घर महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी, ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी, ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ हा वणव्यासारखा चटके देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला शेतकरी पुत्र समजतात. ते साताऱ्यातील त्यांच्या शेतावर हेलिकॉप्टर उतरवतात व शेती करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही त्याच पद्धतीचे पंचतारांकित शेतकरी आहेत. पवार-शिंद्यांना रताळे जमिनीत उगवते की झाडावर ते कळते, पण महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणावर त्यांच्याकडे तोड नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते थांबवू शकत नाहीत, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – राज्यभरात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

- Advertisement -

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री व दोन अनुभवी उपमुख्यमंत्री लाभले आहेत. या तिघांना अवतारी पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. तरीही महाराष्ट्राचा शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे. त्याची शेते सुकली व चुली विझल्या आहेत, अशी प्रखर टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

नगरविकास खात्याची आमदारांवर उधळपट्टी

आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी तोड निघणे गरजेचे आहे. तातडीचे अनुदान, पीक विमा, वीज बिल माफी यावर निर्णय होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट आहेच. त्यामुळे ‘टँकर्स’ वाढवावे लागतील. जनावरांच्या चारापाण्याबाबत सरकार काय उपाय करणार आहे? मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवर सुरूच आहे. ती थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांचे प्राण वाचविण्यासाठी खर्चायला हवा, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार

- Advertisement -

महाराष्ट्रात यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीच्या आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. चालू महिन्यात त्याची किती कृपा‘वृष्टी’ होईल याचा अंदाज हवामान खात्यालाही नाही. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्ह्यात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – ब्रेक के बाद… पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस पुन्हा सुसाट

राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव

राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. मुंबई-पुण्यासारख्या शहरांवर लोंढे आदळतील. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहेच. त्यात अकलेचाही दुष्काळ पडल्याने मार्ग निघणे अवघड झाले आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -