मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा होणार?

CM and DCM Delhi Visit | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत.

cm eknath shinde

CM and DCM Delhi Visit | मुंबई – शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधिमंडळात करण्यात आले. यावरूनही राज्यात राजकीय नाट्य घडलं. आता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने तेथे काय चर्चा होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच… पाकिस्तान त्यांना घाबरायचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदे सरकारमधील २० मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे नवनवे मुहुर्त सातत्याने समोर आल्यानंतही ते हुकले आहेत. त्यामुळे आता मोदी मुंबई दौरा आणि आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यपाल पदापासून मुक्त करण्याची विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली असल्याची बातमी कालच समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा – बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी…; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला