घरमहाराष्ट्रअटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम

अटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम

Subscribe

पुणे आणि सोलापूर,औरंगाबादच्या महत्वाच्या बातम्या थोडक्यात.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी सकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रेल्वेने सोलापूरात आणण्यात आला. यावेळी अटलजींच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी नगरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. रेल्वे स्थानकापासून फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये अस्थीकलशाची यात्रा काढण्यात आली.

स्टेशनपासून महपौर बंगला डफरीन चौक, महानगरपालिका, पार्कचौक, सरस्वती चौक येथून शिवाजी चौकाला वळसा घालून राजवाडे चौक येथील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर अस्थिकलश ठेवण्यात आला. दुपारी साडे अकरा पर्यंत सोलापूरकरांनी अटलजींच्य अस्थीकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर अस्थीकलश पंढरपूरला नेण्यात आला. पंढरपुरात अस्थिकलश आल्यानंतर अनेकांनी अटलजींच्या अस्थींचे दर्शन घेतले.नामदेव पायरीजवळील चौथर्‍यावर काही काळ कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.त्यानंतर गोपाळपूर येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत चंद्रभागा नदीमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी अटलजी अमर रहे,अटलजी अमर रहे घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र नाही; मुख्य निवडणूक आयुक्त 

औरंगाबाद । देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, त्या प्रक्रियेला किमान वर्षचा कालावधी लागेल. त्यामुळे आगामी लोकसभा आणि ११ राज्यांतील निवडणुका एकत्र होणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी सांगितले.रावत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक संपादकांशी चर्चा केले. त्यावेळी ते म्हणाले की, देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी कायदेमंडळाने ठरवले पाहिजे. तसेच यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल.तसेच लोकप्रतिनिधी कायद्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी जेव्हा राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तेव्हा या बाबी कळण्यास आणि तयारी करण्यास पुरेसा वेळही निवडणूक विभागाला मिळू शकणार आहे. या परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत.

लोकसभेसाठी केंद्राचे कर्मचारी आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यांचे कर्मचारी पुरविण्याची विनंती मुख्य निवडणूक आयुक्तांनी राष्ट्रपतींना केल्यास ती पुरविण्याची तरतूद राज्यघटनेत असल्याचे रावत म्हणाले. आम्हाला निमलष्करी दलाचे जवानही बंदोबस्तासाठी मिळतात. पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कायदे तयार करणार्‍या मंडळींनी राज्यघटनेत बदल करण्याबाबत पाऊले उचलायला हवीत. राज्यघटनेच्या नियम ३२४ नुसार निवडणूक प्रक्रिया राबविणे ही मुख्य निवडणूक आयुक्तांची महत्त्वाची भूमिका असते. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासह त्यावर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी ही निवडणूक आयुक्तांवर असते. लोकसभा, विधानसभा वा राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी सहा महिने अगोदर मुख्य निवडणूक आयुक्त अधिसूचना काढू शकतात. तसेच कार्यकाळी संपण्यापूर्वी त्या त्या सभागृहाचे सदस्य सभागृहात नव्याने प्रवेश करु शकतात. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासाठी देशातील विधानसभांचा कार्यकाळ संपण्याची प्रतीक्षा निवडणूक विभाग करु शकत नाही, रावत म्हणाले.

- Advertisement -

 

पुण्यातून पळवले बाळ, मुंबईत सुखरूप सुटका

पुणे । मुंबईतील ओशिवरा आणि आंबोली पोलिसांनी एका अपहरण करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका केली आहे. १७ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे रेल्वे स्थानकातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरण प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी बाळाला मातेकडे सोपवले असून आरोपी महिला मनीषा महेश काळे (२५) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. बकरी ईदनिमित्त बुधवारी मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तादरम्यान सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक दुधाड, हवालदार पवार, महिला पोलीस हवालदार गावनग हे पथक पोलीस मोबाईल व्हॅन मधून गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्याकडे वर्षा पवार (२०) ही तरुणी आली. एका महिलेच्या हाता लहान बाळ असून ते बाळ त्या महिलेचे नसावे, तिने ते चोरले असल्याची शक्यता आहे, असे पवार यांनी पोलिसांना सांगितले. सदर माहिती मिळताच मोबाईल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेऊन आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील आणि मोटे यांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी मनीषा हिने, बाळाच्या आईची नजर चुकवून चार महिन्यांच्या बाळाला पळवले, अशी कबुली दिली. त्यानुसार उपनिरीक्षक पाटील आणि मोटे यांनी तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची माहिती मिळातच पुणे लोहमार्ग पोलीस त्या बाळाला घेऊन ताबडतोब मुंबईला येण्यास निघाले. कागदोपत्री पूर्तता करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार, पोलीस निरीक्षक कुरिल यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांच्या बाळाला मातेच्या ताब्यात देण्यात आले, तर मनीषा काळे हिला पुणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.


कमी किंमतीत चोरीच्या दुचाकी विकणारे जेरबंद

पुणे । ग्रामीण आणि शहरी भागातील दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकणार्‍या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ८ लाख ५५ हजार रुपयांच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे भोसरी पोलीस कर्मचार्‍याची बुलेट याच टोळीतील एकाने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चारजणांना अटक केली आहे. त्यापैकी तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रामेश्वर विलास खंदारे, (२५), अनिल तबा काळे (१९), ओंकार रमेश चव्हाण (२१) रामेश्वर परमेश्वर भिसे (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील घरासमोरील तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी हँडल लॉक तोडून आरोपी चोरायचे. दुचाकी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात कमी किंमतीत विकत. तर यातील काही आरोपी हे दुचाकी वापरून सोडून द्यायचे.अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.यातील एक बुलेट ही भोसरी पोलीस कर्मचार्‍याची आहे. भोसरी पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत.त्याची किंमत ८ लाख ५५ हजार रुपये आहे.


नारायण सुर्वे यांनी माणसाला प्रतिष्ठा दिली -डॉ. नागनाथ कोतापल्ले

पिंपरी-चिंचवड । पद्मश्री नारायण सुर्वे हे महाराष्ट्राचे कबीर होते. त्यांच्या कवितेमध्ये नाट्य अंतर्भूत होते. स्वप्नरंजनाच्या पलीकडे जाऊन सुर्वे यांनी कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांची प्रत्येक कविता अविस्मरणीय आहे. सुर्वे यांनी माणूस नावाच्या गोष्टीला प्रतिष्ठा दिली असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले . पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने नेरळ येथे ‘मास्तरांच्या सावलीत-काव्यजागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कवीसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. कोतापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, केसरी टूर्स भोसरीचे संचालक अरुण इंगळे, पत्रकार अनिल कातळे, मुकुंद आवटे आदी उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -