घरठाणेठाण्यात होलसेल मार्केटमधील दुकानाला आग, साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

ठाण्यात होलसेल मार्केटमधील दुकानाला आग, साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

Subscribe

ठाणे : येथील होलसेल मार्केटमधील कागदी व प्लास्टिक पत्रावळ, द्रोण, ग्लास आदी साहित्य असलेल्या दुकानाला सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी पहाटेचे साडेतीन वाजले. ही आग तब्बल साडेचार तास धुमसत राहिल्याने परिसरात बराच काळ धूर पसरला होता. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाले नसली तरी, मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठाण्याच्या जांभळी नाका, खारकळ आळी या होलसेल मार्केटमधील प्रधान चाळीतील मे. सोनू पेकेजिंग या एक मजली 650 स्क्वेअर फूटाच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन अधिकारी, ठाणे नगर पोलीस, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये कागदी व प्लास्टिक पत्रावळ, द्रोण, ग्लास, रूम फ्रेशनर तसेच इतर पॅकिंग मटेरियल असल्याने ही आग पसरत होती. ती आग मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

यावेळी घटनास्थळी 2 फायर वाहन, 1 रेस्क्यू वाहन, 2 वॉटर टँकर, 1 जम्बो वॉटर टँकर पाचारण केले होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोमवारी पहाटे पाच वाहने पडली आगीच्या भक्ष्यस्थानी
वर्तकनगर येथे बिल्डिंग क्रमांक – 41 समोरील मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या पाच वाहनांना आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत, तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत या आगीत चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा पाच वाहनांचे नुकसान झाले होते. एखाद्या वाहनामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -