घरदेश-विदेशOnion export : मोदी पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री? काँग्रेसचा सवाल

Onion export : मोदी पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री? काँग्रेसचा सवाल

Subscribe

महाराष्ट्रासोबत केंद्र सरकारचा भेदभाव उघड झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला आहे की मोदी सरकारकडून त्यांच्यासोबत दुजाभाव सुरू आहे? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने गेल्या महिन्याच्या अखेरीस एक आदेश जारी करून कांदा निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली. तर आता, पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला अंशत: परवानगी दिली असून गुजरातमधून तो निर्यात करण्यात येणार आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून नरेंद्र पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातच मुख्यमंत्री? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 31 मार्च 2024पर्यंत कांदा निर्यातबंदी लागू केली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली असून याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. पण नंतर असा कोणाताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ 22 मार्च रोजी केंद्र सरकारने नव्याने आदेश काढून ही बंदी अनिश्चित काळासाठी वाढविली.

- Advertisement -

तर, आता केंद्र सरकारने आदेश जारी करत सरकारने देशातील तीन बंदरांमधून पांढरा कांदा परदेशात पाठवण्यास मान्यता दिली आहे. पांढरा कांदा निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून उत्पादन आणि उत्पादनाचे प्रमाण प्रमाणित करण्याबाबतचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी सरकारने मुंद्रा बंदर, पिपावाव बंदर (दोन्ही गुजरात) आणि न्हावा शेवा (जेएनपीटी – महाराष्ट्र) बंदराची नावे निश्चित केली आहेत. या बंदरांमधून जास्तीत जास्त दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करता येईल, असेही डीजीएफटीने स्पष्ट केले आहे.

यावर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासोबत केंद्र सरकारचा भेदभाव उघड झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला आहे की मोदी सरकारकडून त्यांच्यासोबत दुजाभाव सुरू आहे? गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास परवानगी आणि महाराष्ट्रात आंदोलन होऊन देखील निर्यातबंदी हा कुठला न्याय? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. गुजरातमधील शेतकरी तुपाशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी मात्र उपाशी, हाच अन्याय गेली दहा वर्ष सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही केंद्र सरकरावर जोरदार टीका केली आहे. गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी मिळाली, मग महाराष्ट्राला का परवानगी नाही? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय पाप केले? आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारता का? असे विचारतानाच मोदी पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री? असा खोचक प्रश्न त्यांनी विचारत त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -