Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ...आणि मी आजपर्यंत थांबलो, भरत गोगावले यांनी मांडली कळ आतल्या जिवाची!

…आणि मी आजपर्यंत थांबलो, भरत गोगावले यांनी मांडली कळ आतल्या जिवाची!

Subscribe

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार खाली खेचून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे सरकार स्थापन केले. तेव्हापासून वर्षभरात तीन शपथविधी झाले, पण मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना संधी मिळालेली नाही. पण शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वाढत आहे. त्यातही महाडचे आमदार भरत गोगावले आघाडीवर आहेत. अलिबाग येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांसमोर पुन्हा एकदा ‘ही कळ आतल्या जिवाची’ मांडली.

हेही वाचा – राष्ट्रवादी अजित पवारांना दिली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली भीती

- Advertisement -

ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल 39 दिवसांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 – 9 आमदारांनी शपथ घेतली. त्यात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू या शिंदे गटातील आमदार नाराज झाले. तथापि, मंत्रीपदाचा दर्जा असलेले दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद देऊन बच्चू कडू यांची नाराजी शिंदे-फडणवीस सरकारने दूर केली.

आता मंत्रीपदासाठी सर्वात जास्त उत्सुक आहेत ते भरत गोगावले. 18 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर ‘रायगड’ हा शासकीय बंगला मंत्री रवींद्र चव्हाण यांना हवा होता. पण मंत्रीपद नसलेले भरत गोगावले यांनीही या बंगल्यावर दावा केला होता. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश होणारच आहे, त्यामुळे हा बंगला आपल्याला मिळू शकतो, असे त्यांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना सांगितल्याची चर्चा त्यावेळी होती.

- Advertisement -

हेही वाचा – लोकांना पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, ठाकरे गटाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र

जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार झाला. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिंदे गटातील एकाही आमदाराला संधी मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटात नाराजी पाहायला मिळाली. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे मंत्रीपद देऊ नये, अशी आग्रही मागणी भरत गोगोवले यांनी केली. कारण मंत्रीपद नसलेल्या गोगावले यांना हे पद हवे आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात इमाने-इतबारे साथ देऊनही अद्याप मंत्रीपद न मिळाल्याची खंत भरत गोगावले यांनी वारंवार व्यक्त केली आहे. काल, बुधवारी अलिबाग येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एका ही आतल्या जिवाची कळ सर्वांसमोर मांडली. पहिल्या 18 जणांच्या यादीत माझे नाव होते. पण मुख्यमंत्री शिंदे अडचणीत सापडले होते. कारण एका आमदाराने सांगितले की, मला मंत्रीपद दिले नाही तर, माझी बायको आत्महत्या करेल. दुसऱ्याने, नारायण राणे मला संपवतील, असे सांगितले. तर तिसऱ्याने थेट राजीनाम्याची धमकी दिली होती. यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला होता. तुम्हा पाचपैकी दोघांना मंत्रीपद दिली असल्याचे सांगत संभाजीनगरमधील आमदाराला समजावले, असे गोगावले म्हणाले.

हेही वाचा – “आम्ही फोटो वापरणारच..” शरद पवारांच्या इशाऱ्याला अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

आता बायकोचे कारण देणाऱ्याचे काय करायचे? त्याच्या बायकोला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला मंत्रीपद देऊन टाका, असे सांगितले. तिसऱ्याला नारायण राणेंनी यांनी संपवायला नको, यामुळे आपली एक सीट कमी होईल. त्यामुळे त्यालाही द्या. मी थांबतो तुमच्यासाठी… आणि मी जो थांबलो तो आजपर्यंत थांबलो, अशी व्यथा त्यांनी मांडली.

- Advertisment -