंबईकर!

मरणारी मुंबई आणि स्पिरीटवाला मुंबईकर!

Subscribe

आधीच कमी क्षमतेच्या असलेल्या ड्रेनेज सिस्टीममध्ये मुंबईकरांनी हट्टाने आणि अपराधाने टाकलेलं प्लास्टिक जाऊन अडकलं, तर मुंबईची तुंबई होण्यापासून ब्रह्मदेव देखील रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. पण यातून आपण काहीही बोध घेतलेला दिसत नाही. फक्त राजकारण्यांवर, प्रसासनावर आणि भ्रष्टाचारी लोकांवर खापर फोडलं, की आपली जबाबदारी संपली, अशा आविर्भावात जर आपण राहाणार असू, तर मात्र आपल्या भविष्याचा आणि आपल्या पुढच्या पिढीचा गळा आपणच घोटणार आहोत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ठरावी.

मुंबईचं स्पिरीट… मुंबईकरांच्या नाईलाजासाठी कधीही उचलून तोंडावर मारण्यासाठीचं वरून सजवलेलं, पॉलिश केलेलं, चकाचक दिसणारं पण आतून जळजळीत असणारं वास्तव! ’काय तुफान पाऊस झाला काल..आख्खी मुंबई तुंबली होती…ट्रेन बंद, रस्ते बंद, गाड्या बंद, मुंबई बंद. पण दुसर्‍या दिवशी अगदी काही झालंच नाही अशा वेगाने आणि उत्साहाने मुंबई पुन्हा उभी राहिली..चालायला लागली.. यालाच तर मुंबईचं स्पिरीट म्हणतात!’ मुंबई आणि मुंबईकरांच्या बाबतीत तुम्हाला हमखास ऐकायला मिळणारे हे संवाद! हे संवाद ऐकले की कोणत्याही मुंबईकराच्या अंगावर मूठभर मांस आपोआप चढंत. छाती अभिमानानं फुगून जाते..आणि मुंबईकर पुन्हा हे नैसर्गिक वाटणारे पण मानवनिर्मित असणारे रट्टे खाण्यासाठी ‘नव्या जोमाने’ तयार होतो. या संवादामधल्या पावसाच्या जागी काहीही टाका. दहशतवादी हल्ला, गोळीबार, बॉम्बस्फोट, भूकंप किंवा अगदी गेला बाजार तासन् तास अडकलेलं ट्राफिक घ्या. काहीही झालं तरी मुंबई आणि मुंबईकरांमधलं स्पिरीट मरत नाही. पण हे फक्त वरवर दिसणारं चित्र आहे. मुंबई हळूहळू मरतेय!

शहरात काहीही झालं, कोणतीही दुर्घटना झाली किंवा नैसर्गिक आपत्ती आली, तरी तिला घाबरून, कंटाळून किंवा लपून घरात बसण्याची चैन मुंबईकरांना परवडणारीच नाही. हे त्यामागचं सत्य आहे. कदाचित हा लेख वाचणारा प्रत्येक मुंबईकर हे मान्य करेल. त्यामुळे मुंबईकरांच्या नाईलाजाला स्पिरीटचं नाव देऊन केली जाणारी मस्करी थांबवून घडणार्‍या प्रत्येक घटने अथवा दुर्घटनेची कारणमीमांसा होऊन त्यावर उपाय योजनं गरजेचं आहे. परवा मुंबईत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एका दिवसात ३०० मिमी पाऊस पडला आणि मुंबई तुंबली. सालाबादप्रमाणे. दिवसभर मुंबईकरांनी तोच त्रास सहन केला. लोकल बंद पडल्या, रस्ते जाम झाले आणि मुंबईकर आहे तिथेच अडकला. पण दुसर्‍या दिवशी सारं काही सुरळीत होऊन तो पुन्हा कामावर जाऊ लागला. तेच फेमस स्पिरीट घेऊन! पण त्यामागे पुन्हा एकदा अधोरेखित झालेला प्रश्न कधी झाकला गेला, ते त्यालाही कळलं नाही.

- Advertisement -

गेल्या शेकडो वर्षांपासून मुंबईत पाऊस पडतोय. अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिका तिची ‘देखभाल’ करतेय. आणि तरी कित्येक वर्षांपासून दरवर्षी मुंबई तुंबते. इतकी तज्ज्ञ मंडळी, कणव असणारे राजकारणी आणि ‘कार्यतत्पर’ असणारे प्रशासन असूनदेखील या प्रश्नावर अजूनही तोडगा का काढू शकले नाहीत? कारण एक तर या मंडळींनी काढलेले तोडगे अपुरे होते किंवा आहेत आणि दुसरं म्हणजे खुद्द मुंबईकर सुधारण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे त्याची खोड त्यालाच भारी पडतेय असं म्हणा हवं तर!

मुंबईत पाणी साठण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईतलं साठणारं पाणी बाहेर वाहून नेणारी ड्रेनेज सिस्टीम. सध्या मुंबईत असलेली ड्रेनेज सिस्टीम जवळपास १५८ वर्ष जुनी म्हणजे ब्रिटिशांच्या काळातली आहे. सध्या तिची क्षमता २५ मीमी प्रतितास पडणार्‍या पावसाचं पाणी किंवा गाळ वाहून नेण्याची आहे. त्या तुलनेत आता मुंबईची लोकसंख्या किमान १० पट तरी वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत एकूण ७ नवी पम्पिंग स्टेशन तयार करण्याचा प्रकल्प सुरु झाला. त्यातली महापालिकेने आत्तापर्यंत हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड बंदर (वरळी), ब्रिटानिया (रे रोड, भायखळा/माझगाव), इर्ला (अंधेरी) आणि नुकतंच लोकार्पण झालेला सांताक्रूज वेस्टमधलं गजधरबंध हे ६ पम्पिंग स्टेशन सध्या कार्यरत आहेत. सातव्या पम्पिंग स्टेशनच्या कामाला अजूनही सुरूवात झालेली नाही. असं असलं, तरी या सगळ्यातून मुंबईच्या ड्रेनेज सिस्टीमची क्षमता ५० मीमीपर्यंतच वाढू शकेल. पण गेल्या काही वर्षांची आकडेवारी आणि मुंबईत तुंबणारं पाणी पाहाता ती किमान ७५ ते १०० मीमी असणं आवश्यक वाटू लागलं आहे. नालेसफाईच्या कामांमध्ये होणारी अक्षम्य दिरंगाई, नाल्यांच्या रुंदीकरणावर अजूनही पुरेशा प्रमाणात न झालेलं काम आणि पम्पिंग स्टेशनचं इतक्या वर्षांनंतर देखील पूर्ण न झालेलं काम, यामुळे आहे ती क्षमता देखील आपल्याला पूर्ण वापरता येत नाही हे देखील वास्तव आहे.

- Advertisement -

आता येऊयात मुंबईकरांकडे. आधीच आवश्यक क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची ड्रेनेज सिस्टीम आपल्याकडे आहे. पण जरी ती पूर्ण क्षमतेची असती, तरी ती तुंबली असती. आणि याला कारणीभूत आहे मुंबईकरांची सवय! कचर्‍याची वर्गवारी, ओला-सुका कचरा, प्लास्टिक बंदी अशा अनेक उपाययोजना शासनाने राबवल्या. आपण मात्र त्या गोष्टी पाळण्यात अजूनही कुचराई करतानाच दिसत आहे. अजूनही बाजारात प्लास्टिकच्या पिशव्यांची मागणी केली जाते. ‘आम्ही काय करणार? पिशवी नाही दिली तर गिर्‍हाईक आम्हालाच बोलत दुसर्‍या दुकानावर निघून जातं’, अशी उत्तर मुंबईतल्या फेरीवाल्यांकडून किंवा दुकानदारांकडून हमखास ऐकायला मिळतात. अर्थात, स्वभावातली ही राष्ट्रीय पातळीवरची समस्या असली, तरी इतर ठिकाणी पाणी तुंबत नाही, मुंबईत तुंबतं म्हणून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणं आपल्याला क्रमप्राप्तच नाही तर जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे हे आपण ओळखायला हवं. पालिकेकडून मुंबईतून दररोज उचलला जाणारा कचरा सुमारे ७ हजार २०० मेट्रिक टन आहे. पण अजूनही सुमारे २ हजार मेट्रिक टन कचरा तसाच शहरांमध्ये आणि पर्यायाने शहरातल्या ड्रेनेड सिस्टीममधून वाहत असल्याचा अंदाज आहे. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरानंतर गटारं तुंबवणारं प्लास्टिक किती मोठा संहार करू शकतं, याची कल्पना प्रत्येक आपल्याला आलेली आहे. पण त्या महापुरात हजार मुंबईकरांचा जीव जाऊन देखील अद्याप आपल्याला शहाणपण आलं नसल्याचंच या अनुभवांतून समोर येत आहे. अजूनही मुंबईच्या किनारपट्ट्यांवर शेकडो मेट्रिक टन प्लास्टिक गोळा होतच आहे आणि आफरोज शाहसारखे सामाजिक कार्यकर्ते हे प्लास्टिक गोळा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

आता आधीच कमी क्षमतेच्या असलेल्या ड्रेनेज सिस्टीममध्ये मुंबईकरांनी हट्टाने आणि अपराधाने टाकलेलं प्लास्टिक जाऊन अडकलं, तर मुंबईची तुंबई होण्यापासून ब्रह्मदेव देखील रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. पण यातून आपण काहीही बोध घेतलेला दिसत नाही. फक्त राजकारण्यांवर, प्रसासनावर आणि भ्रष्टाचारी लोकांवर खापर फोडलं, की आपली जबाबदारी संपली, अशा आविर्भावात जर आपण राहाणार असू, तर मात्र आपल्या भविष्याचा आणि आपल्या पुढच्या पिढीचा गळा आपणच घोटणार आहोत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ठरावी. मुंबई जरी देशाची आर्थिक राजधानी असली आणि इथल्या औद्योगिकरणाला पर्याय जरी नसला, तरी त्यानं मुंबईची तुंबई होण्यात मोठी भूमिका बजावली आहे. औद्योगिकरणानं सर्वात पहिला घाला शहरातल्या झाडांवर घातला. शुद्ध हवेसाठी जसा झाडांचा उपयोग होतो, तसाच जमिनीवर वाहणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी देखील त्यांची भूमिका महत्त्वाची असते. पण आरे, नॅशनल पार्क इथली झाडं सोडली, तर मुंबईत म्हणावी तितकी मोठ्या संख्येनं झाडं नाहीत. आहेत तीसुद्धा प्रचंड विखुरली आहे. त्यामुळे वाहणारं पाणी अडून जिरत नाही. त्यात भर म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे मातीची जमीन शहरामध्ये फारच कमी उरली आहे. पृष्ठभागावरच्या काँक्रीटच्या आवरणामुळे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी काँक्रीटच्या लेअरवरून वाहून जाते. आणि हे सगळं पाणी शहरात आधीच सखोल असलेल्या हिंदमाता, मुलुंड, घाटकोपर, सायन, माटुंगा, गोरेगाव, वांद्रे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साठतं. मोठा पाऊस आला, की सगळ्यात आधी मुंबईचे हे सखल भाग भरतात, आणि त्यांची क्षमता संपली की पाणी शहरात इतर ठिकाणी पसरू आणि साठू लागतं. ब्रिटिश काळात ज्या परेलमध्ये मुंबईतलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणून तेव्हाचे गव्हर्नर वास्तव्यासाठी होते, तिथली परिस्थिती आता भीषण झाली आहे.

आता गल्लीतून थोडा अजून व्यापक विचार करूयात. मुंबई अरबी समुद्रानं वेढलेली आहे. त्यामुळे वादळ किंवा तुफान पर्जन्यवृष्टीच्या काळात शहरातलं पाणी बाहेर जाण्यापेक्षाही समुद्राचंच पाणी शहरात येण्याची स्थिती ओढवते. २६ जुलैला देखील हे दिसून आलं. पण समुद्रात शहरी कचर्‍याचा साठणारा गाळ आणि त्यामुळे वाढलेली समुद्रतळाची उंची हे देखील त्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे आपण जितका कचरा आणि गाळ समुद्रात सोडू, तितकी त्याच्या तळाची उंची वाढणार आहे आणि पावसाचं पाणी शहरात शिरणार आहे. त्यातच, समुद्रात भराव घालून जी काही बांधकामं आज उभी केली जात आहेत, त्या बांधकामांमुळे देखील आत सारलं गेलेलं पाणी पुन्हा मूळ जागी येण्याचा प्रयत्न करणारच. फक्त आपण त्याला ’समुद्राचं पाणी शहरात शिरलं’ असं म्हणतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर समुद्रात भर न घालता आता शहरातल्या बांधकामांचीच उंची खाली अधिकाधिक भराव टाकून वाढवणं क्रमप्राप्त ठरू लागलं आहे.

एकीकडे हे सगळं अगदी मुंबईत, आपल्या परिसरात, आपल्या गल्लीत, एवढंच काय, आपल्या घरात घडत असताना आपल्याला मात्र त्याचं गांभीर्य अजूनही समजलं नाहीये. बाकीच्याच प्रलोभनांमध्ये आपण इतके गुरफटून गेलो आहोत किंबहुना आपल्याला गुरफटून ठेवलं गेलं आहे, की आपल्या दारात येऊन ठेपलेल्या या भीषण जलसंकटाची आपल्याला कल्पनाच येत नाहीये. राजकारणी आणि प्रशासनावर खापर फोडून आपण नामानिराळे झालो आहोत. ही खोड प्रत्येक मुंबईकरानं मोडणं आपल्याला जिवंत राहण्यासाठीच आता गरजेचं झालं आहे. नाहीतर मुंबईकर असेच याच स्पिरीटच्या सुळावर चढत राहतील आणि मुंबई अशीच हळूहळू मरत राहील!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -