घरमहाराष्ट्रकल्याण-डोंबिवली येथे कोरोना केअर सेंटर; चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

कल्याण-डोंबिवली येथे कोरोना केअर सेंटर; चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

Subscribe

पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध

कल्याण येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोरोना काळजी केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन शनिवारी करण्यात आले आहे. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबिर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या. केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध

डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ +४ मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे ५००० स्क्वे.फूट च्या प्रशस्त जागेत ७० बेड त्यापैकी ६० ऑक्सिजन सुविधा असलेले व १० सेमी आयसीयू बेड असणार असून दुसऱ्या मजल्यावर काम करणारे डॉक्टर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिसऱ्या मजल्यावरती ५००० स्के.फूट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड व ४ थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टीनची सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वायफाय सिस्टिम तसेच रुग्णांना तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात १ रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांच्यामार्फत चालविण्यात येणार असून एकुण २ एमडी फिजीशियन, २५ निवासी डॉक्टर, ५० परिचारिका व ३० हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये १०० ऑक्सिजनचे बेड, ८४ नार्मल बेड, १० सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहे. या सेंटर मध्ये १२ डॉक्टर्स, २० नर्सेस, २० वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील.

- Advertisement -

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा

कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज ३००० चाचण्या होवू शकतात.


हेही वाचा – अजित पवार पुण्याचे मुख्यमंत्री आहेत का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल


यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळून काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे, असे सांगितले. तसेच महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत. ट्रॅकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असून येथिल नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -