राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नाही का?, चित्रा वाघ यांची टीका

chitra wagh slams sanjay raut on Aurangabad Gang Rape Case
राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नाही का?, चित्रा वाघ यांची टीका

औरंगाबाद पैठण तालुका तो़ंडोळी गावात २ महिलांवर दरोडेखोरांनी बलात्कार केला. या दोन महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या घटनेवरुन आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का असा प्रश्न पडला असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची उच्च प्रतीची गांजाची नशा उतरली नाही का? अशी खोचक टीका केली आहे. संजय राऊतांना या घटना दिसल्या नाही का? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचित.. उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. राज्यात रोज महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. एकही असा जिल्हा नाही ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत नाहीत असे चित्रा वाघ म्हणाल्या.

मंत्री मलई खाण्यात व्यस्त

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री घोटाळे करण्यात व्यस्त असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यातील मंत्री पोलीस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे. सक्षम पोलीस अधिकारी बाजूला फेकले गेलेत. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतोय असे चित्रा वाघ म्हणाल्या. राज्यात गुन्हेगारी वाढलीय. राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलीस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी केला आहे.


हेही वाचा : आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात…