घरमहाराष्ट्रCostal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद, भाजपा नेते म्हणतात - जे मोठ्या...

Costal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद, भाजपा नेते म्हणतात – जे मोठ्या मनाने वागतात…

Subscribe

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या कोस्टल रोडचे आज, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात कोस्टल रोडच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपाने याचे श्रेय उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.

हेही वाचा – CM Eknath Shinde : तुम्ही काम नाही, अडथळे निर्माण केले; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

- Advertisement -

कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाने एक व्हिडीओ शेअर करत याचे श्रेय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. ‘कोस्टल रोड हे उद्धव ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न होते’ असे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच, मुंबईला सर्वोत्तम बनवण्यासाठी झटणारे एकमेव नेतृत्व म्हणजे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’, असे कॅप्शनही या पोस्टला देण्यात आले होते. तथापि, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावरून टीका करताना, या कामाचे अनेकांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ते मात्र कोणालाही श्रेय देऊ शकत नाही. कारण कद्रू लोक श्रेय देऊ शकत नाही, असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमाने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात साकार झालेल्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गामुळे (मुंबई कोस्टल रोड) मुंबईकरांचा वेळ आणि इंधनावरील खर्च वाचणार आहे. महायुतीच्या सरकारच्या काळात फडणवीस यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेत त्यास सुरुवात केली, असे त्यांनी म्हटले आहे.

तर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष Adv. आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार, वसुलीमुळे प्रकल्प रखडला, प्रकल्पाचा दर्जाच धोक्यात आला होता. ठाकरे सरकार गेले आणि अडवणूक, वसूली थांबली. युतीचे सरकार आले आणि कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण झाले. हा प्रकल्प व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रचंड मेहनत केली, पण तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात भूमिपूजनाला त्यांना बोलावले नाही. पण अखेर उद्घाटनाच्या कोनशिलेवर फडणवीस यांचेच नाव कोरले गेले. जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Coastal Road : उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचं प्रेझंटेशन दाखवून महापालिकेच्या निवडणुका लढवल्या – फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -