घरलाईफस्टाईलअशी घ्या दमा रोगाची काळजी

अशी घ्या दमा रोगाची काळजी

Subscribe

दिवसेंदिवस अस्थमाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१३ पासून ते आतापर्यंत भारतामध्ये अस्थमाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी वाढले आहे. वाढते प्रदूषण हे देशातील दम्याचे रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. दमा आजारातील वाढती रुग्णसंख्या पाहता नुकत्याच आलेल्या अहवालनुसार जगातील २० प्रदूषित शहरांमध्ये सर्वात अधिक म्हणजेच १३ शहरे ही भारतातील आहेत. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता दमा होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण हेच ठरले आहे. हवेतील धुलिकणांमुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बांधकामे, मेट्रोची कामे तसेच इतर कारणांमुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. १० पैकी ७ रुग्णांना दमा नियंत्रणात आणण्यासाठी इन्हलेशन थेरपीचा वापर करावा लागत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. लहान मुलांमध्येही बालदम्यासारख्या आजाराची लागण झाल्याचे दिसून येते.

हिवाळ्यात हवा कोरडी असते. कोरड्या हवेमुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. मुळात दम्याच्या रुग्णांना श्वसनमार्गात सूज आल्यामुळे फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येत असताना कोरड्या हवेमुळे हा त्रास बळावतो आणि दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ (mucus)जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रिया त्रासदायक होते. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो.

- Advertisement -

थंड आणि दमट हवेमुळे दम्याचा त्रास आणखी वाढत असून श्वसनामध्ये अडथळे निर्माण करणारा ठरतो. श्वासनलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुफ्फुसे करतात. मात्र, दमा या आजारात श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते.

हिवाळ्यात होणार्‍या दम्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी 
*दमा हा श्वसनमार्गातील दाह किंवा सूज यामुळे अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी योग्य ती औषधं तसेच तोंडाने ओढणारी औषधे (इनहेलर) किंवा गोळ्यांच्या स्वरूपातील औषधे घ्या. त्याचबरोबर घेत असलेल्या उपचारपद्धतींचा परिणाम वेळोवेळी अभ्यासला पाहिजे.

- Advertisement -

*दम्याच्या अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढल्यास त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा डोस घ्यावा. तसेच औषधांचे काही साईड इफेक्ट्स टाळता येतील यासंबंधी देखील संबंधित डॉक्टरांशी चर्चा करावी.

*भरपूर पाणी प्या आणि बॉडी हायड्रेटेड असली की श्वासनलिकेमध्ये धुलिकण, प्रदूषणामुळे स्रवणारे चिकट पदार्थ सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते.

*घरातील हवा खेळती रहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. तसेच, ओलसर भिंतीमुळेही दमा वाढू शकतो. घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशीट्स, रोजच्या वापराचे कपडे, उशीचे कव्हर दररोज बदला.

*आजारी रुग्णांशी संपर्क टाळा. त्यामुळे लवकर संसर्ग होणार नाही.

*डॉक्टरांशी बोलून फ्लू प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या.

*घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्राण्यांचे केसांमुळे अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

*गरम पदार्थ खा आणि थंड हवेपासून रक्षण करतील अशा कपड्यांचा वापर करा.

*डॉक्टरांच्या सल्ल्याने अचूक औषधोपचार केल्यास आजाराचा होणारा त्रास नक्कीच टाळता येऊ शकतो. वरील गोष्टी पाळल्यास त्यापासून होणार्‍या त्रासाचे प्रमाण नक्कीच कमी करता येऊ शकते. (लेखक फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत)

– डॉ. अरविंद काटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -