घरमनोरंजन‘कागज के फूल’ : देखी जमाने की यारी

‘कागज के फूल’ : देखी जमाने की यारी

Subscribe

तसं पहायला गेलं तर ‘कागज के फूल’ गुरुदत्तच्या इतर कुठल्याही चित्रपटासारखा आहे. तो क्लासिक तर आहेच; पण तो चांगला आहे, याबाबतही दुमत नसावे. चांगली कथा, रफीची लक्षात राहणारी गाणी, समकालीन चित्रपटांप्रमाणे जॉनी वॉकरचे कॅरिकेचरिश पात्र, इत्यादी गोष्टी तर यात आहेतच. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आजही रेलेवंट आहे. त्यातील मूलभूत कथानकाचं आजही लागू पडणं हेच त्याच्या कालातीत असण्याचं मुख्य कारण आहे.

सुरेश सिन्हा (गुरुदत्त) हा एकेकाळचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. जो सध्या हलाखीचं जीवन जगतो आहे. कधीकाळी आपणच काम केलेल्या किंबहुना करवून घेतलेल्या फिल्म स्टुडिओमध्ये असताना त्याला त्याचे आधीचे दिवस आठवतात. आणि त्याच एकेकाळी यशाच्या शिखरावर असणार्‍या सिन्हाच्या र्‍हासाची गोष्ट म्हणजे ‘कागज के फूल’. ज्याचं मर्म त्याच्या नावातच आहे. ज्याचा सरळ अर्थ – ‘चित्रपटसृष्टीतील नश्वर आयुष्य’ असा काढता येऊ शकतो.

नश्वर यासाठी की मुळातच कुठलीही गोष्ट चिरंतर नसते. त्यातही चित्रपटसृष्टीत तर नाहीच नाही. त्यामुळे एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेली, समोर चित्रपटांच्या रांगा लागलेल्या लोकांची काळाच्या ओघात लुप्त होण्याची कित्येक जिवंत उदाहरणं देता येतील. त्यामुळे शांती (वहिदा रेहमान) या सामान्य स्त्रीला नायिका बनवत, तिला रुपेरी पडद्यावर आणल्यावर अल्प काळात स्वतःच त्या जगापासून तुटले जाण्याचा योग जेव्हा सुरेशच्या पदरी पडतो तेव्हा त्यात कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. याखेरीज महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदत्त कुठलीही गोष्ट दाखवण्यास कचरत नाही. परिणामी अभिनेत्री-दिग्दर्शक किंवा एकूणच चित्रपटसृष्टीतील लोकांचे आपापसातील संभाव्य संबंधांचे चित्रण करण्यात तो काही हातचं राखत नाही. असे असले तरी त्याचा नायक एक व्यक्ती म्हणून कचरतो आहे. स्वतःचे प्रेम नाकारतो आहे. समोरच्या व्यक्तींप्रती असलेल्या प्रेमापोटी दरवेळी काही ना काही त्याग करतो आहे. त्याची नायिका सुद्धा वेळोवेळी हेच करताना दिसून येते. ज्यामुळे ही दोन्ही मध्यवर्ती पात्रं अधिकाधिक आदर्शतेकडे झुकतात.

- Advertisement -

अर्थात ही पात्रं एक माणूस म्हणून दरवेळी बरोबरच आहेत अशातला भाग नाही. कारण या त्याग आणि नसत्या आदर्श व्यक्तिमत्त्वापोटी दरवेळी ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीला मुकत आहेत. आणि हेच तर त्यांना अधिक सुंदर आणि वास्तविक आयुष्यातील लोकांना समांतर बनवतं. त्यामुळे त्याची पात्रं आणि परिणामी एकूणच कलाकृती त्याच्या समकालीन लेखक-दिग्दर्शकांप्रमाणे अतिरेकी रोमँटिसिझमचे कोंदण असलेली न बनता वास्तववादाची धारदार किनार असलेली बनतात. त्यामुळेच ‘कागज के फूल’चा विचार केल्यास तो केवळ लाइमलाईटमधील लोकांची किंवा एका दिग्दर्शकाच्या आयुष्याची, त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांची किंवा अगदी त्याची एकट्याची प्रेमकथा न बनता एकूणच चित्रपटसृष्टीचं डॉक्युमेंटेशन बनतो.

याखेरीज चित्रपटाच्या ओघात त्या त्या घटनेनुसार काही गाणीही आहेतच. पण चित्रपटाच्या एकूणच थीमला अधिक खोलवर जाऊन वाहिलेली गाणी म्हणजे ‘वक्त ने किया क्या हँसी सितम’ आणि ‘देखी जमाने की यारी’. गुरुदत्तला सर्वाधिक साजेसा आवाज म्हणजे रफीचा. त्यामुळे इथेही ही गाणी त्याने गायली यात काही नवल नाहीच. यापैकी ‘वक्त ने किया…’चा रोख मुख्यतः अपरिहार्य कारणांमुळे नायक आणि नायिकेतील दुरावा वाढत जाण्याकडे आहे. तर ‘देखी जमाने की यारी’ चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना मानाव्या अशा सुरेशच्या आयुष्याचे आणि मुख्यतः त्याच्या जीवनातील र्‍हासाचे अधिक विस्तृतपणे विवेचन करते. सुरेश प्रसिद्धीच्या झोतात असताना फिल्म स्टुडिओ, इंडस्ट्रीशी निगडीत लोकांनी आर्थिक, सामाजिक हेतूंपोटी त्याच्याशी संबंध जोपासणे आणि अपयशानंतर विसरून जाणे इतकी मूलभूत गोष्ट आणि मानवी स्वभावाचे कंगोरे दर्शवण्यासाठी सदर गाणे पुरेसे आहे. कैफी आझमीच्या याच गाण्याने किती वेगवेगळ्या कालखंडातील लोकांचे एकत्रितपणे प्रतिनिधित्व केले आहे. याची तर गणनाच नको.

- Advertisement -

अशोक सराफच्या ‘एक उनाड दिवस’मध्ये तो जेव्हा एकेकाळच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिकेला भेटतो आणि तिच्या लयास गेलेल्या प्रसिद्धीचे दर्शन होते तेव्हा किंवा ‘बायोस्कोप’मधील गजेंद्र अहिरेच्या शॉर्ट फिल्ममधील बाई जेव्हा दिसते तेव्हा (जी पुढे जाऊन या गाण्याची आठवणही काढते) अशा अनेक कथानकांचे स्मरण होते. यातच गाण्याची सफलता आहे.
जगात कुठल्याही व्यक्तीला सर्वाधिक भय कशाचे असते तर ते कालबाह्य ठरण्याचं. हा चित्रपट आणि यातील गाणी दोन्हीही या मर्यादा ओलांडतात आणि कालातीत ठरतात. कदाचित त्यामुळेच ‘कागज के फूल’ एकूणच मानवी आयुष्याच्या अस्थायी स्वरूपाला, वैयक्तिक, आर्थिक किंवा सामाजिक जीवनातील अस्थिरतेला आणि स्पर्धात्मक वातावरणावर भाष्य करण्यामुळे काळाची बंधनं ओलांडून अजूनही लागू पडेल. अशा प्रकारे यशस्वी वाटचाल करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -