घरमहाराष्ट्र'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' जाहिरातीसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे पाठबळ, फडणवीसांचे टेन्शन वाढले

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ जाहिरातीसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे पाठबळ, फडणवीसांचे टेन्शन वाढले

Subscribe

'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशी जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीने शह दिला आहे की देवेंद्र फडणवीसांना भाजपनेच शह दिला आहे, अशी चर्चा आता राज्यात सुरु झाली आहे. शिंदेंच्या जाहिरातीला भाजपच्याच नेत्यांनी पाठिंबा दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

मुंबई – ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीने आज राजकीय वर्तूळात खळबळ उडवून दिली आहे. या जाहिरातीतून महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंपेक्षा तीन टक्के कमी मते मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीतून फडणवीसांची रेष कमी करुन शिंदेंना मोठे करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या जाहिरातीत असलेला मोदींचा फोटो हा अधिक बोलका आहे. या जाहिरातीसाठी शिंदेंना दिल्लीचे पाठबळ मिळाल्याची खात्रीलायक माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

फडणवीसांचे टेन्शन वाढले

एकनाथ शिंदेंच्या बंडाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि खासदारांसह शिवसेना पक्षावरच नंतर ताबा मिळवला. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर भारतीय जनता पक्षासोबत युती करुन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा शिंदेंनी केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनीच समोर येऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असं सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. अशातच ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यातून आगामी निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री राहाणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला संपूर्णपणे देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा होता हे नंतरच्या काळात समोर आले. शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात फडणवीसांची पडद्यामागील भूमिका महत्त्वाची ठरली होती. एवढे करुनही ऐनवेळी शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावे लागल्यामुळे भाजपचा मोठा गट नाराज होता. ही नाराजी वेळोवेळी चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलूनही दाखवली आहे. आता शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना २६.१% जनतेने पसंती दर्शवली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२% जनतेची पसंती असल्याचे म्हटले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील असा दावाच या जाहिरातीतून शिवसेनेने केला आहे. यामुळे भाजपचे ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या घोषणेलाच शिवसेनेने खो दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढले आहे.

जाहिरातीचा मास्टरमाइंड ‘दिल्लीत’

एकनाथ शिंदे यांना जनतेची पसंती असल्याची प्रसिद्ध झालेली जाहिरात आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रमांक दोन ठरवणारी ही जाहिरात नेमकी दिली कोणी? याबद्दलली तर्कवितर्क लावले जात आहेत. ‘आपलं महानगर’ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर दौऱ्याला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोघांनी ठरवून ही जाहिरात दिली आहे. दक्षिण मुंबईतील एका प्रमुख जाहिरात एजन्सीमार्फत ऐनवेळी ही जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीचा संपूर्ण मजकूर हा मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही किंवा गुजरातमधूनही नाही तर दिल्लीतून फायनल होऊन आला. ही जाहिरात प्रसिद्ध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत आणि दोन वरिष्ठ अधिकारी हे रात्री उशिरापर्यंत जातीने लक्ष देत होते.

- Advertisement -

बाळासाहेबांचा फोटो वगळला

एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मोठी करुन दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जाहिरातीत फक्त नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. या सरकारच्या आतापर्यंतच्या जाहिराती पाहिल्या तर त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो असतो. त्यासोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो कायम राहिलेला आहे. मात्र शिंदेंच्या आजच्या जाहिरातीत फडणवीसांचा फोटो नाही आणि ज्यांच्या नावाने शिंदे राजकारण करत आहेत त्या बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो नाही. याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही शिंदेंवर टीका केली आहे. शिंदेंची शिवसेना ही मोदी सेना झाली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. या जाहिरातीवरुन स्पष्ट झाले आहे की शिंदेंचं दैवत आता फक्त नरेंद्र मोदी आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौरा टाळला

आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांसमोर आले. या बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा देखील झाली. मात्र नाराज झालेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. फडणवीसांना सायनस आणि कानात दुखत असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर दौरा टाळला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बैठकीत घेतलेले निर्णय माध्यमांना सांगत असतात, मात्र आज तोही सोपस्कार झालेला नाही. फडणवीसांनी आज माध्यमांना सामोरे जाण्याचेही टाळले आहे. या जाहिरातीमुळे फडणवीस हे कमालीचे नाराज झाले असल्याचेच दिसून आले आहे.

हेही वाचा : आमचा फोटो असेल किंवा नसेल, पण… मुख्यमंत्री शिंदेंनी जाहिरातीवर दिली प्रतिक्रिया

संजय राऊतांचा टोला

‘महाराष्ट्रात शिंदे पुन्हा’ यावर भाजप नेत्यांनी आणि भाजपच्या १०५ आमदारांनी उत्तर द्यावे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे १०५ आमदार ज्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे, त्यांनी समोर येऊन उत्तर दिले पाहिजे. तसेच, ही जाहिरात शिवसेनेची आहे की सरकारची असाही टोला राऊतांनी लगावला आहे.

देवेंद्रजी मागे पडले या निष्कर्षाला अर्थ नाही – बावनकुळे

शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे का, असा सवाल माध्यम प्रतिनिधींकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, “देवेंद्रजी मागे पडले आणि एकनाथजी पुढे गेले हा जो निष्कर्ष आपण लावत आहाता, त्याला काही अर्थ नाही. २०१४ मध्ये भाजपला १२४ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये आम्हाला १०५ जागा मिळाल्या. भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘आपलं सरकार’ सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. अर्थमंत्री आहेत. त्यांनी यंदा सादर केलेला अर्थसंकल्प लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे या सरकारची कामगिरी या सर्वेमधून समोर आली आहे. देवेंद्रजी मागे पडले आणि एकनाथजी पुढे गेले या निष्कर्षाला काहीही अर्थ नाही.”

हेही वाचा : Shambhuraj Desai : मंत्र्यांना डच्चू मिळण्याबाबतचे वृत्त शंभुराज देसाईंनी फेटाळले

फडणवीसांना विसरले तर विसरु दे, बाळासाहेबांनाही विसरले – छगन भुजबळ

शिंदेंच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवर विरोधी पक्षातूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाच्या जाहिरातीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीत पूर्वी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असायचे. दोघांचे एकत्र फोटो लावले जायचे. परंतु ही जाहिरात पाहून आश्चर्य वाटलं. पूर्वी फडणवीसांचा फोटो असायचा परंतु यावेळी फडणवीस एकदम गायब झाले.
जाहिरातीत महाराष्ट्रात शिंदे आणि हिंदुस्थानात मोदी असा मथळा आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. खरंतर ही शिंदे साहेबांची मोठी झेप आहे. परंतु त्या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. ते केवळ म्हणतात की त्यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. परंतु त्यांच्या जाहिरातींवर बाळासाहेबांचा फोटो नसतोच. या सगळ्याचं आश्चर्य वाटतं. फडणवीसांना ते विसरले तर विसरू दे, पण किमान बाळासाहेब ठाकरेंना विसरता कामा नये,” असा चिमटाही भुजबळांनी काढला.

“दुष्मन ना करे दोस्त ने ओ काम किया है “

शिवसेनेच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसणे आणि मुख्यमंत्री पदासाठीच्या सर्वेक्षणात त्यांना एकनाथ शिंदेंपेक्षा कमी मतदान म्हणजे, दुश्मन ना करे दोस्त ने ओ काम किया है, अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनाच दुय्यम दर्जा देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीतून केले आहे, अशी टीका पटोलेंनी केली आहे.

हेही वाचा : त्याग केल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले, जाहिरातीवरून भाजप नेत्याची तीव्र नाराजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -