घरमहाराष्ट्रअनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर घाटकोपरच्या नवीन नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर घाटकोपरच्या नवीन नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा

Subscribe

गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या मुंबईतील नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच वर्षापासून धूळ खात पडलेल्या घाटकोपरमधील नवीन नाट्यगृहात अखेर तिसरी घंटा वाजणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या मुंबईतील नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच वर्षापासून धूळ खात पडलेल्या घाटकोपरमधील नवीन नाट्यगृहात अखेर तिसरी घंटा वाजणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यातच हे नाट्यगृह सुरू होणार आहे. त्यामुळे आता घाटकोपरमधील नाट्यरसिकांना नाट्य प्रयोग पाहता येणार आहे.

घाटकोपर (पूर्व) भागातील गौरीशंकर वाडीनजीक हे नाट्यगृह असून महापालिकेच्या ताब्यात आहे. हे नवीन नाट्यहगृह गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुरू होणार आहे. मुंबईत चित्रपट शौकीनांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्याचप्रमाणे नाट्य रसिकांची संख्याही काही लाखात आहे. मात्र नाट्य रसिकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंबईत काही खासगी व मोजकीच नाट्यगृहे आहेत. त्या तुलनेत मुंबई महापालिकेची कालिदास, दीनानाथ मंगेशकर ही दोन नाट्यगृहे कालपर्यंत अस्तित्वात होती. काही दिवसांपूर्वीच भायखळा येथील राणीच्या बागेत नव्याने उभारण्यात आलेले अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात एक नाटक नुकतेच पार पडले. तर पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) येथे महापालिकेला एसआरए योजनेअंतर्गत बिल्डरकडून एक छोटेसे नाट्यगृह (२२७ आसन क्षमता) धुळखात अवस्थेत पडून होते. हे पालिकेचे चौथे नाट्यगृह ठरणार आहे.

- Advertisement -

मात्र २०१२ मध्ये ज्या जागेवर एसआरए योजना राबवली त्या ठिकाणी त्यावेळी स्थायिक असलेल्या तबेला मालक, बिल्डर व पालिका यांच्यात वादविवाद सुरू होता. या वादात तबेला मालक हट्टाला पेटला होता. त्याने जागेचा हक्क न सोडता त्या ठिकाणी गुरांचे बस्तान हलविण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका या नाट्यगृहाचा ताबा घेण्यास काहीशी कचरत होती. दरम्यान, काही नाट्य कलाकारांनीही पालिकेला नाट्यगृहाची वास्तू लवकरात लवकर ताब्यात घेण्याबाबत विनंती केली होती. तसेच नाट्यगृह सुरू करण्याबाबत स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनीही अनेकदा प्रयत्न केले व पाठपुरावाही केला. त्याला आता उशिराने का होईना यश आले आहे.

अखेर काहीतरी तडजोड होऊन त्यावर तोडगा निघाला. मात्र २०१२ पासून नाट्यगृहाची तयार वास्तू अशीच म्हणजे विनावापर पडून राहिली होती. दरम्यान या नाट्यगृहाच्या आवारात रिक्षा, खासगी वाहनांची सर्रासपणे पार्किंग केली जात होती. आता या वास्तूचा ताबा पालिकेने घेतला असून लवकरच या वास्तूचा वापर नाट्यगृहासाठी होणार असून तिसरी घंटा वाजणार आहे, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्व व पश्चिम विभाग, चेंबूर, छेडानगर, कामराज नगर, रमाबाई कॉलनी, विक्रोळी, कांजूरमार्गपर्यन्तच्या नाट्य रसिकांना घाटकोपर येथील या नवीन नाट्यगृहात नाटके पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी त्यांना दादर शिवाजी मंदिर, मुलंड येथील कालिदास नाट्यगृहापर्यन्त आपल्या चपला झिजवाव्या लागणार नाहीत. स्थानिक माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेता राखी जाधव यांनी यासाठी पाठपुरावा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -