घरमहाराष्ट्रPresident In Maharashtra : ७ नोव्हेंबर देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा...

President In Maharashtra : ७ नोव्हेंबर देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा – राष्ट्रपती

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाची पूजा केली आणि भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, रमाबाई आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी ७ नोव्हेंबर ह्या दिवशी संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी विचार केला जाईल, असे राष्ट्रपती म्हणाले. यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी प्रयत्न करावे आणि त्या प्रयत्नांमध्ये मी तुम्हाला मदत करेन, असा विश्वास यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी आंबडवे गावात मराठीतून भाषणाची सुरुवात केली. आपणा सर्वांना माझा नमस्कार म्हणत राष्ट्रपतींनी भाषणाला सुरुवात केली. राष्ट्रपती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाला भेट देऊन मला फार आनंद झाला. महाराष्ट्रात ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. त्याआधी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला. त्याचप्रमाणे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. या दिवशी बाबासाहेब शाळेत गेले होते. त्या दिवशी एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांचा आदर्श जोपासण्यात येतो. तर १४ एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी केली जाते. बाबासाहेबांचे सर्व कार्यक्रम हे दयाळू, कायदेशीर नियम, समतावादी समाजाची कल्पना साकारण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे ७ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी विचार करण्यात येईल. यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे आणि मी तुमची यासाठी मदत करेन.
बाबासाहेबांच्या गावात यात्रा करणे हे माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखे आहे. भारत सरकारद्वारे पंचतीर्थाची कल्पना मांडण्यात आली आहे आणि ती साकार होत आहे. या पंचतीर्थ संकल्पनेत मंडणगड तालुक्यातील बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे गावाचा समावेश होईल, यासाठी देखील खासदारांनी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आंबडवे गावातील बाबासाहेबांच्या स्मृर्ती स्थळाचा समावेश देखील त्यांच्या तीर्थस्थळांमध्ये करावा, असे राष्ट्रपती म्हणाले. नागरिकांनी या स्थळी भेट देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य सुविधा कराव्यात, अशा सूचना यावेळी राष्ट्रपतींनी दिल्या. तर आंबडवे गावातील विद्यार्थ्यांसाठी एक ग्रंथालय उभारण्याकरिता राज्यपाल विवेकानुदान निधीमधून 30 लाख रुपये निधी देण्याची यावेळी राज्यपालांनी घोषणा केली.

- Advertisement -

हापूस आंब्याचे कौतुक

यावेळी रत्नागिरीच्या हापूसचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. रत्नागिरी जिल्हा निसर्गाने नटलेला आहे. हापूसचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला आहे. हापूस आंबा खाल्ल्यानंतर तो कुठे पिकतो तर महाराष्ट्रात. परंतु महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात तो पिकतो हे सर्वात विशेष आहे. हापूस आंब्यात एक वेगळाच गोडवा आहे. आंब्याच्या गोडव्याप्रमाणेच इथल्या लोकांच्या वागण्यात आणि बोलण्यातही गोडवा आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गोडवा संपूर्ण देशात आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -