आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना : २ वर्षे ३०९ जोडपी अनुदानापासून वंचित

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३०९ जोडपी लाभापासून वंचित राहिली असल्याचे समोर आले आहे.

2 years 309 couples deprived of inter caste marriages subsidy
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३०९ जोडपी लाभापासून वंचित राहिली आहेत. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित जोडप्यांना अनुदान दिले जाते. ऑगस्ट २००४ मध्ये ही योजना सुरू झाली. सुरूवातीच्या काळात १५ हजार रूपये अनुदान म्हणून दिले जात होते. त्यातील निम्मी रक्कम अल्प बचत गुंतवणुकीत जोडप्यांच्या नावे ठेवली जाते. उर्वरित रक्कमेतून नवदाम्पत्याला संसारोपयोगी वस्तू घेऊन दिल्या जातात. मध्यंतरीच्या काळात झालेली महागाई विचारात घेऊन आता ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कमच राज्य शासनाकडून न मिळाल्यामुळे लाभार्थी वंचित राहिले आहेत.

असे दिले जाते अनुदान

ठाण्यात ही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत अंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत १९२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १९० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील २१ लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांप्रमाणे तर, १६९ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयाप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत या योजनेत १३७ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १३७ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २११ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी २०५ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयाप्रमाणे तर, सहा लाभार्थ्यांना १५ हजार रुपयाप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभगाच्या वतीने देण्यात आली आहे.

लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत

२०१८१९ मध्ये १५३ प्रस्ताव प्राप्त झाले होते तर, २०१९२० या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १५६ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहे. मात्र, राज्य शासनाकडून गेल्या दोन वर्षापासून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना देण्यात येणार्‍या अनुदानाची रक्कमच प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.


हेही वाचा – आंतरजातीय विवाहांना असं कसं देणार प्रोत्साहन?