घरमहाराष्ट्रशिवशाही बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना ७० टक्के सवलत

शिवशाही बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना ७० टक्के सवलत

Subscribe

शिवशाही बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना ७० टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग प्रवाशांना आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे रावते यांनी सांगितले.

‘शिवशाही बसला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद’

दिवाकर रावते म्हणाले की, ‘एसटी महामंडळाने काही काळापूर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांना अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्तींनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीचा सन्मान म्हणून दिव्यांगानाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

- Advertisement -

‘राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार’

सध्या महामंडळामार्फत दिव्यांग प्रवाशांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. ‘सध्या एसटी महामंडळाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे’, असेही रावते यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -