घरमहाराष्ट्रदसऱ्याच्या पूर्वसंध्येला बहीण-भावाची आत्महत्या

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बहीण-भावाची आत्महत्या

Subscribe

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खेड तालुक्यात बहीण-भावाने विष पिऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे. मात्र, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ऐन सणासुदीच्या तोंडावर बहीण-भावाने खेडमधल्या डेरेवाडीमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शैला गणपत भोपळे (वय ४०) आणि रंजन गणपत भोपळे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या बहीण भावाचे नाव आहे.

थायमिट पिऊन केली आत्महत्या

मयत शैला व रंजन गणपत भोपळे हे बहीणभाऊ डेहणे येथे एकत्र राहत होते. त्यांची थोरली बहीण लक्ष्मीबाई तुकाराम कशाळे या देखील डेरेवाडीत राहत आहेत. बुधवारी दुपारपासूनच रंजनचे घर बंद का आहे? म्हणून लक्ष्मीबाई पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. दरवाजा बंद अवस्थेत दिसल्याने आवाज देत दरवाजा ढकलला असता हा प्रकार उघडकीस आला. शैला व रंजन या बहीण भावाने विषारी ‘थायमिट’ हे कीटकनाशक प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. शैला हिच्या हातावर ब्लेड मारल्याचा जखमा होत्या. ही घटना पाहून आरडा ओरडा केल्याने ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यावेळी रंजनची हालचाल सुरू होती, तर त्याची बहीण मृत झाली होती. ग्रामस्थानी रंजनला उपचारासाठी खाजगी वाहनातून तातडीने चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

पोलिसांचा घटनास्थळी दाखल होण्यास उशीर

मयत रंजन याचे लग्न झाले असून त्याला पत्नी व एक लहान मुलगी आहे. पत्नीबरोबर पटत नसल्याने त्याची पत्नी तिच्या माहेरी राहत होती. तर रंजनची बहीण शैला ही अविवाहित होती. रंजनच्या मागे दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ऐन दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सख्ख्या बहीणभावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोन्ही बहीण-भावंडांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -