घरमहाराष्ट्र"आता काँग्रेसही फुटणार...", सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांचा खळबळजनक दावा

“आता काँग्रेसही फुटणार…”, सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांचा खळबळजनक दावा

Subscribe

जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

मुंबई : गेल्या दोन वर्षामध्ये राज्यात दोन मोठे राजकीय भूकंप झालेले आहेत. भाजपामुळे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. या पक्षाचे दोन गट झाल्याने यांच्या एक गट सत्तेत आणि एक गट विरोधात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. भाजपाने अद्याप तरी काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवलेला नाही. मात्र, याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात या घडामोडी घडतील, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दमानिया यांनी हा दावा केला आहे. (Anjali Damania’s sensational claim about Congress)

हेही वाचा… Sanjay Raut: दक्षिणेकडून काय, ते दक्षिण ध्रुवावरूनही प्रचार करतील; राऊतांचा पंतप्रधानांना टोला

- Advertisement -

याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्ष भाजपा फोडेल. त्यामुळे विरोधी पक्षच उरणार नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. लढावे लागेल. जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात ओढून घेत आहे ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर, ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करत आहेत. अशी माझ्या मनात शंका असल्याचेही अंजली दमानिया यांनी बोलून दाखवले.

अंजली दमानिया यांनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील असे करत आहेत, असं मी सुद्धा ऐकले आहे. पण मला तस काही वाटत नाही. आज लढायचे झाले, तर कोणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो. पूर्वी मी खडसेंविरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले. तेव्हा मी फडणवीसांसाठी लढत आहे, असे लोक म्हणायचे. पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात, असेही दमानिया यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जो कोणी लढतो त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. पण जरांगेंनी इतका मोठा लढा उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. राजकीय वर्तुळात जी चर्चा होते तीच मी ऐकली आहे. मराठा आरक्षणासाठी ती व्यक्ती लढा देत असेल तर त्याचे कौतुक करायला हवे. एवढा मोठा लढा उभा करणे ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही. परंतु जरांगे पाटलांवर ज्याप्रकारे पुष्पवृष्टी केली जाते. अडीचेशे जेसीबी लावून फुले उधळली जातात ते जरांगेनीही स्वत:हून थांबवायला हवे. आपण आपल्या लढ्याला तत्वे ठेवली तर खरे कोण आणि खोटे कोण हे लोकांनाही कळते, असेही मुलाखतीत अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -