आज निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती मिळणार?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर केली. या याचिकेची नोंद यादीत नसल्याने न्यायालयाने सुनावणीसाठी नकार दिला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाने या याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर केली. न्यायालयाने सुनावणी न घेतल्यास शिंदे गट शिवसेना पक्षासह बॅंक खाती ताब्यात घेईल, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने या याचिकेवर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल असे स्पष्ट केले.

नवी दिल्लीः शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाकरे गटाच्या आव्हान याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. पी. आर. निरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार की नाही याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. पक्षाबाबतचा हा निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. दुसरीकडे सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर लढत सुरु असतानाच निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी अचानक निर्णय जाहीर केला. यानुसार, निवडणूक आयोगाने शिवसेना  आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. विधिमंडळ आणि संसदेतील सदस्यसंख्येचा विचार करून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचा अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यावरून ठाकरे गटाने नाराजी आणि संताप व्यक्त केला. कारण पक्षावर दावा ठोकण्याकरता ठाकरे गटाने पक्षातील सदस्यांचे जवळपास २० लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केली होती. पक्षातील या सदस्यांना डावलून केवळ विधिमंडळ आणि संसदेतील सदस्यांची संख्या विचारात घेतली यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर सोमवारी केली. या याचिकेची नोंद यादीत नसल्याने न्यायालयाने सुनावणीसाठी नकार दिला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाने या याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर केली. न्यायालयाने सुनावणी न घेतल्यास शिंदे गट शिवसेना पक्षासह बॅंक खाती ताब्यात घेईल, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने या याचिकेवर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल असे स्पष्ट केले. या याचिकेवर न्यायालय काय अंतरिम आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.