घरAssembly Battle 2022भाजपने आमच्यासह एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला, पणजीत आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपने आमच्यासह एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला, पणजीत आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Subscribe

बाळासाहेब होते तेव्हा आम्ही भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला होता. मित्र पक्ष असल्याने मित्राला धोका नको, म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. इतर पक्ष वाढत असताना अनेक शिवसैनिक इतर पक्षात गेले आणि मंत्री झाले. पण त्यांच्यासोबतची मैत्री जपायला म्हणून आम्ही आतापर्यंत लढलो नाही. गेल्या ५ वर्षांमध्ये भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्यासोबतच एनडीएच्या पक्षांच्या पाठीतही हा खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळे एनडीएतून पक्ष बाहेर पडत गेले, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली.

गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आदित्य ठाकरे गोव्यात आहेत. पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आदित्य म्हणाले की, आता आमचे ज्या ठिकाणी अस्तित्व होते, त्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढत आहोत. उत्तर प्रदेशात निवडणूक लढत आहोत, बिहारमध्ये लढतो आहोत, सिल्वासा येथे लढलो आहोत, मणीपूरमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकसभा तसेच विधानसभेची निवडणूकही आम्ही लढतो आहोत. इथून पुढे जाताना जो काही कनेक्ट आहे, तो स्थानिक पातळीवर पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झालेले आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला केला आहे.

- Advertisement -

भाजपला माहीत आहे की आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे. आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, तर आमच्यावर टीका का करत आहात? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. आमच्यावर बोलत तरी का आहात? कसली भीती वाटते आहे? होऊ द्या प्रचार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले.
आम्ही मित्रत्व नेहमीच खुलेपणाने पाळले आहे. आताही मनोहर पर्रिकर यांच्या मुलाच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते. आता निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे चिन्ह घरोघरी पोहोचत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात निवडणूक लढताना गोवा आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज निर्माण व्हायला लागली आहे. ग्रामपंचायत ते लोकसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

उत्तराखंड आणि गोव्यातील विधानसभेच्या सर्व जागांसाठी तसेच उत्तर प्रदेशातील दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात उमेदवारांना प्रचार करता येणार नाही. गोवा, उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 55 जागांसाठी मतदान होणार आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -