घरमहाराष्ट्रकोरोना रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध

कोरोना रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध

Subscribe

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती, धार्मिक, सामाजिक, राजकीय मेळाव्यात गर्दी नाही

राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचार्‍यांची संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असे राज्यातील ठाकरे सरकारने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. कोरोना संकट गडद झाल्याची जाणीव गुरुवारी सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून यासंदर्भातील नियमावली शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५० टक्के करण्यात आली आहे. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहर्‍यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये. लोकांकडून कोरोना नियमाचं पालन करवून घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

राज्य शासनाच्या कोरोनासंदर्भात नव्या सूचना
राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्या ठेवा
नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के संख्या असावी
आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आले
सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.

- Advertisement -

कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाऊन करणे एक मार्ग आहे. लॉकडाऊनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र, मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरू लागले आहेत. परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र, आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाही.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -