घरमहाराष्ट्रआरोप करणार्‍यांची ही तर पोटदुखी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा किरीट सोमय्यांना टोला

आरोप करणार्‍यांची ही तर पोटदुखी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा किरीट सोमय्यांना टोला

Subscribe

कोरोना काळात केलेल्या कामावरून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र, आरोप करणार्‍यांना किंमत देण्याची गरज नसून ही त्यांची पोटदुखी आणि मळमळ आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांना लगावला आहे. शनिवारी जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात व्हिसीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

पुण्यातील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार आणि १०० कोटी रुपयांचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप करून याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात देशात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील कामे जास्त उजवी ठरली. अनेक ठिकाणी कोविड सेंटर, चाचणी केंद्र उभारली गेली. यामध्ये फक्त सरकारचा नाही तर धर्मादायी संस्थांचा देखील सहभाग आहे. काही जणांना हे आपले कौतुक परवडत नाही. त्यामुळे पोटात मळमळ होते आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खणून काढण्याचे बोलले जाते. काय काढायचे ते काढा; पण आपण जास्तीत जास्त चांगली सेवा जनतेला देऊ शकलो. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो. ज्यांचे प्राण वाचले त्यांची संख्या आरोप करणार्‍यांच्यापेक्षा टक्केवारीत खूप पटीने जास्त आहे. म्हणूनच मला वाटते की या आरोप करणार्‍यांना किंमत देण्याची गरज नाही. ही त्यांची पोटदुखी, मळमळ आहे. त्यांना सुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यायची असेल तर जरूर करून घेऊ शकतात. सरकारी दराने किंवा फुकट करून देऊ. इलाज करणे हे आपले कर्तव्य आहे. केवळ विरोधक आहेत, म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही. आपण इलाज करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -