घरमहाराष्ट्रभाजपचा महापालिका गटनेता दोन दिवसांत होणार जाहीर

भाजपचा महापालिका गटनेता दोन दिवसांत होणार जाहीर

Subscribe

प्रभाकर शिंदेंसह अभिजित सामंत यांच्यामध्ये स्पर्धा नवीन पक्ष कार्यालयात मार्चमध्ये मुक्काम हलणार

मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवक नेतृत्वहिन ठरल्याने अखेर तब्बल दहा महिन्यांनंतर आता भाजपचा महापालिका गटनेता जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपने आता महापालिकेत आपले लक्ष वेधून महापालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये नवीन गटनेत्यांचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार बनल्यानंतर गटनेतेपदाकडे त्यांचे दुर्लक्ष होवू लागले. खासदारकीचा भार खांद्यावर पडल्याने कोटक यांना महापालिकेत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. परिणामी मार्गदर्शनाअभावी भाजपच्या नगरसेवकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच पक्षाची ध्येयधोरणे मांडण्यात भाजपच्या नगरसेवकांना अपयश येत आहे. कोटक यांना खासदार बनल्यापासून वेळ मिळत नसल्याने तसेच गटनेतेपदाचा भार पक्षाने अन्य नगरसेवकाच्या खांद्यावर न सोपवता त्यांच्याकडेच ठेवल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभांसह विविध समित्यांच्या बैठकीत पक्षाच्या नगरसेवकांना काय भूमिका मांडावी आणि कुठे विरोध करावा, याचेच मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे संभ्रमावस्थेत पडलेल्या महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांना नेतृत्व देण्यासाठी अखेर कोटक यांच्याकडील गटनेतापद काढून अन्य नगरसेवकाच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गटनेता पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक व माजी सभागृहनेते प्रभाकर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट, अभिजित सामंत, प्रकाश गंगाधरे, अतुल शहा, उज्वला मोडक यांची नावे चर्चेत आहेत. परंतु यापैकी प्रभाकर शिंदे आणि अभिजित सामंत यांच्यांमध्ये प्रमुख स्पर्धा आहे. त्यामुळे मुंबई भाजप यापैकी कुणाच्या गळ्यात गटनेता पदाची माळ घालते याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये गटनेत्याचे नाव जाहीर केले जाईल.

- Advertisement -

पुढील महिन्यात नवीन पक्ष कार्यालय

भाजपसाठी महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील तळ मजल्यावर नवीन कार्यालय बनवण्यात आले आहे. परंतु वास्तुशास्त्राचे कारण पुढे करत आजवर या नवीन कार्यालयाचा ताबा भाजपचे नगरसेवक घेत नव्हते. त्यामुळे कार्यालयाची वास्तू बनून पूर्ण असतानाही भाजप आपले जुने कार्यालय सोडायला तयार नाही. परंतु आता नवीन कार्यालयात जाण्याची तयारी भाजपच्या नगरसेवकांनी केलेली आहे. त्यासाठी मराठी भाषा दिनाचा मुहूर्त साधून नवीन पक्ष कार्यालयात प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. परंतु सोमवारी नवीन कार्यालयाची पाहणी पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवकांनी केल्यानंतर, यामध्ये बर्‍याच प्रमाणात डागडुजी करणे आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यामुळे डागडुजी आणि रंगरंगोटीच्या कामांसाठी २७ फेब्रुवारीचा मुहूर्त पुढे ढकलून मार्च महिन्यात नवीन कार्यालयात जाण्याची तयारी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -