घरदेश-विदेशManohar Joshi : बाळासाहेबांचं ते पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदच...

Manohar Joshi : बाळासाहेबांचं ते पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदच सोडलं

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमधील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी पहाटे ३.०२ वाजता त्यांचे निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. त्यांच्या एकनिष्ठतेचे किस्से आजही सांगितले जातात.

क्षणात मुख्यमंत्री पद सोडले

यातीलच एक किस्सा मुख्यमंत्री पदाबाबतचा आहे. १९९९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचं सरकार राज्यामध्ये होतं. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याऐवजी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं, तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनी अचानक राजीनामा दिला होता. भाजपा – शिवसेना युतीचं सरकार आलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मुख्यमंत्री कोणीही झालं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहणार. मला ऊठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे, असं बाळासाहेब म्हणाल्याचे उल्लेख काही ठिकाणी दिसतात.

- Advertisement -

हेही वाचा – Manohar Joshi : बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपला, जाणून घ्या मनोहर जोशी यांचा जीवनप्रवास

सगळ्यांना सांभाळत राज्यकारभार ही कसरतच

युती सरकार असताना भाजपा आणि शिवसेनाप्रमुख यांना सांभाळत काम करणे ही मनोहर जोशी यांच्यासाठी एक कसरतच होती. त्यांचे शिवसेनाप्रमुखांशी अधूनमधून खटकेही उडत होते. एनरॉन प्रकल्पासाठी त्या कंपनीच्या भारतातल्या प्रमुख रिबेका मार्क जोशींना भेटायला येणार होत्या. पण त्या उशिरा आल्याने जोशींनी संतापून बैठक रद्द केली. पण त्यावेळी रिबेका या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर चर्चा करत होत्या. या वादाबद्दल ‘जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ या प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या घटनेतून विपरित अर्थ काढण्यात आला आणि रिबेका बाळासाहेबांना भेटल्या म्हणून मनोहर जोशी संतापले अशी चुकीची माहिती पुरवण्यात आली आणि वादाची ठिणगी पडली. पुढे जयदेव ठाकरेंच्या घरावर छापा, रमेश किणी मृत्यू प्रकरण, भूखंडांचं आरक्षण बदलणं या सगळ्या वादग्रस्त प्रकारांमुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासमोर मुख्यमंत्री बनण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना राजीनामा देण्याची मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यानंतर मनोहर जोशी यांनी राजीनामा दिला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले.

- Advertisement -

हेही वाचा – Manohar Joshi : अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता, फडणवीस यांच्या शोकसंवेदना

पत्रामध्ये काय ?

प्रिय मुख्यमंत्री,

तुम्ही आत्ता जिथे असाल, तिथे सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.

मुख्यमंत्री का केले असे विचारले नाही मग…

१९९९ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण कारण विचारणार नाही कां, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर एका क्षणात उत्तर देताना मनोहर जोशी म्हणाले की, मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले तेव्हा मी त्यांना, “साहेब, मला मुख्यमंत्री का करीत आहात ? असे विचारले नव्हते. तेव्हा त्यांनी पद दिले आणि आता त्यांनी काढून घेतले, यात विशेष काय ? असा प्रतिसवाल करत त्यांनी पत्रकारांना चोख उत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -