घरमहाराष्ट्रManohar Joshi : बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपला, जाणून घ्या मनोहर जोशी यांचा...

Manohar Joshi : बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपला, जाणून घ्या मनोहर जोशी यांचा जीवनप्रवास

Subscribe

मुंबई : बाळासाहेबांचा कडवट, सच्चा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज शुक्रवारी 23 फेब्रुवारीला पहाटे 03 वाजताच्या सुमारास निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनामुळे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून दुःख व्यक्त येत आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थामुळे ते राजकारणापासून दूर होते. तर दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दादर येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Balasaheb Thackeray true Shiv Sainik lost, know the life journey of Manohar Joshi)

मनोहर जोशी यांनी अत्यंत संघर्षमय आयुष्य जगत नावलौकिक मिळवला होता. ते त्यांच्यातील संयमी आणि वक्तशीरपणासाठीही ओळखले जायचे. परंतु, बाळासाहेबांचे एकनिष्ठ, सच्चे आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची महत्त्वाची ओळख होती. मनोहर जोशी यांच्या जाण्याने राजकारणातील मोठे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. जाणून घेऊयात मनोहर जोशी यांचा संघर्षमय प्रवास आणि त्यांची राजकीय कारकीर्द

- Advertisement -

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. परंतु, मनोहर जोशी लहान असताना त्यांचे वडील हे भिक्षुकी करत असे. कालांतरानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करू लागले. एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. मात्र शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षक झाले. मुंबईत बहिणीकडे शिक्षणाकरिता आल्यानंतर त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन आपले पुढील शिक्षण घेतले.

हेही वाचा… Manohar Joshi : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’…डॉ. मनोहर गजानन जोशी !

- Advertisement -

त्यानंतर किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणूनही त्यांनी नोकरी केली. वयाच्या 27 व्या वर्षी मनोहर जोशी एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली. 2 डिसेंबर 1961 ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. कोहिनूर क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देता यावे, असा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले. तर 1967 मध्ये ते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोशी सरांना पटू लागल्याने त्यांनी शिवसेनेशी कायमचे जोडण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाची बाब म्हणजे मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते होते. त्यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ते अत्यंत जवळून ओळखत होते. शिवसेनेत आल्यानंतर जोशी यांना एक वेगळी मिळाली. भिक्षुकी करण्यापासून ते केंद्रीय मंत्री पद सांभाळण्यापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. राडा करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी ही शिवसैनिकांची ओळख असली तरी सभ्य आणि संस्कृत नेते म्हणून जोशी यांची ओळख कायम राहिली.

1967 साली मनोहर जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1967 ते 77 या काळात त्यांनी महापौर पद भूषविले आहे. दोन वेळा जोशी सरांना नागरिकांनी नगरसेवक पदी विजयी करून महापालिकेवर पाठवले. तर 1990 ते 91 या काळात त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता पदही सांभाळले. तीन वेळा विधान परिषदेचे आमदार आणि दोन वेळा विधानसभेचे आमदार पदी त्यांची निवड झाली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांची बाळासाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून निवड केली. 1995 ते 99 या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदी राहून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तर या काळात ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिल्याने बाळासाहेबांवर जोरदार टीका करण्यात आली. परंतु, जोशी यांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले.

मुख्यमंत्री पद भूषविलेल्या मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत 1999 ते 2002 या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते सांभाळले. तर 2002 ते 2004 या कालावधीत त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनविण्यात आले. यानंतर 2006 ते 2012 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार राहिले. या काळात त्यांच्याकडे विविधी समित्यांचे सदस्यत्वही होते.

मनोहर जोशी हे पेशाने शिक्षक असल्याने ते वेळेबाबत अत्यंत काटेकोर होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबईमध्ये 50 उड्डाणपूल तयार करणे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. त्याशिवाय औद्योगिक गुंतवणुकीकरिता ऍडव्हान्टेज महाराष्ट्र ही जागतिक परिषद तयार करणे, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे म्हणून ऍग्रो ऍडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद तयार करणे, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राच्या विकासाकरिता 60 जीवनदायी योजना राबवणे आणि 1994 ला जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची स्थापना करण्यासारखे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी घेतले.

कोहिनूर क्लासेसची स्थापना करून यामार्फत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. यानंतर त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करत शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याासाठीचे महत्त्वाचे काम केले. आज भारतभर कोहिनूरच्या 70 शाखा असून दरवर्षी 12 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षण मिळत आहे. कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -