घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर; शहरासह भुजबळांच्या येवल्यातही कार्यकर्ता मेळावा

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर; शहरासह भुजबळांच्या येवल्यातही कार्यकर्ता मेळावा

Subscribe

नाशिक : राजकीय पटलावर वेगाने घडणार्‍या नाट्यमय घडामोडी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे शनिवारी सातपूर येथील डेमोक्रॅसी सभागृहात आयोजित युवा मेळावा त्याचाच एक भाग आहे. या मेळाव्याला आदित्य ठाकरे संबोधित करणार आहे.

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शहरासह जिल्ह्यात शरद पवार, त्यानंतर छगन भुजबळ, शासन आपल्या दारी उपक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नाशिक दौरे झाले. प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशीही चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून नाशिककडे न फिरकलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आता नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरातील युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आदित्य छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात दाखल होणार आहेत. दराडे बंधूंच्या वतीने तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा येवला शहरातील महात्मा फुले नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी दिली. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्याचा दौरा करत भुजबळ यांना आवाहन दिले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात झालेल्या फूटीनंतर छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यात आदित्य ठाकरे यांचा दौरा होणार असून यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते राज्यातील बदललेले राजकीय समीकरण तसेच अजित पवार, छगन भुजबळ यांच्या बंडाबाबत काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक शहरातील मेळाव्याची पूर्वतयारी आणि नियोजनासाठी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे आदी उपस्थित होते. आगामी महापालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने आदित्य ठाकरे यांच्या या नाशिक दौर्‍याला विशेष महत्त्व आहे. आदित्य ठाकरे शिवसैनिकांना आणि विशेषतः युवकांना मार्गदर्शन करणार असल्याने सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बागुल,गायकवाड, बडगुजर, गिते यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -